Home महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

136

आजचा दिवस म्हणजे २९ जुलै हा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर वाघांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे म्हणून सेंट पिटरर्सबर्ग येथे झालेल्या व्याघ्र परिषदेत २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात यावा असा ठराव मांडण्यात आला त्याला सर्व देशांनी अनुमोदन दिल्याने हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. वाघ हा जंगलाचा राजा आहे. जंगलातील त्याची निर्धास्त चाल गगनभेदी डरकाळी या त्याच्या गुण वैशिष्ट्यामुळे वाघ हा सर्वांना आकर्षित करणारा प्राणी आहे. जगभरात कोणत्याही अभयारण्यात, जंगलातील सफरीवर गेलेल्या पर्यटकांचे पहिले आकर्षण वाघ दिसण्याचे असते. भारतीय संस्कृतीत तर वाघाला आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. वाघाला जंगलाचा राजा असे संबोधले जाते. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतीक आहे म्हणूनच हिंदू संस्कृतीत वाघ पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासुरमर्दिनीचे व तिच्या अनेक रूपांचे वाहन बनले आहे. वाघ आणि आदिवासी जमातींचा हजारो वर्षाचा संबंध आहे. आदिवासी जमातीत वाघाला देव मानतात. वाघांचा कोप होऊ नये म्हणून ते वाघाला देव मानून त्याची पूजा करतात. वाघांच्या अनेक जाती आहेत. भारतातील पट्टेरी वाघ जगातील वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांपैकी एक मानला जातो. भारत हे वाघांचे माहेरघर मानले जाते. भारताप्रमाणेच आशिया व आफ्रिका खंडातील इतर देशातही वाघांचे अस्तित्व आढळते. पूर्वी वाघांची संख्या खूप होती परंतु मधल्या काळात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. केवळ भारतातच नाही तर जगभरात वाघांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. खेळ, मनोरंजन आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाघांच्या आधीवासावर होणारे मानवी अतिक्रमण तसेच वाघांच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी केली जाणारी शिकार यामुळे दिवसेंदिवस वाघांचे प्रमाण कमी होऊ लागले. वाघांचे प्रमाण इतके कमी झाले की एकेदिवशी वाघांची डरकाळी लुप्त होईल की काय अशी भीती निर्माण झाली. ही भीती अनाठायी नाही. कारण गेल्या काही वर्षात वाघांच्या शिकारीच्या अनेक घटना आपल्या देशात घडल्या आहेत. चार वर्षांपूर्वी झालेल्या अवनी वाघिणीची शिकार कोण विसरेल? अवनी वाघिणीची शिकार झाल्यावर संपूर्ण देश हळहळला होता. अवनी प्रमाणेच गोव्यातही दोन वाघिणींची शिकार करण्यात आली होती. मागील चार वर्षात अनेक वाघांचे मृतदेह वनविभागाला आढळून आले आहेत. वाघ कमी होणे ही धोकादायक बाब आहे कारण जंगलात वाघ असणे हे समृद्ध जंगलाचे लक्षण समजले जाते. जंगलात असलेल्या अन्न साखळीत वाघ हा प्रमुख घटक समजला जातो. वाघांमुळे जंगलातील तृणभक्षी प्राणी व वनस्पती यांच्यात समतोल राखला जातो. वाघ नसतील तर जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या अमर्याद वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल परिणामी निसर्गचक्रच बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकडूतोड करणारे व जंगलावर अवलंबून असणारव लोक भीतीपोटी जंगलात जात नाही त्यामुळे जंगलेही सुरक्षित राहतात. वाघ नाहीसे झाले की जंगलही नाहीसे होतील आणि जंगले नाहीसे झाल्यास निसर्गचक्रच बिघडून जाईल आणि त्याचे दुष्परिणाम केवळ मानवजातीलाच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीला भोगावे लागतील. तसे होऊ द्यायचे नसेल तर वाघांचे अस्तित्व टिकवले पाहिजे. आज या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने वाघांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घ्यायला हवी.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे ९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here