धरणगाव — येथील लहान माळी वाडा परिसरातील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष भिमराज पाटील यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत नवनियुक्त अध्यक्ष माधवराव पाटील यांच्याकडे पदभार सोपवला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या जुन्या कार्यकारिणीचा ३ वर्षांचा नियोजित कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेमध्ये प्रोसेडिंग बुकमध्ये इतिवृत्त नोंदवून तसेच जुन्या सदस्यांनी रीतसर राजीनामे देऊन सर्व कार्यकारिणी बरखास्त झाली. माजी अध्यक्ष भिमराज पाटील यांनी सांगितले की, ६ वर्ष समाजाने माझ्यावर विश्वास व्यक्त करत भरभरून प्रेम दिले त्याबद्दल मी समाजाचा ऋणी आहे. यानंतर नवीन व्यक्तीला संधी देण्यात यावी असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वच संचालकांनी नवीन लोकांना संधी मिळावी यासाठी नावे देण्याचं आवाहन केलं परंतु दीड ते दोन तासांच्या चर्चेनंतर असा निष्कर्ष निघाला की, जुन्या सदस्यांनी यापूढेही पदभार सांभाळावा. यानुसार फक्त अध्यक्ष बदलण्यात आला व जुनी कार्यकारिणी जशीच्या तशी ठेवण्यात आली. ३ वर्षांसाठी निवडलेल्या नवीन संचालकांची निवड सर्वानुमते समाज बांधवांनी केली तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मावळते अध्यक्ष भिमराज पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष माधवराव पाटील व उपाध्यक्ष दिलीप पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करत पदभार सुपूर्द केला. नवीन कार्यकारिणीत सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील संचालक चुडामण पाटील, कैलास पाटील, दत्तू पाटील, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, भिमराज पाटील, अशोक पाटील, किशोर पाटील, परशुराम पाटील, आनंद पाटील, वाल्मिक पाटील, मंगेश पाटील, जितेंद्र पाटील व शिपाई अशोक झुंजारराव याप्रमाणे राहील.