रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर, दि. 1 : जिल्ह्यात जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग यांच्या अखत्यारीत असलेल्या तसेच माजी मालगुजारी तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे या तलावांमधून मत्स्यबीज व मासे वाहून गेल्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याची जाणीव शासनाला असून, मासे वाहून गेलेल्या जिल्ह्यातील तलावांना कुठलेही शुल्क न आकारता एक वर्षाची मुदतवाढ द्या आणि त्यांना शासनाकडून बोटुकली (मत्स्यबीज) खरेदीसाठी आर्थिक मदत करा, असे निर्देश देत मच्छिमार बांधवांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. बोटुकली खरेदीसाठी 14 कोटी रुपयांचे नियोजन करण्याच्या व अंमलबजावणीच्या सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या.
अलीकडेच पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अतिवृष्टी झालेल्या विविध भागाची पाहणी केली. त्यावेळी शेतीच्या नुकसानासोबत मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाबाबत संबंधितांनी निदर्शनास आणून दिले होते. या बाबीची मत्स्यव्यवसाय मंत्री मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेवून मत्स्यव्यवसाय विभागाच्या सर्व महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची तातडीने चंद्रपूर येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी जिल्ह्यातील संबंधित सहकारी मच्छीमार संस्था, मच्छीमार बांधवही उपस्थित होते.
या बैठकीमध्ये नुकसानभरपाई सोबतच जिल्ह्यातील मच्छिमारीबाबतच्या इतर समस्यांबाबतही साधक बाधक चर्चा होऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीसाठी प्रधान सचिव तथा मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार, सहआयुक्त श्री. देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, माजी आमदार अतुल देशकर यांच्यासह मत्स्य विभागाचे अधिकारी आणि मच्छिमार संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मत्स्यव्यवसाय हा रोजगाराच्या दृष्टीने आणि जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांच्या आर्थिक संपन्नतेसाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. मत्स्यव्यावासायात चंद्रपूर जिल्हा “मॉडेल” ठरावा असा माझा प्रयत्न असून यासाठी मच्छिमार बांधवानी, संस्थानी हातात हात घालून संघटितपणे काम करावे असे आवाहन देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील राज्याच्या आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या एक हजार पेक्षा अधिक तलाव ठेक्याना श्री. मुनगंटीवार यांच्या निर्णयाने विनाशुल्क मुदतवाढ मिळणार असून, जिल्ह्यातील तलावामध्ये टाकण्यासाठी आवश्यक 468 लक्ष (4 कोटी ) बोटुकलीची गरज भागविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रधान सचिव (मत्स्य), महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यातील प्रत्येक तलावाचे ऑडिट करण्याच्या सूचना देत मासेमारी करताना उत्पादन क्षमता वाढविणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे याकडे आवर्जून लक्ष देण्याचे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.
मच्छिमार बांधवांच्या अडचणी समजून घेण्यासाठी, सूचना मागविण्यासाठी आणि त्यावर तातडीने योग्य निर्णय घेण्यासाठी विभाग आणि संस्था यांच्यात समन्वय व्हावा याकरिता जिल्हा समिती स्थापन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
*मूल येथे शीतगृह करणार* : मत्स्यविक्री करणारी केंद्रे, मार्केट सर्व सुविधायुक्त करताना तेथे स्वच्छता असावी याची काळजी घ्या, अद्ययावत फिश मार्केट करण्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन करतानाच श्री. मुनगंटीवार यांनी मूल येथे शीतगृह करण्यासाबंधी अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या.
*चंद्रपूरात मच्छिमार बांधवांसाठी प्रशिक्षण केंद्र* : मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवाना व मत्स्यबीज संगोपन यासाठी योग्य प्रशिक्षण मिळण्याची गरज आहे. ही बाब घेत श्री. मुनगंटीवार यांनी आयसीएआर व सीआयएफए या संस्थांशी बोलून, चर्चा करून असे प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरला व्हावे या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
*मच्छिमार कल्याणकारी मंडळ स्थापन करणार* : मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये पुढे आणता यावे दृष्टीने राज्यात मच्छीमार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी नक्की पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छीमार बांधवांना दिले. यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांशी बोलून कार्यवाही करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मच्छीमार बांधवांशी श्री. मुनगंटीवार तसेच मत्स्य व्यवसाय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद साधून उपस्थित केलेल्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले. तातडीने आयोजित केलेल्या बैठकीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांमध्ये एक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.