Home गडचिरोली बहुजनांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार-खासदार डाॅ.नामदेव किरसान यांचे प्रतिपादन

बहुजनांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणार-खासदार डाॅ.नामदेव किरसान यांचे प्रतिपादन

104

 

देसाईगंज-देशात लोकशाही विरोधी शक्ती डोके वर काढुन बहुजनांचे अबाधित अधिकार संपवण्याच्या मार्गावर होते. यामुळे संविधान धोक्यात येण्याची शक्यता बळावली असतांना बहुजनांनी पार पडलेली लोकसभा निवडणुक आपल्या हातात घेऊन बहुजनांच्या अधिकारांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून भरघोस मताने निवडून दिलात.तो टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डाॅ.नामदेव किरसान यांनी केले.
ते देसाईगंज येथील गोंडवाना गोटूल भुमी समिती व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा देसाईगंजच्या वतिने आयोजित सत्कार संभारंभाला उत्तर देतांना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा देसाईगंजचे अध्यक्ष किशोर कुंमरे,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,काँग्रेस कार्यकर्ते रामदास मसराम,मनोहर पोरेटी,छगन शेडमाके,पिंकु बावणे,संजय करंकर,लिलाधर भर्रे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान डाॅ.किरसान पुढे बोलतांना म्हणाले की आदिवासी संस्कृती ही जगातील आदर्श संस्कृती असुन देशातील जल,जंगल जमिनीचे संरक्षण व संवर्धन करण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे.मात्र वर्तमान स्थितीत आदिवासींच्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न केल्या जात असुन संविधानीक मिळालेल्या ७.५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करणे तर दूरच आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासूनच रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.त्याच धर्तीवर ओबीसींना देखील डावलण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.हा संभाव्य धोका ओळखून समस्त बहुजनांनी एकवटू आपल्या न्याय हक्काची लढाई स्वत: लढली,त्याचाच परिणाम म्हणून लोकप्रतिनीधी पदी वर्णी लागली असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन रतन सलामे यांनी,प्रास्ताविक अनिल मडावी यांनी तर आभार धिरजशाह मडावी यांनी मानले.कार्यक्रमाला आदिवासीच्या एकुण १७ विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here