


विदर्भात विशेष बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात ज्याचा बाप बाबासाहेब आहे तेच विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर याच्या परिवार सोबत प्रामाणिक पणे जोडल्या गेले आहेत.बाकी आंबेडकर चळवळीचे अनेक गट ज्यांना माय बाप नसल्या सारखे आहेत. आणि ते स्वताचे पोट भरण्यासाठी संघटना पक्ष चालवतात. व समाजाची दिशाभूल करणाऱ्यांसाठी उद्योग धंदे करीत असतात. हे कोणत्याही निवडणुका लागल्या की जीवतोडून कामाला लागतात. यांना आपल्या झोपडीत राहणारा रोजगार हमी वर काम करणारा शेतमजूर,नाका, कामगार, बांधकाम कामगार ३६५ दिवस श्रम विकून पोट भरणार यांचा सारखा लाचार बेइमान वाटत असतो. म्हणूनच तो आपल्याच समाजाच्या प्रामाणिक इमानदार नेत्याला बदनाम करून राजकारणातील जात दांडगे धन दांडग्या नेत्याच्या पक्षाचे समर्थन करीत असतो.प्रकाश आंबेडकरच्या वंचितने महाविकास आघाडी तोडली?.असा प्रचार प्रसार कोण करीत आहेत. यांना आज पर्यन्त साप नाथ,नागनाथ यातील फरक समजला नाही. ते येडे बोंगाडे आणि सुशिक्षित दीड शहाणे सर्व सामान्य जनतेत चर्चा करतांना आणि सोशल मिडियावर पोस्ट शेयर करतांना दिसतात. यांना एवढी अक्कल नाही की आपण कोणाच्या घरात कोणाची बाजू घेऊन गैरसमज निर्माण करीत आहोत. कारण कॉपी करण्यासाठी अक्कल लागते. यांची अक्कल गहान ठेवली आहे असे लिहले तर चुकीचे ठरणार आहे काय?
राजकारणात अनेक जातीचे विचारांचे पक्ष असून त्यांच्या मताने फारसा फरक पडत नाही. कारण ते कोणत्या ही गणती पकडल्या जात नाहीत. कारण त्यांचे योगदानाची नोंद झालेली असते. वंचित बहुजन आघाडीने नवीन नोंदणी असतांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लाखात मत घेतले. राज्यात मध्ये दोनच आंबेडकरी विचारांचे पक्ष होते, वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी. ज्यांची इतर राजकिय पक्षांना भीती वाटते.ते हार जित करण्यासाठी लढत नाही. तर समाज परिवर्तन एक मिशन म्हणूनच लढतात. त्याच्याकडे जात दांडगे, धन दांडगे राजकिय वर्चस्व असणारे प्रस्थापित नेते नाहीत.आणि त्यांच्याकडे गमावण्या सारखे काहीच नसते. हे लक्षात ठेवले पाहिजे.प्रकाश आंबेडकरच्या वंचितने महाविकास आघाडी तोडली? असा प्रचार करणाऱ्यांनी त्यांना कशी वागणूक दिली आणि कशा खोट्यानाट्या बातम्या पेरल्या याची माहिती घ्यावी आणि द्यावी.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आता महाराष्ट्रात फक्त वंचित बहुजन आघाडी ताकतवान आहे. असे सर्वच राजकीय पक्षांना का वाटत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी उभी फुटली तुटली तिची शक्ती कमी झाली असे कोणालाच का वाटत नाही. काँग्रेस राज्यात नव्हे तर देशात अनेक आघाडीवर अपंग झालेली आहे.त्यांचे अनेक भ्रष्टाचारी नेते जेल मध्ये जाण्याच्या भितीने भाजपात गेले आहेत. उलटपक्षी जमेची बाजू आहे. म्हणून आता आपला वंचित बहुजनाचा एक मोठा पक्ष आपल्यासाठी तयार आहे.असे बुद्धिजीवी विचारवंत साहित्यिक, लेखक, पत्र लेखक, मच्छर मारणारे पॅंथर यांना स्वाभिमानी बनावे असे का वाटत नाही. या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेला संदेश आणि मान्यवर कांशीराम जी यांनी केलेली अंमलबजावणी लक्षात घेतली पाहिजे. जोपर्यंत आपण राजकारणात यशस्वी होत नाही आणि आपल्या हातात सत्ता येत नाही तोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक बदल शक्य नाही. राजकीय सत्ता ही यशाची गुरुकिल्ली आहे.सत्ता स्थापनेसाठी जनआंदोलनाची गरज असते, त्या जन आंदोलनातुन मतदार तयार करणे.मतदारामुळेच लोकप्रतिनिधीचे सीट बदलतील,त्यानंतर प्रतिनिधी निवडून जातील. हेच यांचे लक्ष असायला हवे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन समाजाच्या मताची किंमत कॉग्रेस ला कळली आहे. त्यांची मक्तेदारी आणि माज त्यामुळे उतरला असा समज आहे. म्हणूनच तेच जास्त वंचित ला अडचणीत आणि बदनाम करण्याचे काम करीत आहेत.त्याला पारंपरिक सालदार लाचार, बुद्धिजीवी विचारवंत साहित्यिक लेखक साथ देऊन वंचित बहुजन समाजात प्रकाश आंबेडकरच्या वंचित बद्दल गैरसमज निर्माण करीत आहेत. आणि प्रकाश आंबेडकरच्या वंचितने महाविकास आघाडी तोडली?.असे सांगत सुटले आहेत.
राज्यात देशात जे छोटे छोटे पक्ष तयार झाले आहेत,ते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आशीर्वाद घेऊन जन्मास आले आहेत.त्यांना साधन आणि प्रसिद्धी कोणामुळे मिळते. आणि तेच प्रचार करतात की तुमचे गट आहेत.तुम्ही लोक मग काँग्रेस व इतर पक्षांना वोट करतात. तुमचा एक मोठा पक्ष तयारच होऊ देत नाहीत. म्हणजेच तुम्ही घाबरट लोक आपल्या विरुद्ध जनमत तयार करता. आम्हीच आमची बदनामी करतो गैरसमज निर्माण करतो. हे थांबवले पाहिजे. आणि आम्ही हारणारे नंतर हारवणारे आणि जिंकणारे बनले पाहिजे. वंचित बहुजन समाजाला सर्वच पक्षाच्या फाटाफुटीचा फायदा घेऊन,भ्रष्टाचारात गुंतलेल्या पक्षांना आणि नेत्यांना धडा शिवण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. प्रकाश आंबेडकरच्या वंचितने महा विकास आघाडी तोडली या प्रचाराला बळी पडू नये.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वपक्षांची एकजूट होती.तेव्हा त्यांना वंचित बहुजन आघाडीने टक्कर दिली. यावेळी आघाडी आणि युतीची अंतर्गत धुसपूस,ईडी,इन्कमटॅक्स ची भीती बड्याबड्या नेत्यांना रात्री शांत झोप लागत नाही. त्यामुळे त्यांना गेल्यावेळचा २ नंबर या वेळी ३ / ४ वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच वंचित बहुजन समाजाला ही लोकसभा सुवर्ण संधी आहे. आपण २,३ नंबर ला बाजूला करून एक नंबर वर येऊ शकतो यावर वंचित बहुजन समाजाने विश्वास ठेवला तर वेगळा इतिहास लिहला जाईल.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यांना कोणतीच भीती नाही.तुम्ही कालपण कष्ट करून पोट भरत होता.आज पण भरता उद्यापण कष्ट करून पोट भरावे लागेल. वैचारिक लाचारी पत्कारल्यांना स्वाभिमान गहाण ठेवल्या शिवाय जगता येणार नाही.तेच लोक मनुवाद्याची भीती दाखवून घाबरवत असतात. त्यांच्या नादी लागू नका. बाबासाहेबांचे म्हणणे खरे आहे शंभर दिवस शेळी होऊन जगण्या पेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना वंचित बहुजन आघाडीची भीती वाटते हे सर्वच पक्ष मान्य करतात.म्हणूनच वंचित हा एकच मोठा पक्ष सद्य परिस्थितीत आहे हे सर्व समाजाला आणि पक्षाला स्पष्टपणे दिसत आहे. म्हणूनच ते एवढे वर्षाची मक्तेदारी सोडायला तयार नाहीत हे लक्षात घ्यावे.
राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षात मराठा समाजाचे जात दांडगे,धन दांडगे आहेत. म्हणजेच मराठा समाजाचे ५० पक्ष आहेत.पण त्यांच्यात समाजात फुट आहे अशी भावना नाही,किंवा ते एकमेकांना टार्गेट करीत नाही. ते वेगवेगळे लढतांना दिसतात. पण सत्ताधारी बनण्यासाठी रातोरात एक होऊन जिंकतात. बहुजन मात्र शेवट पर्यंत कीस पाडत बसतात. आणि कायमचे मागे मागे पडतात. मग तो इतिहास लिहला जातो. लक्षात ठेवा बहुजन समाजातील वंचित समाजाला प्रकाश आंबेडकर यांनी संधी दिली आहे म्हणूनच बंजारा समाजाचे,मुस्लिम समाजाचे, धनगर,माळी,आगरी, कोळी, तेली, न्हावी,बीवंजारी समाजाचे लोक बाळासाहेबांसोबत आहेत.तेच प्रत्येक जिल्ह्यातील सभा गाजवतात.
वंचित बहुजन समाज म्हणजे कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी,बीशिवसेना यांचा कायम सालदार मजूर आहे काय? यांनाच जिंकवीण्याचा बहुजन समाजाने काय ठेका घेतला का?. बहुजन समाजाने स्वताचे अस्तित्व निर्माण करूच नये अशी यांची मानसिकता का आहे. हे बनविण्याचे आणि टिकविण्याचे काम कोण कोण करत आले यांचा आपण अभ्यास करणार आहोत कि नाही. बहुजनाचा वंचितांचा एक मोठा पक्ष मोठा करायला बुद्धीजीवी विचारवंतांना लाज वाटते काय? प्रकाश आंबेडकरच्या वंचितने महा विकास आघाडी तोडली असा प्रचार का केला जातो याचा विचार बहुजन समाजाने करावे. आणि लोकसभा निवडणुकीत योग्य उमेदवार निवडावा. मी कोणत्याही पक्षाचा अधिकृतरीत्या कार्यकर्ता नाही. १९८२ पासून असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठे साठी लढणाऱ्या सत्यशोधक कामगार संघटनेचे काम करतो. आणि नियमितपणे विविध विषयावर सत्य शोधक,वैचारिक आत्मपरीक्षण निरीक्षण करणारे लेख लिहतो.
सागर रामभाऊ तायडे, भांडूप,मुंबई.
मो. ९९२०४०३८५९













