कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती फिल्म क्लब, बालसाहित्य कलामंच यांच्यावतीने उद्यमनगर, कोल्हापूर येथील मनपाच्या शिवाजी विद्यालयामध्ये लहान मुलांना भारतीय संविधानाची प्रास्ताविका आणि पुस्तके वाटून भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अनिल म्हमाने म्हणाले, आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आणि आपल्या देशाचे भविष्य घडवण्याच्या, आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आदर्शांचा सन्मान करूया. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात ही मूल्ये जपण्याचा संकल्प करूया. आपल्या राष्ट्राची एकात्मता शांततेत रूपांतर करण्यासाठी आपण सहकार्य करूया. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची भावना आपल्या हृदयात सदैव राज्य करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी सहाय्यक शिक्षिका सरिता कांबळे म्हणाल्या, देशाचा इतिहास समजून घेण्यासाठी लहान मुलांनी पुस्तके वाचणे गरजेचे आहे. यासाठी पुस्तके व भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाटण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती मिरजे, सहाय्यक शिक्षिका सरिता कांबळे, माजी मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सुतार सर, बालसाहित्य कलामंचचा प्रमुख आदित्य म्हमाने, प्राथमिक शिक्षण समिती प्रमुख नागेश आचार्य, सेवक राजू गेजगे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.