Home लेख किडणी प्रत्यारोपण कसे केले जाते? (किडनी- मुत्रपिंड दान आणि प्रत्यारोपण विशेष)

किडणी प्रत्यारोपण कसे केले जाते? (किडनी- मुत्रपिंड दान आणि प्रत्यारोपण विशेष)

128

 

_किडणी- मुत्रपिंड प्रत्यारोपण ही चिकित्सा विज्ञानाने केलेल्या अत्युच्च प्रगतीची विशेष खून आहे. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या शेवटच्या अवस्थेतल्या उपचारांना हा उत्तम पर्याय आहे. यशस्वी किडणी प्रत्यारोपणानंतर रोग्यांचे आयुष्य इतर व्यक्तींप्रमाणेच निरोगी आणि सामान्य होते. सद्या अनेक जन या व्याधीने ग्रस्त राहून जर्जर होत आहेत. या व्याधीविषयी पूर्व माहिती राहावी आणि लोकांतील धास्ती कमी करावी. या महत् उद्देश्याने श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींनी वाचकांच्या सेवेत वाहिलेला महत्वपूर्ण लेख… संपादक._

किडणी प्रत्यारोपण या विषयाची चर्चा आपण चार भागांत करणार आहोत- १) किडणी प्रत्यारोपणापूर्वी जाणून घ्यायच्या गोष्टी. २) किडणी प्रत्यारोपण ऑपरेशनबद्दलची माहिती. ३) किडणी प्रत्यारोपणनंतर जाणून घ्यायची आवश्यक माहिती. आणि ४) कँडेव्हर किडणी प्रत्यारोपण. किडणीप्रत्यारोपणापूर्वी जाणून घ्यायच्या आवश्यक गोष्टी:-किडणी प्रत्यारोपण म्हणजे काय? तर,
क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांत अन्य व्यक्तीची (जिवंत वा मृत) एक निरोगी किडणी ऑपरेशनद्वारे बसविण्याला किडणीप्रत्यारोपण म्हणतात. कोणत्याही व्यक्तीच्या दोन किडण्यांमधील एक किडणी खराब झाली, तर शरीरातील किडणीशी संबंधित सर्व जरुरी कामे दुसऱ्या किडणीच्या मदतीने होऊ शकतात. तसेच ऍक्यूट किडणी फेल्युअरमध्ये योग्य उपचारांनी- औषधे आणि काही रोग्यांच्या बाबतीत थोड्या काळासाठी केलेल्या डायलीसीसने किडणी पुन्हा पूर्णपणे काम करू लागते. अशा रोग्यांना किडणी प्रत्यारोपणाची गरज भासत नाही. क्रॉनिक किडणी फेल्युर झालेल्या रोग्यांच्या दोन्ही किडण्या जेव्हा ८५ टक्क्यांहून जास्त खराब होतात, औषधे घेऊनदेखील रोग्यांची तब्येत सुधारत नाही आणि त्याला नियमित डायलिसीसची गरज भासते, अशा रोग्यांसाठी किडणी प्रत्यारोपण हा उपचाराचा दुसरा पर्याय ठरू शकतो. क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यांच्या जेव्हा दोन्ही किडन्या पूर्णपणे खराब होतात तेव्हा, त्यांना चांगले ठेवण्यासाठी आठवड्यात तीन वेळा नियमित डायलिसीस आणि औषधे घेण्याची गरज असते. अशा प्रकारच्या रोग्यांची प्रकृती ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी केल्या जाणाऱ्या डायलिसीसवर अवलंबून असते. किडनी प्रत्यारोपण हा उत्तम रीतीने जगण्याचा एकमेव संपूर्ण आणि परिणामकारक उपाय आहे. यशस्वी किडणी प्रत्यारोपणाचे फायदे- १) रोगी इतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगू शकतो आणि आपली रोजची कामेदेखील करू शकतो. २) डायलिसीस करण्याच्या कटकटीतून रोगी मुक्त होतो. ३) खाण्यातले पथ्य कमी होते. ४) रोगी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतो. ५) पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि महिला रोगी मुलांना जन्मही देऊ शकतात. ६) सुरुवातीच्या पहिल्या वर्षीच्या उपचारांच्या खर्चानंतर पुढील उपचार कमी खर्चात होतात. तर किडणी प्रत्यारोपणाचे तोटे- १) मोठ्या ऑपरेशनची गरज असते, पण ते पूर्ण सुरक्षित असते. २) सुरुवातीला यश मिळाल्यानंतरही काही रोग्यांत नंतर किडणी पुन्हा खराब होण्याची शक्यता असते. ३) किडणी प्रत्यारोपणानंतर नियमित औषधे घेण्याची गरज असते. ४) सुरुवातीची औषधे खूप महागडी असतात. जर औषधे घेणे थोड्या काळासाठी बंद झाले, तर प्रत्यारोपित किडणी निकामी होऊ शकते. ५) हे उपचार खूप महागडे असतात. ऑपरेशन आणि हॉस्पिटलचा खर्च, घरी गेल्यानंतर नियमित औषधे तसेच वारंवार प्रयोगशाळेतील तपासण्या करणे यांचा खर्च खूप- तीन ते पाच लाख रुपयापर्यंत होतो. किडणी प्रत्यारोपण न करण्याचा सल्ला या वेळी दिला जातो- रुग्णाचे वय जास्त असणे, रोगी एड्स किंवा कॅन्सरने पिडीत असणे अशा स्थितीत किडणी प्रत्यारोपण जरुरी असूनही ते केले जात नाही. भारतात मुलांमध्ये किडणी प्रत्यारोपण खूप कमी होताना दिसून येतात. किडणी प्रत्यारोपणासाठी दाट असा निवडला जातो- क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रोग्यासाठी कुठल्याही व्यक्तीची किडणी उपयोगी पडेल असे नसते. सगळ्यात प्रथम ज्याला किडनीची गरज आहे, त्या रोग्याचा रक्तगट लक्षात घेऊन डॉक्टर हे निश्चित करतात, कि कुठली व्यक्ती त्याला किडणी देऊ शकेल. किडणी देणारा आणि घेणारा यांचे रक्तगट जुळण्याबरोबरच दोघांच्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींमधील एचएलएचे प्रमाणही जुळावे लागते. एचएलएचे जुळणे हे तीसहू टायपिंग नावाच्या तपासणीने पहिले जाते. किडणी कोण देऊ शकतो? तर, सर्वसाधारणपणे १८ ते ५५ वर्षे वयोगटातील दात्याची किडणी घेता येते. स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना किडणी देऊ शकतात. जुळे भाऊ-बहिण हे आदर्श किडणीदाते मानले जाता. पण असे सहजासहजी आढळून येत नाही. आई-वडील, भाऊ-बहिण सर्वसाधारणपणे किडणी दान करण्यासाठी निवडले जातात. जर या किडणी दात्यांकडून किडणी मिळू शकली नाही, तर इतर कुटुंबीय जसे, काका, मामा, आत्या, मावशी यांचीही किडणी घेता येते. जर हेही शक्य नसेल, तर पती-पत्नींने एकमेकांच्या किडणीची तपासणी केली पाहिजे. कुटुंबातल्या व्यक्तीची किडणी मिळाली नाही, तर ब्रेन डेड- मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या किडणीचे- कँडेव्हर किडणीचे प्रत्यारोपण केले जाते. किडणी दान करण्यापूर्वी किडणीदात्याची संपूर्ण शारीरिक तपासणी केली जाते. दात्याच्या किडण्या योग्यरीतीने कार्यरत आहेत कि नाही आणि त्याला एक किडणी दान केल्यानंतर काही त्रास तर होणार नाहीना, हे पूर्णपणे पडताळून पहिले जाते. साधारणपणे एक किडणी दिल्यानंतर दात्याला कोणताही त्रास होत नाही. तो आपले जीवन पूर्वीप्रमाणेच व्यतीत करू शकतो. ऑपरेशननंतर पूर्ण आराम केल्यानंतर तो शारीरिक श्रमदेखील करू शकतो. त्याच्या वैवाहिक जीवनातही कोणत्याही अडचणी येत नाहीत. दात्याने एक किडणी दिल्यानंतर त्याची दुसरी किडणी दोन्ही किडण्यांचे कार्य सांभाळू लागते. किडणी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णतपासणी: किडणी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनपूर्वी रुग्णाची अनेक प्रकारे तपासणी केली जाते. ऑपरेशनदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रुग्णाचे शरीर ऑपरेशनसाठी अनुकूल आहे किंवा नाही या हेतूने या तपासण्या करण्यात येतात. त्यात शारीरिक चिकित्सा, लॅबोरेटरी तसेच रेडीओ लॉजिकल तपास केला जातो. किडणी प्रत्यारोपणचे ऑपरेशन: किडणी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशनमध्ये काय केले जाते? तर रक्तगट जुळल्यानंतर, एचएलएचे प्रमाण योग्य कि नाही हे निश्चित केल्यानंतर किडणी प्रत्यारोपनाचे ऑपरेशन केले जाते. ऑपरेशनपूर्वी रुग्णाचे नातेवाईक आणि किडणीदात्याचे नातेवाईक यांची संमती घेतली जाते. किडणी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन डॉक्टरांची एक तज्ज्ञ टीम करते. नेफ्रॉलॉजीस्ट- किडणी फिजिशियन, युरोलॉजिस्ट- किडनीचे सर्जन, पॅथॉलॉजिस्ट आणि इतर प्रशिक्षित सहायकांच्या संयुक्त कामगिरीने हे ऑपरेशन होते. हे ऑपरेशन युरोलॉजिस्ट करतो. किडणीदाता तसेच एक किडणी मिळणारा रुग्ण या दोघांचे ऑपरेशन एकाच वेळी केले जाते. किडणीदात्याची एक किडणी ऑपरेशन करून काढल्यानंतर ती विशेष प्रकारच्या थंड द्रवात पूर्णपणे स्वच्छ केली जाते. त्यानंतर ही किडणी क्रॉनिक किडणी फेल्युअरच्या रुग्णाच्या पोटाच्या पुढील भागात उजव्या खालच्या बाजूला प्रत्यारोपित केली जाते. सर्वसाधारणपणे रुग्णाची खराब किडणी काढली जात नाही. मात्र, ती शरीराला हानी पोहोचवत असेल, तर अशा अपवादात्मक बाबतीत ती किडणी काढणे गरजेचे ठरते. हे ऑपरेशन साधारणपणे तीन-चार तास चालते. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर किडणी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाच्या पुढील सर्व उपचारांची जबाबदारी नेफ्रॉलॉजिस्ट सांभाळतो.
किडणी प्रत्यारोपणापुर्वी जाणून घ्यायच्या सूचना- संभावित धोका: किडणी प्रत्यारोपणानंतरच्या संभावित धोक्यांमध्ये, शरीराने नवी किडणी न स्वीकारणे- किडणी रिजेक्शन, संसर्ग होणे, ऑपरेशनसंबंधी धोक्यांबाबत भीती वाटणे आणि औषधांचा दुष्परिणाम होणे यांचा समावेश आहे.
औषधाद्वारे उपचार आणि किडणी नाकारणे- रिजेक्शन, किडणी प्रत्यारोपण इतर ऑपरेशन्सपेक्षा कशा प्रकारे वेगळे असते? तर सामान्यपणे इतर ऑपरेशननंतर रोग्याला फक्त सात ते दहा दिवसांपर्यंत नेमून दिलेली औषधे घ्यावे लागतात. परंतु किडणी प्रत्यारोपणाच्या ऑपरेशननंतर किडणी अस्वीकार थांबवण्यासाठी जन्मभर औषधे घ्यावीच लागतात.
किडणी नाकारणे म्हणजे काय? तर रुग्णाच्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशीमध्ये रोगप्रतिकारक पदार्थ अँटीबॉडीज तयार होतात. या अँटीबॉडीज जीवाणूंशी लढा देऊन त्यांना नष्ट करतात. याचप्रकारे प्रत्यारोपित केलेली किडणी शरीराबाहेरील- परकी असल्यामुळे, शरीरातील पांढऱ्या रक्तपेशीत तयार झालेल्या अँटीबॉडीज प्रत्यारोपित किडणीचे नुकसान करू शकतात. या नुकसानीच्या प्रमाणानुसार नवी किडणी खराब होते. यालाच वैद्यकिय भाषेत किडणी रिजेक्शन म्हणजेच किडणी नाकारणे म्हणतात. किडणी प्रत्यारोपणानंतर रिजेक्शनची शक्यता कमी करण्यासाठी उपयोगी औषधे- शरीराच्या प्रतीकारशक्तीमुळे प्रत्यारोपित किडणी अस्वीकृत होण्याची शक्यता असते. जर औषधांनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी केली, तर अस्वीकृतीची भीती राहत नाही. पण रोग्याला जीवघेणा जंतुसंसर्ग होण्याची भीती असते. किडणी प्रत्यारोपनानंतर विशिष्ट प्रकारची औषधे दिली जातात. जी किडणी अस्वीकृती थांबवण्याचे मुख्य काम करते आणि रोग्याची रोगांशी लढण्याची ताकद कायम ठेवते, अशा प्रकारच्या औषधांना इम्युनो सप्रेसंट म्हटले जाते. प्रेडनीसोलोन, एजाथायोप्रिन, सायक्लोस्पोरीन, ट्राकोलीमस आणि एमएमएफ ही अशी मुख्य औषधे आहेत. किडणी प्रत्यारोपणानंतर इम्युनो सप्रेसंट औषधे किती काळ घ्यावी? तर ही खूप महागडी औषधे प्रत्यारोपणानंतर रोग्याला जन्मभर घ्यावी लागतात. सुरुवातीला औषधाचे प्रमाण जास्त वाटते, पण ते हळूहळू कमी होत जाते. किडणी प्रत्यारोपनानंतर आणखी काही औषधे घेण्याची गरज असते का? तर होय, किडणी प्रत्यारोपण केल्यानंतर गरजेनुसार रोग्याला उच्च रक्तदाबावरील औषधे, कॅल्शीअम, जीवनसत्व आदि औषधे घ्यावी लागतात. जर इतर कुठल्याही आजारामुळे औषध घेण्याची गरज पडली. तर, नव्या डॉक्टरला औषध घेण्यापूर्वी रोग्याचे किडणी प्रत्यारोपण झाले आहे, हे सांगावे लागते. तसेच सध्या तो कोणती औषधे घेत आहे हे सांगणे गरजेचे आहे. किडणी प्रत्यारोपणानंतरच्या आवश्यक सूचना- नव्या किडणीच्या देखभालीसाठी महत्वपूर्ण सूचना किडणी प्रत्यारोपित केलेल्या रोग्यासाठी महत्वपूर्ण आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर औषधे नियमित घेतली नाहीत. तर नवी किडणी खराब होण्याचा धोका असतो. सुरुवातीला रोग्याचा रक्तदाब, लघवीचे प्रमाण आणि वजन नियमितपणे मोजून त्याची नोंद करणे गरजेचे असते. रक्त व लघवीची तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे लॅबोरेटरीत जाऊन केली पाहिजे व नियमितपणे नेफ्रोलॉजिस्टकडे तपासणी करून घेतली पाहिजे. रक्त व लघवीचा तपास हा विश्वासपात्र लँबोरेटरीतूनच करणे जरुरीचे असते. रिपोर्टमध्ये जर मोठे बदल दिसून आले, तर लॅब बदलण्याऐवजी नेफ्रोलॉजिस्टला त्वरित कळवले पाहिजे. ताप येणे, पोट दुखणे, कमी लघवी होणे, अचानक वजन वाढणे किंवा इतर काही त्रास होत असेल, तर नेफ्रोलॉजिस्टशी त्वरित संपर्क साधने अत्यावश्यक आहे. किडणी प्रत्यारोपणानंतर जंतूसंसर्गापासून वाचवण्यासाठी सुरुवातीला संसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छ, जीवाणूरहित मास्क घालणे गरजेचे आहे. जो रोज बदलला पाहिजे. रोज स्वच्छ पाण्याने अंघोळ केल्यानंतर उन्हात वाळवलेले आणि इस्त्री केलेले कपडे वापरले पाहिजेत. घर पूर्णपणे स्वच्छ ठेवले पाहिजे. आजारी व्यक्तीजवळ जाता कामा नये. प्रदूषित, गर्दीच्या ठिकाणी म्हणजे जत्रेत वगैरे जाणे टाळले पाहिजे. पाणी नेहमी उकळलेले, थंड करून गाळून प्यायले पाहिजे. बाहेरचे पदार्थ खाऊ नयेत. घरात ताजे बनवलेले जेवण स्वच्छ भांड्यात घेऊनच खावे. खाण्यापिण्यासंबंधी सर्व सूचनांचे पूर्णपणे पालन करावे.
किडणी प्रात्यारोपणाचे कमी प्रमाण: क्रॉनिक किडणी फेल्युअरचे सर्वच रोगी कोणत्या कारणांमुळे किडणी प्रत्यारोपण करू शकत नाहीत? तर किडणी प्रत्यारोपण हा एक परिणामकारक आणि फायदेशीर उपचार आहे. तरीही अनेक लोक या उपचाराचा फायदा घेऊ शकत नाहीत. याची दोन मुख्य करणे आहेत- १) किडणी उपलब्ध न होणे: किडणी बदलू इच्छिणाऱ्या सर्वच रुग्णांना प्रत्यारोपणासाठी कुटुंबातील व्यक्तींची किंवा अन्य कोणाचीही किडणी उपलब्ध न होणे. २) महागडे उपचार: सध्याच्या काळात किडणी प्रत्यारोपणासाठी ऑपरेशन, तपासण्या औषधे, हॉस्पिटलचा खर्च हे सर्व मिळून जवळपास २ ते ५ लाखांपेक्षा जास्त खर्च येतो. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर औषधे आणि तपासण्या करण्याचा खर्चही खूप असतो. पहिल्या वर्षी हा खर्च दरमहा १० ते १५ हजार रुपयांपर्यंत जातो. पहिल्या वर्षानंतर हा खर्च कमी होऊ लागतो. मात्र जन्मभर औषधे घ्यावीच लागतात. अशाप्रकारे किडणी प्रत्यारोपण ऑपरेशन आणि त्यापुढील औषधांचा खर्च हृदयरोगात केल्या जाणाऱ्या बायपास सर्जरीहुनही महागडा असतो. या महागड्या खर्चामुळेच अनेक रोगी किडणी प्रत्यारोपण करू शकत नाहीत. कँडेव्हर किडणी प्रत्यारोपण: ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून निरोगी किडणी फेल्युअर झालेल्या रोग्याच्या शरीरात लावताना केल्या जाणाऱ्या ऑपरेशनला ‘कँडेव्हर किडणी प्रत्यारोपण’ म्हणतात. कुठल्याही व्यक्तीच्या दोन्ही किडण्या जेव्हा निकामी होतात, तेव्हा उपचारासाठी केवळ दोनच पर्याय असतात. डायलिसीस आणि किडणी प्रत्यारोपण. किडणी प्रत्यारोपण यशस्वी झाल्यानंतर रोग्याला कमी पथ्य पाळणे तसेच सर्वसामान्य तर्‍हेने जीवन जगण्याची संधी मिळते. यामुळे किडणी फेल्युअरच्या रोग्यांना चांगले जीवन जगता येते. किडणी प्रत्यारोपणासाठी इच्छुक असलेल्या सर्वच रोग्यांना आपल्या कुटुंबियांकडून किडणी मिळते असे नाही. त्यामुळे डायलिसीसचा मार्ग स्वीकारणाऱ्या रोग्यांची संख्या खूप मोठी आहे. अशा रोग्यांसाठी कँडेव्हर किडणी प्रत्यारोपण ही एकमेव आशा असते. कँडेव्हर किडणी प्रत्यारोपणाची सोय- राज्य आणि केंद्र सरकारने अनुमती दिलेल्या रुग्णालयातच कँडेव्हर किडणी प्रत्यारोपणाची सोय असू शकते. भारतातल्या मुबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, हैद्राबाद आदी ठिकाणी ही सोय उपलब्ध आहे. प्रियजनानी एकमेकांना किडनी दान करण्याची हिम्मत आणि तयारी ठेवली पाहिजे. जेणेकरून किडणीरुग्ण नामोहरम होणार नाहीत.

श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप: ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here