Home लेख संत परंपरा आणि समतेची शिकवण

संत परंपरा आणि समतेची शिकवण

65

 

अखिल मानव उद्धारक विचार हे कालजयी असतात. विचारांचे मूल्ये काळानुरूप समाजाला उपयोगी पडतात हेच खरे! संतांनी समाजात रुजवलेले विचारही असेच मूल्याधिष्ठित असतात.

“माणूस द्या मज माणूस द्या हो,
भीक मागता प्रभू दिसला ।।”

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हे कवण ऐकले की भरकटलेला माणूस भानावर आल्याविना राहत नाही. तुकडोजी महाराज यांनी सुमारे साठ वर्षांपूर्वी विविध समाजोद्धारक विषयांवर चिंतन मांडले. त्यांची मराठी व हिंदी भाषेत असलेली लोकप्रबोधक भजने, ग्रामगीता, विवाहोपयोगी मंगलाष्टके, जेवणावळीत म्हणतात ते उद्बोधक श्लोक आणि द्वैभाषिक भाषणे अशी विपुल साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. त्यातून समाजोन्नतीचे विचार व मूल्ये त्यांनी प्रसृत केलीत. तथापि त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू माणूसच राहिला आहे. असा माणूस जो माणसावर प्रेम करणारा असेल. अशा माणसात ते साधूत्व आणि संतत्व शोधत. अशा माणसात त्यांना ईश्वर दिसत असे, आणि माणसाची सेवा करणे माणसामाणसांमध्ये प्रेम निर्माण होणे हीच ईश्वरभक्ती आणि हीच मानवता होय. माणुसकीला जपणाऱ्या अशा समाजाला मग लबाडी, थोतांड, दांभिकता यापासून मुक्ती मिळून; सचोटीने वास्तवाला
भिडण्याचे सामर्थ्य येते. प्रामाणिक माणसाला आपले काम करत असतानाच देवाचे दर्शन घडते, उलट बेईमान माणसाने कितीही टाळकुटेपणा केला आणि मुर्तीपुढे मस्त घासले तरी त्याला देव दिसू शकत नाही. आणि म्हणून ईश्वर हा इतरत्र कुठेही नसून साक्षात सज्जन माणसातच वास करतो.

“तीर्थी धोंडापाणी,
देव रोकडा सज्जनी।”

हे सूत्र संतांनी दीर्घकाळ मांडून लोकप्रबोधन केले.
खरे म्हणजे संत तुकडोजी महाराजांनी मांडलेला हा विचार मानणारी संतांची दीर्घ परंपरा आहे. मानवनिर्मित विषमता ही माणसाच्या जीवावर उठणारी आहे वर्णभेद धर्मभेद जातीभेद लिंगभेद हे मानवाच्या विकासाच्या ज्या विविध ऐतिहासक टप्प्यावर निर्माण झाले, तेथे त्या टप्प्यांवर धूर्तांनी माणूसच दुय्यम ठरवला. तिथेच विषमताखोर विषवल्लीचे बीजारोपण होत गेले. उच्च-नीच भाव माणसाच्या मनात निर्माण करून उच्चजातस्वार्थी प्रवृत्तीने समाज पोखरून टाकला. प्राणीमात्रात मानव सर्वश्रेष्ठ आहे खरा पण समाजमनावर कलम केलेली विषमता मानवतेसाठी कलंक ठरली आहे. त्यामुळे भेदभावाची पाळेमुळे खणून काढल्याशिवाय समाज प्रगत होणार नाही.
माणसाला उन्नत अवस्थेत पोहोचण्यासाठी संत माणसात देव शोधतात. माणसाबद्दल प्रेमभाव, हातात हात घेऊन समभाव, प्रतिष्ठेची वागणूक. घ्रुणा नाही. द्वेष नाही. सामान्य माणसाच्या या निरलस भावछटा माणसाशी समतेच्या दृष्टीने उपयुक्त ठराव्यात. असा विवेकी विचार मानवी व्यवहारात यावा, म्हणून एखादा भीक मागणारा सर्वहारा माणूसही प्रभू वाटला पाहिजे असे संतांचे वचन समाजाला अंतर्मुख करणारे आहे.
संतश्रेष्ठींनी समाजाला इतकी मौलिक शिकवण देऊन ठेवलेली असून आजही माणूस माणसाची हेळसांड करताना दिसतच आहे. अनेक ठिकाणी लहान मुलं, म्हातारे, अपंग अशी माणसं भीक मागताना दिसतात. त्यांना भीक मागणे आवडते किंवा ते फार आनंदाने भीक मागतात असं अजिबात असण्याची शक्यता नसते. भीक मागणाऱ्यांची कित्येकदा प्रचंड नाचक्की होते. तरी अगतिकतेने, अपमान पचवत ते भीक मागत असतात. मानव सर्व प्राणिमात्रात बुद्धिमान आहे, त्याला भाषेची असलेली इतर प्राण्यांपेक्षा अद्वितीय खासबात, यामुळे त्याचं वेगळंपण निसर्गसृष्टीमध्ये दिसून येते. तरीही भीक मागण्याची विशिष्ट व्यक्तीवर अनैच्छिक आफत येते. खरंतर ही ‘बला’ विषमताधिष्ठित समाजव्यवस्थेची देण होय. विषमतेमुळे निर्माण झालेले साधनसामग्रीचे असमान, अपुरे, कमी-अधिक वितरण,संधीची असमानता यामुळे भिकारी (गरिबी-दारिद्र्यसुद्धा) ही समस्या निर्माण झाली. भिकारी हे समाजाला लागलेली कीड आहे. अशा भिकाऱ्यांना चक्क गोळ्या घालून संपवले पाहिजे असे कधी कोणीतरी बरळत जातात. धडधाकट भिकारी दिसला की, काही कामधंदा का करत नाही असे फुकटचे सल्ले देणारेही काही कमी नाहीत. भिक मागणाऱ्या कच्च्या-बच्चांना तर टिंगल टवाळीने टोचून टाकून बोलत त्यांची मस्करी करणे असे प्रकार अवतीभवती नित्याने नजरेत येत असतात. त्यांच्या पुनर्वसनाचा केवढा मोठा प्रश्न व्यवस्थेसमोर आ वासून उभा आहे? स्वातंत्र्यापश्चात पाऊणशे वर्षांच्या काळानंतरही आम्ही आमच्या देशवाशीयांचा बंधुभावाने हातात हात घेऊन त्यांना समानतेच्या पातळीवर आणू शकलेलो नाही,असा याचा अर्थ निघू शकेल. संतांनी मात्र अशा रंजल्या गांजल्यांना आपले मानून जनातच देव शोधला.

“जे का रंजले गांजले,
त्याशी म्हणे जो आपुले”

म्हणत विषमतेने ग्रस्त समाजमनावर मानवसेवेचे रोपण करण्याची केवढी अप्रतिम मानसोपचार पद्धती संतांनी अवलंबली म्हणावी!
“वारकरी पंथ म्हणजे पंढरीची वारी- तीर्थयात्रा करणारा पंथ नसून तो प्रचलित व्यवस्थेवर (विषम वैदिक सूत्रावर) वार करून लोकांना मुक्ती देणारा पंथ होता. वारकरी पंथ म्हणजे विचाराने वार करणारे. धर्मशास्त्र विरुद्ध पुकारलेले वैचारिक युद्ध होय. वारकरी पंथाला मानणाऱ्या प्रामाणिक खऱ्या संतांनी वैदिक धर्मातील पुरोहितशाही व ईश्वरशाहीवर वार केले. पंडित पुरोहितांनी जेव्हा लोकांना देवळात जाऊन पूजापाठ करण्यासाठी प्रवृत्त केले, तीर्थयात्रेला जाण्यासाठी प्रेरित केले, दक्षिणांच्या माध्यमातून लुबाडणे सुरू केले, तेव्हा वारकरी पंथाला मानणाऱ्या संतांनी अभंगातून लोकांना जागृत केले. संत नामदेवांनी
‘देव देव्हाऱ्यात नाही,
देव नाही तीर्थात।
तोची वसतो कष्टात,
तोची दिसतो परोपकारात।
अशी दांभिक धर्ममार्तंडांची कान उघाडणी केली.”
तर,
” तीर्थी धोंडा पाणी देव रोकड सज्जनी”
(प्रु.१३०-३१, सत्यशोधक समाज प्रबोधन-प्रबोधनकार अरविंद माळी) संत तुकारामांनी या अभंगातून सज्जनात ईश्वर वास करतो अशी महती अधोरेखित केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
“मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी…,”
“मंदिर मंदिर क्या घुमता है।
पहिले सेवा कर गरीबोंकी।”

अशाप्रकारे मूर्तीपूजा आणि देवळांपेक्षा मानवसेवेची महिमा संतांनी वर्णिलेली दिसते.
मग ईश्वर आणि धर्म मानायचा की नाही असा पेच सामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो. त्यावर वारकरी पंथातील आपल्या संतांनी ईश्वर कसा मिळणार व धर्म कशाला म्हणायचे हेही सांगितले आहे.
रंजल्या गांजल्यांची सेवा करणे हे तुकोबांचे वचन जेवढे बोलके आहे तेवढेच परखड गाडगेबाबांचे खडे बोलही ऐकू येतात भुकेल्यांना अन्नदान, तहानलेल्यांना पाणी, निरक्षरांना शिक्षण द्या. उघड्या नागड्यांना कपडे द्या. हीच खरी पूजा आहे. संत नामदेवांनी तर,
भजा आत्मदेवा।
अखंडित सेवा।
करा त्याची।
‘कोणाही जीवाचा
न घडो मत्सर।
मर्म परमेश्वर
पुजनाचे।’
अशा शब्दात द्वेष करणाऱ्या विषमतावाद्यांना चांगल्याच कानपिचक्या घेतल्या. संत सावता माळी,
“कांदा मुळा भाजी।
अवघी विठाई माझी।”
म्हणत आराध्य दैवताचे अपारंपरिक रुप सांगतात.
तर साने गुरुजी,
‘कुणां ना तुच्छ लेखावे,’
‘सर्व हीन अतिपतीत,
दीन पददलित,
आर्त अतिविकल
गांजलेल्यांना प्रेम अर्पण करणे म्हणजेच खरा धर्म होय’ असे म्हणतात.
सामान्य माणूस प्रेमाने, बंधुप्रितीने, जिव्हाळ्याने,आत्मीयतेने एकोप्याने, सहकार्याने, सहृदयतेने वागतो हा खरं तर धर्माचा सार असला पाहिजे. The day we find a great number of men and women with this psychology who cannot devote themselves to anything else than the suffering humanity, that day shall inaugurate the era of liberty.(p.11, Why I am Atheist- Bhagat Singh) अर्थात, भगतसिंग देखील मानवसेवा करणाऱ्यांची संख्या वाढेल त्या दिवसाला स्वातंत्र्ययुगाची सुरुवात मानतात.
अर्थात संत न् महामानवांनी मानवच केंद्रस्थानी मानून त्याचे दुःखनिवारण करणे, मानवाची सेवा करणे, हाच धर्म मानला, परोपकार, अस्पृश्यता उच्चाटन, जातीभेदाविरोधात एकोपा, सहभोजन, मानवसेवा, परमार्थ साधत माणसात देव शोधला. मनात उच्चनिच भेदाभेद न ठेवता सद्वर्तन, सदाचार करून सन्मार्गाने जगणे याला प्राधान्य दिले. मन परिवर्तनावर भर दिला.
मराठी संत आणि संतसाहित्य हे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या अभ्युदयाचा व्यासंग व्हावा, अशा लाखमोलाचे आहे. मराठी संतांनी तेराव्या शतकापासून अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत येथील जनजीवन व्यापून टाकले,भारून टाकले होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीमध्ये मराठी संतांचे योगदान तर अनन्यसाधारण आहे.
संतपरंपरा मानत असलेल्या या विचारप्रवाहाला हजारो वर्षांची प्रदीर्घ अशी समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी राहिलेली आहे. लोकायत, बौद्ध, जैन, लिंगायत, महानुभाव इ.अवैदीक धर्म-पंथ आपापल्या मताचा जोरदार पुरस्कार करीत असताना अनेकदा त्यांना वैदिक परंपरावाद्यांचा प्रतिहल्ला जिव्हारी लागणारा ठरला. हेमाद्री पंडितासारख्या उच्चपदस्थ व्यक्तीने पुराणधर्माचे पुनरुज्जीवन करून कर्मकांडांचे अवडंबर हिरीरीने माजवित असल्याच्या पार्श्वभूमीवर संत आणि संत साहित्य महाराष्ट्राला ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी दीपस्तंभासारखे ठरते. सामाजिक सांस्कृतिक जीवनाच्या पेचप्रसंगातही धिरोदात्तपणे तोंड देण्याची कार्यपद्धती फलदायी ठरते. “सर्व सामाजिक सांस्कृतिक व्यवहार वर्णनातीत जटिल बनला आहे. या जटीलतेची हळूवारपणे उकल करून आक्रस्ताळेपणाऐवजी आस्थेने, प्रेमानं परंपराशील समाजमनाचं नव्या युगसंदर्भाला अनुरूप प्रबोधन घडवायला हवं. ज्यांच्या जीवनक्रमात परिवर्तन घडवायचंय त्यांची टिंगल टवाळी करून त्यांची टर उडवण्याची भूमिका घेऊन त्यांना परिवर्तन सन्मुख बनवणं अवघड आहे. अशा भूमिकेमुळे अनेकदा ती माणसं परिवर्तनाच्या बाबतीतील स्वागतशीलता गमावून बसतात. अन अधिक कडवेपणाने त्याच परंपरेला चिकटतात.” हे रा. चि. ढेरे (पृष्ठ ७९, श्री आनंदनायकी) यांचं मत लक्षात घेता संतचळवळीची आजच्या संदर्भातील कालसुसंगता अधिक स्पष्ट होते.
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात सामाजिक सुधारणांना संत चळवळीने मशागत भूमी फलदायी ठरली. संतांनी समाजमनाची प्रबोधनातून केलेली मशागत सामाजिक सुधारणांचे बिजारोपण करण्यास उपयुक्त ठरली. त्यामुळे पुढील काळात अस्पृश्यता निवारण, स्त्री-शिक्षण, जातीभेद विरोध, उच्चजातवर्णवर्चस्व विरोधी लढे, शेतकरी कष्टकऱ्यांची लढाई, आदिवासींचे संघर्ष’ इ. धुमारे फुटू लागले. एकूणच वर्णजातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या विषमतेने होरपळून निघालेल्या दलित, आदिवासी, ओबीसी शेतकरी कष्टकरी अठरापगड जातींमध्ये अन्यायाविरोधात चीड निर्माण होण्याची मानसिकता तयार होऊ लागली. सत्यशोधक चळवळीने तर तत्कालीन समाजमनाचा धागा पकडून या परिस्थितीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत महाराष्ट्रभर सत्यशोधक चळवळीचे जाळे विणले गेले. एका दैदिप्यमान सामाजिक लढ्याचा हा काळ होता, ज्यामुळे महाराष्ट्राचे संपूर्ण जनजीवन प्रभावित होऊन गेले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अंगाने महाराष्ट्राला पुरोगामी बिरुदावली लागली ती या घटनाक्रमातून. त्यादृष्टीने सांस्कृतिक सामाजिक परिवर्तनवादी लढ्यातील धुरिणांनी पावलोपावली संत चळवळ आणि समतावादी शिकवण ध्यानात घेणे आवश्यक आहे.

■ अनुज हुलके, नागपूर
मो. 98238 83541

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here