_श्री गजानन महाराजांना वंदनीय असलेले संत गोमाजी महाराज होत. ते भगवान श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त होते. शेगावचे संत श्री गजानन महाराज हे देखील ज्यांना वंदन करायचे, असे विदर्भातील थोर संत म्हणून श्री गोमाजी महाराज यांचा परिचय आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या शेगावीच्या गजानन महाराज यांच्या पालखीचा पहिला मुक्काम श्री गोमाजी महाराज संस्थान नागझरी येथे असतो. आज या संत गोमाजी महाराज यांचा वार्षिक यात्रोत्सव आहे. अधिक माहिती श्रीकृष्णदास निरंकारी- बापू यांच्या सदर लेखातून वाचा… संपादक._
श्री क्षेत्र शेगांवपासून अवघ्या ६ किलोमीटरवर मन नदीच्या तीरावर श्रीक्षेत्र नागझरी वसलेले आहे. येथे श्री संत गोमाजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. श्री नागेश्वराचे पुरातन मंदिर आणि अखंड झुळझुळणारे पाण्याचे पवित्र झरे यामुळे या गावाला “नागझरी” हे नाव मिळाले. श्री गोमाजी महाराज कृष्णभक्त होते, पण त्यांची पंढरपूरच्या विठ्ठलावर प्रगाढ श्रद्धा होती. शेगाव येथून श्री संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. त्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम याच नागझरी मंदिर परिसरात असतो. संत श्री गजानन महाराज हे देखील पंढरपूर येथे वारीसाठी जाताना नागझरी इथं आवर्जून थांबायचे आणि संत श्री गोमाजी महाराज यांचे दर्शन घ्यायचे, असे भाविक सांगतात. गोमाजी महाराजांनी गजानन महाराजांच्या रुपात पुन्हा अवतार घेतला, असेही भक्त मानतात. श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये गोमाजी महाराजांच्या सर्व लीला संकलित केल्या आहेत. संतश्रेष्ठ गोमाजी महाराज यांच्यावरील एक आरती प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी केलेल्या अनेक लीलांचा समावेश आहे. त्यांच्यामुळे नागझरी येथे जणू पंढरी अवतरली, अशी कल्पना मांडण्यात आली आहे. त्यामुळे गोमाजी महाराज यांचा जनमाणसावरील प्रभाव आणखी ठळक होतो.
“जयजयाजी महाराज जयजय सद्गुरू गोमाजी।
भावभक्तीनें विठ्ठल तुम्हीं ठेवियला राजी।।”
(संत गोमाजी महाराज आरती: चरण क्र. १ व २.)
संतशिरोमणी गोमाजी महाराज हे कोण? ते कोठून आले? नागझरी येथे त्यांचे कसे वास्तव्य झाले? याबद्दल ठोस अशी माहिती उपलब्ध नाही. पण, काही भाविकांच्या मते, करंजपूर- कारंजा येथील प्रख्यात स्वामी नरसिंह सरस्वती त्यांच्या सात शिष्यांसह नागझरी येथे आले. त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी गोदावरी स्नान घडावे, म्हणून त्यांनी गोदावरीला आवाहन केले. त्यानंतर तेथे गोदावरी आली आणि सोबतच नागेश्वर, त्र्यंबकेश्वर, विश्वेश्वर, सोमेश्वर आणि गुप्तेश्वर ही पाच स्वयंभू शिवलिंगे प्रगट झाली. कालांतराने याच ठिकाणी श्री गोमाजी महाराज नावाचे साक्षात्कारी संत अवतरले आणि त्यांच्याच प्रभावाने नागझरी हे गाव श्रीक्षेत्र म्हणून लौकिकास आले.
“देहू, आळंदी, पैठण, चाफळ, तेर वा अरण।
त्याच परीचें झालें आम्हां नागझरी स्थान।।”
[संत गोमाजी महाराज आरती: चरण क्र. ३ व ४.]
गुरू-शिष्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुक्ताईनगर येथील मुक्ताई-चांगदेव यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी संत गोमाजी महाराज यांची पालखी नागझरी येथून निघते. प्रस्थान ठेवल्यानंतर शेगावपासून ते मुक्ताईनगरपर्यंत प्रत्येक ठिकाणी पालखीची मानाची पूजा केली जाते. ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. शेगाव संस्थानची खरी प्रगती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, ते कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या कुटुंबीयांचे गुरू म्हणून श्री गोमाजी महाराज ओळखले जातात. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानप्रमाणेच श्री गोमाजी महाराज संस्थानचा कारभारदेखील सचोटीने केला जातो. अनेक धार्मिक-आध्यात्मिक तसेच, समाजाभिमुख कार्यक्रम संस्थानद्वारे केले जातात. त्यामुळेच श्री गोमाजी महाराज संस्थानने पंचक्रोशीत स्वतंत्र ठसा उमटवला आहे. अलीकडच्या काळापर्यंत या गावात नैसर्गिक पाण्याचे झरे होते. त्यामुळे हे गाव “नागझरी” म्हणून ओळखले जाऊ लागले. श्री संत गोमाजी महाराजांचे भव्य मंदिर, अद्भूत गोमुख कुंड, स्वयंभू शिवलिंगाची पाच हेमाडपंथी शिवमंदिरे आणि निसर्गरम्य परिसर यामुळे नागझरी हे गाव एक तीर्थक्षेत्र तसेच, पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक-पर्यटक येतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतो.
“अवघ्या संता-ठायीं आम्हां तव हे द्वयचरण।
फार कशाला बोलावें हो तुम्हीच भगवान ।।”
(संत गोमाजी महाराज आरती: चरण क्र. ५ व ६.)
अशा शब्दांत गोमाजी महाराज यांची महती वरील आरती काव्यात वर्णिली आहे.
!! गोमाजी महाराज यांच्या भक्तीमार्ग शिकवणीस त्यांच्या यात्रोत्सवानिमित्त त्यांना दंडवत प्रणाम !!
– संकलन व सुलेखन –
संतचरणरज: श्रीकृष्णदास निरंकारी- बापू.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.