अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :-आजपर्यंतच्या वाटचालीत अनेक संकटे आली. विरोधकांनी माझी नाहक बदनामी केली. तरीही माझ्या माय-बाप जनतेने म्हणजे तुम्ही कायम साथ दिलीत. तुमचा माझ्यावर विश्वास आणि पाठींबा होता आणि आजही आहे, याची जाण मला आहे. त्यामुळे संकटांच्या सर्व अग्निदिव्यातून फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादामुळेच सुटलो, अशी भावनिक कृतज्ञता गंगाखेडचे रासप आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली.
शहरातील कापसे गार्डन मंगल कार्यालय येथे आयोजित त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यातील सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी औचित्य साधून आ.डॉ.गुट्टे यांच्या पाच वर्षीय कामगिरीचा आढावा घेणाऱ्या ‘वचनपूर्ती’ या पुस्तिकेचे प्रकाशन हभप.चिन्मय महाराज सातारकर यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्या ऑनलाइन प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ‘वचनपूर्ती’ या पुस्तिकेत आ.डॉ.गुट्टे यांच्या सर्व विकास कामांची निधीनिहाय नोंद घेण्यात आली असून विविध योजनांद्वारे केलेल्या कामांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
तत्पूर्वी, वाढदिवसाचे औचित्य साधून आ. डॉ.गुट्टे यांनी शहरातील श्री बालाजी मंदिर येथे मनोभावे अभिषेक व पूजा केली. तसेच संत जनाई ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विचार यात्रेचे उद्घाटन केले. पुढे आरोग्य केंद्रातील रूग्णांना फळे तसेच मित्र मंडळ व शासकीय योजना मदत केंद्राच्या वतीने बांधकाम कामगारांना साहित्य कीट, जेष्ठ नागरिकांना चष्मा, कमरेचा पट्टा व काठी वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, येणारा प्रत्येक माणूस हा माझे संकट दूर होईल, या आशेने येतो. त्यामुळे तुमची कसलीही अडचण असू द्या, माझा दरवाजा सदैव उघडा असतो. त्यामुळे काहीही संकट आल्यास रात्री-अपरात्रीसुद्धा ठोठावा, तुमचा हा भाऊ, मुलगा, नातू सेवेसाठी सदैव तत्पर असेल.
आमदार डॉ.गुट्टे म्हणजे प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण आहेत. आम्ही विरोधात होतो, तेव्हापासून ते आमच्या सोबत आहेत. त्यांनी कधीही कसल्याही पदाची किंवा कुठल्याही गोष्टीची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांच्या वेगळेपणाची मला चांगलीच ओळख आहे. परंतु, भविष्यात त्यांचा योग्य तो मान-सन्मान महायुती राखेल. त्यांचे ‘वचनपूर्ती’ हे केवळ पुस्तक नाही, तर गंगाखेड विधानसभेच्या विकासाची गाथा आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी या भागाचा कायापालट करण्यास कारणीभूत ठरले आहेत. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.डॉ.गुट्टेंचे कौतुक केले.
तर आमदार गुट्टे हे रासपचे लढणारे शिपाई आहेत. अनेक संकटांना भेदून ते इथपर्यंत पोहोचले आहेत त्यांच्यामुळे रासप मराठवाड्यात मजबूत झाला आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभेचा हा बालेकिल्ला ते राखतील आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची मनोभावे सेवा करतील असं मला विश्वास असल्याचे, माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदुदेव जोशी यांनी केले. तर आभार वक्ते संदीप माटेगावकर यांनी मानले. यावेळी महायुती व मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला, पुरुष, जेष्ठ मंडळी, युवक, युवती आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप.सातारकर यांच्या रसाळ
कीर्तनाचेही भव्य आयोजन!
अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त राष्ट्रीय समाज पक्ष व मित्र मंडळाने प्रसिद्ध हभप.चिन्मय महाराज सातारकर यांचे कीर्तन आयोजित केले होते. त्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराजांनी जनप्रबोधन करताना हलक्या-फुलक्या भाषेत अनेक दृष्टांत देवून दिले. तसेच त्यांनी दिलेली उदाहरणे समर्पक व आशयपूर्ण होती. त्यामुळे ऐकणारे अगदी मंत्रमुग्ध झाले होते.
उपक्रमांमुळे समाधान वाटते!
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमुळे विविध घटकांना मदत झाली, याचे समाधान वाटते. राजकीय चौकट बाजूला ठेवून समाजहिताच्या भूमिकेला प्राधान्य द्या, असा माझा कायम आग्रह असतो. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून तो जपला जातो, हि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.