दत्तकुमार खंडागळे,संपादक वज्रधारी, 9561551006
परवा सांगली येथे महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विश्वजीत कदमांना टोला मारताना, “स्टेजवर एक आणि खाली एक वागू नका !” असे म्हंटले होते. त्यांनी केलेले सदरचे वक्तव्य ऐकून मराठी चित्रपटातील एक जुणे गीत आठवले. ‘कसं काय पाटील बरं हाय का ? काल काय ऐकलं ते खरं हाय का ?” खरेतर या गीतातले जे पाटील आहेत त्यांना ज्या अर्थाने उद्देशून हे गीत गायलय तो उद्देश इथे नाही पण जयंतरावांनी आपल्या भाषणात, स्टेजवर एक आणि खाली एक करू नका ! असे जे आवाहन केले आहे त्या आवाहनाच्या निमित्ताने या गीताची आठवण झाली. जयंतरावांनी हे बोलावं ? याच आश्चर्य वाटलं. स्टेजवर एक आणि खाली एक हा प्रकार जयंतराव पाटलांना माहितच नाही अशा अविर्भावात ते बोलत होते. जयंतराव त्यांचा सुप्रसिध्द “करेक्ट कार्यक्रम” ते स्टेजवर बोलून कधीच करत नाहीत. सावज त्यांच्या टप्प्यात आल्यावरच ते करेक्ट कार्यक्रम करतात असे त्यांनीच सांगितले आहे. टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा म्हणजे विश्वासघाताने, कपटाने व फसवून. सावज टप्प्यात येईपर्यंत दबा धरून बसायचं. टप्प्यात आलं की त्याची शिकार करायची हा जयंतरवांचा फंडा. असा फंडा वापरणारे जयंतराव स्टेजवर जे बोलतात तेच खाली करतात का ? याचं उत्तर जयंतरावांनीच स्वत:ला द्यावे. त्यामुळेच कसं काय पाटील बरं हाय का ? काल काय ऐकल ते खरं हाय का ? असं म्हणाव वाटलं. बाकी जयंतराव कुठे काळीज विसरून आलेत अस आम्हाला नाही म्हणायचं. उगीच कुणाचा गैरसमज नसावा.
खरेतर सांगली जिल्ह्यात जयंतराव पाटील, आर आर पाटील, पंतंगराव कदम हे तगडे नेते. हे तिघेही नेहमीच राज्याच्या मंत्री मंडळात राहिले आहेत. दिर्घकाळ मंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. तिघेही मात्तबर, तिघांचाही सरकारमध्ये दबदबा. आर आर पाटील व पंतगराव कदम गेले. त्या दोघांचा मृत्यू झाला. आता अवघ्या जिल्ह्यात सगळ्यात तगडे, ताकदवर आणि जेष्ठ नेते म्हणून जयंतरावांच्याकडे जिल्हा बघतो. जयंतराव पाटलांची ओळख राज्यात आहे. ते सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भविष्यात जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालीच तर ते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील. असे असताना त्यांच्या स्वत:च्या सांगली जिल्ह्यात काय स्थिती आहे ? जयंतरावांची ताकद संपुर्ण जिल्हाभर आहे काय ? त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांचा अवघ्या राज्यात दबदबा होता. कॉंग्रेस पक्षात त्यांचा स्वत:चा त्यांना माणणारा गट होता. आज जिल्हाभर जयंतरावांच्या मागे जी काही लोकं आहेत ती राजारामबापूंनी मिळवलेली पुंजी आहे. यात जयंतरावांचे योगदान शुन्य. बापूंचे पुत्र जयंतराव म्हणून त्या गटाचे अनेकजण जयंतरावांच्या सोबत आहेत. कारण आजही या लोकांची राजारामबापू यांच्याशी जुळलेली नाळ तुटलेली नाही. पण जयंतरावांनी त्या गटातील माणसं सोडून स्वत:ची नवी माणसं किती कमावली ? नव्याने किती जोडली ? हा विषय अभ्यासाचा आहे. इस्लामपुरची नगरपालिकाही त्यांच्याकडून गेली. ती का गेली ? कशामुळे गेली ? याचं चिंतन जयतराव पाटील करणार का ? याचं चिंतन जयंतराव पाटलांनी प्रामाणिकपणे केले तर ते स्टेजवर जे बोलतात तसे वागतात का ? याचं उत्तर त्यांना मिळून जाईल.
लोकसभेच्या निमित्ताने जे राजकारण घडलं त्या बाबत जयंतरावांनी कितीही ओरडून सांगितले तरी त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. जयंतराव आज जिल्ह्याच्या राजकारणात खलनायक ठरले आहेत. ते खलनायक का ठरले ? सांगली जिल्हा त्यांच्यावर विश्वास ठेवायला का तयार नाही ? या एकूण राजकारणात त्यांच्याकडेच संशयाने का पाहिल जातय ? जिल्ह्यात अजून इतर अनेक नेते आहेत मग एकट्या जयंतरावांनाच खलनायक का ठरवलं जातय ? त्यांच्याकडेच संशयाने का पाहिलं जातय ? याच प्रामाणिक उत्तर जयंतराव पाटलांनीच द्यावे.
जयंतराव पाटील मोका बघून व टप्प्यात घेवून दुस-याचा कार्यक्रम करायला गेले पण आज स्थिती वेगळी आहे. त्यांचाच कार्यक्रम होतोय की काय ? अशी स्थिती आहे. लोकमानस वेगळे आहे. लोकाच्या मनातला कौल वेगळा आहे. परवाच्या सांगलीतील सभेत जयंतराव म्हणाले, “लोक काय म्हणतायत ते बघू नका. लोक काय म्हणतायत ते महत्वाचं नाही !” जयंतराव, लोक काय म्हणतायत ते महत्वाच नाही तर मग तुमचं आडवा-आडवीचं आणि जिरवा-जिरवीचं राजकारण महत्वाचं आहे काय ? असा प्रश्न या निमत्तानं पडल्याशिवाय रहात नाही. जयंतरावांच्या दुटप्पी राजकारणाला कंटाळलेल्या लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. जयंतराव तुम्ही दुस-याचा कार्यक्रम करायला गेलात पण या निवडणूकीत जनता तुमच्या फेवरेट “करेक्ट कार्यक्रमाचाच” करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं चित्र दिसतय. जयंतराव पाटलांनी भाजपाची सुपारी घेतली आहे असे लोक का बोलतायत ? या प्रकाराचा खुलासा जयंतरावांना स्टेजवर का करावा लागला ? “मी नाही त्यातली !” अशी सारवासारव करण्याची वेळ जयंतरावांच्यावर का आली ? पण या सगळ्या धकाधकीत महाविकास आघाडीचा म्हणजे धर्मनिरपेक्ष विचारांचाही कार्यक्रम होतोय याची खंत वाटते. जयंतराव पाटील सांगली जिल्ह्याचे नेते झाले असते पण त्यांना नाही होता आलं. ते स्टेजवर आणि खाली जे बोलतात तसच वागत असते तर आज त्यांना अवघ्या जिल्ह्याने डोक्यावर घेतले असते. जिल्ह्यातले सगळे राजकारण त्यांच्या इशा-यावर चालले असते पण असे होत नाही. त्यांनी ज्यांना हाताला पकडून राष्ट्रवादीत आणले, ज्यांना अनिल बाबरांना शह देण्यासाठी ताकद दिली ते सदाशिव पाटील आणि वैभव पाटीलही त्यांना सोडून अजित पवारांच्या सोबत गेले. जयंतरावाची क्षमता मोठी आहे. ते हूशार आहेत, अभ्यासू आहेत. त्याची ताकद आहे, वारसा आहे. त्यांनी मनात आणल तर या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलू शकतात, जिल्ह्याचे एकमुखी नेतृत्व करू शकतात. पण त्यांना कार्यक्रमाचा लयच नाद आहे. त्यामुळे असं नाही होणार. आजवर ज्यांचे ज्यांचे कार्यक्रम लावले आणि लागले ते सगळे कार्यक्रमाच्या तयारीला लागल्याचे दिसते आहे.