Home लेख पंजाबच्या गदर उठावाची योजनाकर्ते! (देशभक्त रासबिहारी बोस जयंती विशेष.)

पंजाबच्या गदर उठावाची योजनाकर्ते! (देशभक्त रासबिहारी बोस जयंती विशेष.)

61

 

रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक नेते होते. गदर मुक्ती आणि नंतर भारतीय राष्ट्रीय सेना या संस्थांचे ते मुख्य संयोजक होते. रासबिहारींना सुरुवातीपासूनच क्रांतिकारी कृतीत रस होता. सुरुवातीची काही वर्षे रासबिहारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात राहिले. त्यांनी सन १९०८मध्ये अलिपोर बॉम्बचा खटला चालविण्यासाठी बंगाल सोडले. डेहराडून येथे त्यांनी वन संशोधन संस्थेमध्ये प्रमुख कारकून म्हणून काम केले. तेथे युगंतरच्या अमरेन्द्र चटर्जीद्वारे ते गुप्तपणे बंगालच्या क्रांतिकारकांसोबत सहभागी झाले. त्यांची ओळख युनायटेड प्रॉव्हिन्सेस- सध्याचे उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील आर्य समाजातील अनेक प्रमुख क्रांतिकारी सदस्यांशी झाली. रासबिहारींच्या नेतृत्वाखाली दि.२२ डिसेंबर १९१२ रोजी लॉर्ड हार्डिंग हे किंग जॉर्ज पाचव्याच्या दिल्ली दरबारमधून परत येत असताना त्यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. अमरेंद्र चॅटर्जींचे शिष्य बसंतकुमार विश्वास यांनी मणिंद्रनाथ नायक यांनी बनवलेला बॉम्ब हार्डिंगच्या हौदात फेकला. पण या हल्ल्यात हार्डिंग बचावले. हा कट फसला व त्यानंतर राशबिहारींना अज्ञातवासात जावे लागले. जवळपास ३ वर्षे रासबिहारींनी ब्रिटिश सरकारला यशस्वीपणे हुलकावणी दिली. या दरम्यान ते गदर कटात सामील झाले. तद्नंतर ब्रिटिशांनी त्यांचा कसून शोध सुरू केला. पुढील कार्यासाठी त्यांनी जपानला पलायन केले होते.
रासबिहारी बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त होते. त्यांचा त्यांना दि.२५ मे १८८६ रोजी सुबलदाह, बर्धमान जिल्हा, बंगाल प्रेसिडेंसी येथे झाला. विद्यार्थी दशेतच चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारी गटात हे सहभागी झाले. श्रीष घोष व अमरेंद्र चटर्जी यांनी त्याला क्रांतिदीक्षा दिली होती. मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी त्याला पुढे सिमल्याला आणले. घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले. दोन्हीत चांगली प्रगती झाल्यावर आपल्याच छापखान्यात चिकटवून दिले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात रासबिहारींनी नोकरी धरली. सन १९०८पासून १९१३पर्यंत वारंवार रजा घेत असूनसुद्धा कशीबशी नोकरी टिकली. त्या वेळी बंगालच्या अनेक शहरांतून त्याचप्रमाणे बनारस, दिल्ली, लाहोर इ. शहरांतून क्रांतिगट कार्यरत होते. प्रत्येक गटात एक तरी बंगाली असायचाच. त्यामुळे रासबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. सन १९१२च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बाँब व बाँब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. बसंतकुमारला आपल्या घरी बरेच महिने ठेवून पूर्ण संधी दिली. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बाँब टाकण्याची योजना आखली. बंसतकुमार तयार झाल्यावर त्यास लाहोरला धाडले. २३ डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी रासबिहारी डेहराडूनहून व बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले. एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले. दुसर्‍या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयसाहेबांवर बसंतने बाँब फेकला. हार्डिंगना गंभीर इजा झाली. पुढे रासबिहारींनी पुरविलेल्या बाँबच्या साहाय्याने व बसंतकुमारच्या मदतीने लाहोर गटाने खळबळ उडवली. पण पुढे दिल्ली कटाच्या खटल्यात बसंतकुमारसह चौघांना फाशी देण्यात आली.
गदर चळवळ सन १९१४च्या महायुद्धानंतर सुरू झाली. गदर क्रांतिकारकांच्या हालचाली सॅन फ्रॅन्सिस्कोपासून पंजाबपर्यंत पसरल्या होत्या. विष्णुपंत पिंगळे बनारस गटाचे साह्य घेण्यासाठी रासबिहारींना बनारसलाच भेटले. ज्या पंजाबमध्ये मुख्य उठाव योजिला होता, तेथेच समर्थ नेतृत्वाची उणीव होती. पिंगळ्यांच्या विनंतीवरून रासबिहारींनी पंजाबच्या गदर उठावाची योजना तयार करण्याचे मान्य केले. अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन, चाणाक्षपणा, हजरबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी असल्यामुळे ते पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहू शकले. शेवटी जून १९१५मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले होते. जपानी सरकारने त्यांना पकडण्याचे व ब्रिटिशांच्या हवाली करण्याचे हुकूम काढले. तेव्हा ते तेथेही अज्ञातवासात गेले. पुढे जपानी युवतीशी विवाह केल्यामुळे काही वर्षांनी म्हणजे सन १९२३ साली त्यांना जपानी नागरिकत्व मिळाले. पुढील १८-१९ वर्षे त्यांनी लेखन-भाषणाद्वारे हिंदी स्वांतत्र्याच्या प्रश्नावर जपानी जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न केला. रासबिहारींचा तरुण मुलगा महासिदे जपानी फौजेत होता. त्याला ब्रिटिश सेनेशी झालेल्या लढाईत वीरमरण आले. दुसरे महायुद्ध चालू असतानाच त्यांनी देह ठेवला. त्यांची पत्नी शोभा व मुलगी टेटूकी पुढे जपानमध्येच स्थायिक झाल्या. रासबिहारी बोस यांचा मृत्यू टोकियो, जपान येथे दि.२१ जानेवारी १९४५ रोजी झाला.
!! जयंती निमित्त त्यांना व त्यांच्या देशभक्तीला मानाचा मुजरा !!

श्री के. जी. निकोडे- केजीएन.
गडचिरोली,
व्हा. नं. ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here