Home चंद्रपूर मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचाररथाला हिरवी झेंडी

मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचाररथाला हिरवी झेंडी

263

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
चंद्रपूर, दि. 18 :राज्य शासनाने 21 ते 65 वयोगटातील पात्र तरुणी व महिलांसाठी ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोहचवून मोठ्या संख्येने यात महिला सहभागी व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात चित्ररथ फिरविण्यात येत आहे. या चित्ररथाला आज (दि.18) जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, सहायक आयुक्त समाजकल्याण बाबासाहेब देशमुख, राजुराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते. राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांचीही प्रचार प्रसिध्दी या चित्ररथाद्वारे करण्यात येणार आहे.

*मुख्यमंत्री वयोश्री योजना :* राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य / उपकरणे खरेदी करणे, तसेच वृध्दांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे.

*मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना :* 12 वी पास, विविध ट्रेडमधील आय.टी.आय., पदविधारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.या योजनेंतर्गत शासनामार्फत शैक्षणिक अर्हता 12 वी पास करीता प्रतिमाह विद्यावेतन 6 हजार रुपये, आय.टी.आय/पदविका करीता प्रतिमहा 8 हजार रुपये तर पदवीधर/पदव्युत्तर करीता प्रतिमहा 10 हजार याप्रमाणे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा विद्यावेतन जमा करण्यात येईल.

*मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना :* महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देण्याची / दर्शनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here