Home लेख राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज

113

 

२६ जुन १८७४ शाहू छत्रपतींचा जन्म झाला. त्यांचे वडिल जयसिंगराव व आई राधाबाई. शाहूंचे पाळण्यातले नाव यशवंत. कोल्हापूर संस्थानचे वारस चौथे शिवाजी यांच्या गादीवर छत्रपती शाहू यांची नेमणूक झाली. दि.१७ मार्च १८८४ रोजी शाहू छत्रपती या नावाने दत्तकविधान झाले त्यावेळी त्यांचे वय दहा वर्ष होते. राज्यकारभारात सर्वच जाती-धर्माच्या लोकांची नेमणुक करून समतोल साधला जावा ही शाहू छत्रपतींची इच्छा होती.

कोल्हापूरचे संस्थान हाती घेतल्यावर
प्रशासनात गोरे साहेब, पारशी आणि ब्राह्मण जातीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात असून मोक्याच्या जागा विशेषत: ब्राह्मणांनी बळकावल्या असल्याचे शाहू छत्रपतींच्या लक्षात आले, त्यांच्या जागी हुशार व होतकरु ब्राह्मणेत्तरांना योग्य प्रतिनिधीत्व मिळवून देण्याचा महाराजांनी प्रयत्न केला त्यामुळे नोकरशाहीतील ब्राह्मणी वर्चस्वाला शह बसला. छत्रपती शाहूंनी अनेक शाळा, वसतीगृहे बांधली.

शाहू महाराज सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभास इंग्लंडला गेले असतानाच त्यांनी एक क्रांतीकारक घोषणा केली. २६ जुन १९०२ रोजी महाराजांच्या आदेशानुसार कोल्हापूर गॅझेट मध्ये आरक्षणाची तरतूद करणारी ती घोषणा होती.प्रजाजनांना उच्चशिक्षण संपादण्यास उत्तेजन देण्यासाठी मागासलेल्या वर्गातील उमेदवारांना संस्थानच्या नोकरीत शेकडा ५० जागा राखून ठेवण्याच्या या आदेशाने त्या काळी
ब्राह्मणी वर्चस्वाला चपराक दिली. मागासवर्गीयांना संस्थानच्या नोकऱ्यांमध्ये ५०% जागा राखुन ठेवण्याबाबत शाहू छत्रपतींचा निर्णय, आदेश म्हणजे भारतातील आरक्षण धोरणाचा प्रारंभ होय.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनीसंगीत, चित्रकला, लोककलेतील कलावंतांना राजाश्रय दिला. त्यांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. बहुजन समाजाला राजकिय निर्णय प्रक्रियेत समावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निप्पाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. महाराजांनी १९१७ साली पुनर्विवाहाचा कायदा करुन विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा असण्याची पद्धत बंद केली. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी किंग एडवर्ड ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट स्थापन केले. जातीभेद दुर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. अशा प्रकारे छत्रपती शाहूनी समाजात महत्वाचे बदल घडवून आणले.

शाहू महाराज हे महात्मा फुले व भारतरत्न डॉ.आंबेडकर यांना जोडणारा सांधा होते. पक्षपाती धर्माचे पेकाट मोडणारा छत्रपती राजर्षी नावाचा हा तारा ६ मे १९२२ रोजी अचानक निखळला. छत्रपती शाहू आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याची प्रेरणा मात्र कायम आहे. बहुजनांना विद्यामृत देऊन शिक्षणाचा प्रसार करून त्यांच्या उन्नतीसाठी झटणारे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे, सामाजिक सुधारणेचे कृतिशील पुरस्कर्ते, आरक्षणाचे जनक, समाजाच्या सर्वांगीन उन्नतीचे स्वप्न पाहणारे, बहुजनांचे अभिमान आणि श्रध्दा असणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी त्यांच्या थोर कार्यास, दिलेल्या विचारास विनम्र अभिवादन..!
…पंकज वसंत पाटील
मलकापूर जि.बुलढाणा
मो.9850430579

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here