Home चंद्रपूर स्वातंत्र्य दिनानिमित्त जबाबदारी आणि कर्तव्य निभावण्याचा संकल्प करू या!- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार...

स्वातंत्र्य दिनानिमित्त जबाबदारी आणि कर्तव्य निभावण्याचा संकल्प करू या!- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन20 फायर बाईक आणि रुग्णवाहिकांचे लोकार्पण

116

 

 

 

 

चंद्रपूर, दि. 15 : आजपासून संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रारंभ होत आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक शहिदांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश आपल्या हाती दिला आहे. देश विकसीत व्हावा, हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. त्याच अनुषंगाने भारताचा वेगाने विकास होत असून या विकासात चंद्रपूरचेही योगदान असावे, यासाठी आपण सदैव तत्पर असायला हवे. स्वातंत्र दिन हा केवळ एक दिवस नव्हे तर या निमित्ताने प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य निभावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्रसंग्राम सैनिक, लोक प्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात या योजनांची जिल्ह्यात अतिशय चांगली अंमलबजावणी होत आहे. त्यासाठी सर्व जिल्हा प्रशासन कौतुकास पात्र आहे. चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. राज्य सरकारने धानाचा बोनस वाढवून हेक्टरी 15 हजारांच्या ऐवजी आता 20 हजार रुपये केला आहे. जिल्ह्यात धान खरेदी प्रोत्साहन पर राशी म्हणून 65,747 शेतकऱ्यांना 156 कोटी 44 लक्ष 50 हजार 640 रुपये अदा करण्यात आले आहे.

अजयपूर येथे अत्याधुनिक कृषी मार्गदर्शन तंत्रज्ञान केंद्र सुरू होत आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादन केलेली विविध शेती उत्पादने, प्रदर्शन व विक्री करिता तसेच नवनवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता सुसज्ज बाजारहाट हायटेक नर्सरी उभारण्यासाठी एकूण 64 कोटी 99 लक्ष रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.
पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, विकसित भारत @ 2047 अंतर्गत पुढील 25 वर्षांमध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचा पुढील 25 वर्षांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यात आरोग्य व शिक्षण सुविधा, पर्यावरण, अंगणवाडी, रस्ते आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात गुरुवारपासून 3 हजार रुपये जमा होण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील पात्र 2 लक्ष 81 हजार 588 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून 31 ऑगस्ट नंतरही माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज पुरवठा योजनेतून चंद्रपूर जिल्ह्यातील 59765 शेतक-यांना पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील 44 लक्ष 3 हजार शेतकऱ्यांना होणार असून शासनाकडून दरवर्षी 14760 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलिंडरचे पुनर्भरण (रिफिलिंग) मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री मोफत तीर्थदर्शन योजनेंतर्गत देशातील 139 तीर्थक्षेत्रामध्ये चंद्रपूर येथील प्रसिध्द महाकाली देवी मंदिराचाही समावेश करण्यात आला आहे. शासनाकडून पात्र व्यक्तिला प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी खर्चाकरीता जास्तीत जास्त 30 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर असावा, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशा सुचना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या.

तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या व ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींना आता शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात 50 टक्के लाभाऐवजी 100 टक्के लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शासनाने 906 कोटींची तरतूद केली आहे. सोबतच जिल्ह्यात एस.एन.डी.टी विद्यापीठाचे उपकेंद्र गेमचेंजर ठरणार आहे. कॅन्सर हॉस्पीटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम शेवटच्या टप्प्यात असून त्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे. ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर’ अंतर्गत जिल्ह्यात 75 हजार कोटींची गुंतवणूक येत आहे. यातून रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते 20 फायर बाईक आणि ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.

*उत्कृष्ट अधिकारी – कर्मचा-यांचा सत्कार* : उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचा-यांचा यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन पाटील, रोहित शास्त्रकार, गोपाल निखुरे, टी.ए. चव्हाण, रमेश मोडक, नागसेन वाघमारे, योगेश लोंढे आणि सर्वोत्कृष्ठ पंचायत समितीचा पुरस्कार वरोरा पं.स. ला देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here