पंढरपूर : (प्रतिनिधी)संतांच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेमध्ये दिसते. भारतीय संविधान आणि संत विचार हे एकमेकांना पूरक असून ते अंगीकारण्याची करण्याची गरज आहे, असे मत संविधान समता दिंडीच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.
संविधान समता दिंडीचा समारोप ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर सांगोला रोड पंढरपूर येथे झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘पंढरीभूषण’चे संपादक शिवाजी शिंदे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, संत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, दर्शन मंदिरचे सेवकराम मिलमिले, कैकाडी महाराज मठाचे प्रमुख भारत जाधव, दादा महाराज पनवेलकर, धम्मकीर्ती महाराज परभणीकर, दिंडी चालक शामसुंदर महाराज सोन्नर, एक दिवस वारीचे प्रवर्तक शरद कदम, विशाल विमल, सुमित प्रतिभा संजय, भारत महाराज घोगरे, समाधान महाराज देशमुख आदी उपस्थित होते. सप्तखंजिरी वादक भाऊ महाराज थुटे, रामपाल महाराज धारकर, गुलाब महाराज यांनी सप्तखंजिरी भजन सादर केले.
संतांच्या समतावादी दृष्टिकोनाचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे, असे मत दादासाहेब रोंगे यांनी व्यक्त केले. 2014 नंतरची देशातील स्थिती पाहता संविधान समता दिंडीची आवश्यकता अधोरेखित होते. या पुढील काळात ही दिंडी अधिक जोरदारपणे निघाली पाहिजे, असे मत शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले. भारतीय संविधानाने आणि संत विचार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वारकरी संप्रदायात आचार आहे आणि संविधान ही व्यवस्था आहे. आचार आणि व्यवस्था एकत्र आले तर देशाला विश्वगुरू होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असे मत भारत महाराज जाधव यांनी व्यक्त केले. संविधान हे वारी आणि दिंडीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे मत पनवेलकर महाराजांनी व्यक्त केले. संविधान समता दिंडीसोबत सर्व वारकरी बांधव असून पुढील काळामध्ये ही दिंडी मोठ्या संख्येने काढू, असे मत परभणीकर महाराजांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोन्नर महाराज यांनी केली. त्यावेळी ते म्हणाले की, भारतीयांना जगण्याचा मार्ग संविधानाने दाखवला असून त्याची पायवाट संतांनी केलेली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाल विमल यांनी केले. भारत महाराज घोगरे यांनी आभार मानले.