Home महाराष्ट्र हिंसा विरोध आणि विषमतेवर प्रहार हे संत विचारांचे मूळ – हभप ढोक...

हिंसा विरोध आणि विषमतेवर प्रहार हे संत विचारांचे मूळ – हभप ढोक महाराज

297

अखंड हरीनाम सप्ताहाची उत्साहात सांगता : कै.माणिकराव गुट्टे पुण्यतिथी आध्यात्मिक सोहळ्याने साजरी

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :-
जगाच्या कल्याणाची भूमिका प्रत्येक संताने मांडली आहे. दया, प्रेम, क्षमा आणि शांतीसह भूतदया शिकवणारा संत विचार सामाजिक उन्नतीसाठी महत्त्वाचा आहे. संताना परिवर्तन हवे होते. पण त्यासाठी त्यांना शांतीचा मार्ग महत्त्वाचा वाटत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या अभंग, उपदेश आणि शिकवणीतून विषमतेवर प्रहार केला आहे. म्हणून संत साहित्यात बंड आणि विद्रोह सुध्दा आढळतो. त्यामुळे हिंसा विरोध आणि विषमतेवर प्रहार हे संत विचारांचे मूळ असल्याचे पदोपदी जाणवते, असे प्रतिपादन हभप रामराव ढोक महाराज महाराज यांनी केले.

कै.माणिकराव गुट्टे पुण्यतिथी निमित्त मौजे.बनपिपळा येथे आयोजित रामकृष्ण हरी अखंड हरीनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात प्रवचन करताना ते बोलत होते. याप्रसंगी हभप तुळशीदास महाराज देवकर, हभप मधुकर महाराज सायाळकर, हभप नारायण महाराज पालमकर, हभप दत्तगीर महाराज मरडसगावकर, हभप प्रभाकर नाना झोलकर, हभप अच्युत महाराज दस्तापुरकर आणि हभप अर्जुन महाराज लाड गुरुजी उपस्थित होते.

पुढे बोलताना हभप ढोक महाराज म्हणाले की, जागतिकीकरणाने माणसांमध्ये तुटलेपणाची भावना आली आहे. एकमेकांप्रती ओलावा कमी झाला आहे. आत्मकेंद्री आणि भोगवादी समाजात स्वस्थ, सदाचार आणि नीतीमुल्यांची रुजवणूक करण्यासाठी संतांचे वाड्‌मय महत्वाचे आहे. त्यामुळे वाणीत गोडवा असावा. तो गोडवा वृध्दींगत व्हावा म्हणून हा सोहळा आहे, याची जाणीव ठेवून आपण संत विचारांच्या मार्गाने जायला हवं. तरच जगाच्या कल्याणा हि संताची शिकवण आचरणात येईल. म्हणून त्या दृष्टीने संत साहित्याचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे.
१८ ते २५ मे दरम्यान संपन्न झालेल्या या आठ दिवसीय सप्ताहात चोवीस तास कार्यक्रमाची रेलचेल. सगळीकडे लोकांची तुडुंब गर्दी.‌ हरिनामाचा गजर. टाळ आणि मृदंगाचा जयघोष, असं सारं विलोभनीय चित्र दिसत होतं. लोकांची संभाव्य गर्दी लक्षात घेवून पिण्याचे पाणी, शौचालये, प्रशस्त आसन व्यवस्था, लाऊड स्पिकर, साउंड सिस्टीम, भव्य मंडप उभारण्यात आला होता. ते नियोजन उत्तम ठरले. कार्यक्रम समाप्तीनंतर उपस्थितांनी महाप्रसाद सुध्दा घेतला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

नाम वाटते तितके सोपे नाही. राम म्हण्याला पुण्य लागतं. मरा म्हण्याला पुण्य लागत नाही. संप्रदायाला विचाराचे दारिद्रय कधीचं नव्हते आणि नसेल. ज्ञानोबा-तुकोबा हजारो पिढ्या पुरुन उरतील. मात्र, हल्ली संत आणि आध्यात्मावर बोलल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही. त्यामुळे वैचारिक गोंधळ सुरु आहे, असे स्पष्ट मत हभप अर्जुन महाराज लाड गुरुजी यांनी आपल्या कीर्तनात मांडले.

दरम्यान, तब्बल एक सप्ताह पासून आपल्या घरचा कार्यक्रम समजून अहोरात्र झटणारे माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यालयीन कर्मचारी आणि इतरांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. तसेच दररोज सहभागी होणारे वारकरी, टाळ आणि मृदंगकार यांचेही सहकार्य विसरता येणार नाही. पुढचे काही दिवस तरी मन कायम आध्यात्मिक सप्ताहाच्या गोड आठवणीत रमेल, असे स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी विविध पक्षाचे वरिष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार, आप्तेष्ट, नातेवाईक, पत्रकार, मित्र मंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह वारकरी संप्रदायातले अनेक नांमकित कीर्तनकार, प्रवचनकार, वाद्यवृंद, वारकरी, टाळकरी आणि भाविक-भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

चौकट क्र.१

भक्तीला जात नसते – हभप प्रभाकर नाना झोलकर

वाढत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात समाज माध्यम प्रभावी झाले आहे. तिथे काही व्यक्ती मुक्तपणे लिहितात. मात्र, त्या लिहिण्याला अनेकदा धर्म, जात, विचारधारेच्या मर्यादा असतात. वरवर छान दिसणाऱ्या गोष्टींच्या अंतरंगात डोकावून पाहिले असता, वेगळीच परिस्थिती नजरेस पडते. त्यामुळे संत मंडळींना सुध्दा जातीय चौकटीतून पाहाणारे लोक वाढत आहेत. परंतु विश्वाच्या कल्याणाचं मागणं मागणाऱ्या संतांना जातीचे लेबल लावणे चुकीचे आहे. कारण, अध्यात्म किंवा भक्तीला जात नसते, असे स्पष्ट मत हभप अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here