उपक्षम रामटेके, सह संपादक मो. 98909 40507
चंद्रपूर, दि.31 : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय अनु सूचित जमाती आयोग स्थापन करण्यात आला आहे. वैयक्तिक कुटुंबाला लाभ होईल, अशा योजना जास्तीत जास्त प्रमाणात देणे आवश्यक आहे. आपण सर्वजण जनतेचे सेवक आहोत, त्यांच्या सेवेसाठीच आपली नियुक्ती झाली आहे, याची जाणीव ठेवून आदिवासी लोकांसाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य जतोथु हुसेन यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे अनुसूचित जमातीच्या योजनांचा तसेच अडअडचणीबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मंचावर आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, आनंद रेड्डी, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.
शासकीय योजनांमधून आदिवासी लाभार्थी कुटुंबाला प्रति महिना 15 ते 20 हजार रुपये मिळकत होईल, अशा वैयक्तिक स्वरुपाच्या योजना द्याव्यात, असे सांगून जतोथू हुसेन म्हणाले, आदिवासी मुलांचे शिक्षण चांगल्या पध्दतीने करा. आपण जनतेचे सेवक आहोत, या भावनेतून सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. कोणाचे नुकसान करू नका. याबाबत ग्रामस्तरावरील यंत्रणेला सुचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.