साहित्य अकादमी ही एक भारतीय भाषांचे संवर्धन करणारी भारतीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना दि.१२ मार्च १९५४ रोजी झाली. या संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत संशोधन, तसेच लेखकांसाठी प्रवास अशा उपक्रमांसाठी अर्थपुरवठा करते. तसेच साहित्य अकादमी पुस्तके व समकालीन भारतीय साहित्य हे हिंदी भाषा भाषेतील नियतकालिक ही प्रकाशित करते. भारतीय साहित्याचा विश्वकोशही साहित्य अकादमी ने प्रकाशित केला आहे. साहित्य अकदामीचे बहुभाषिक व अतिशय समृद्ध असे भारतातील एक प्रमुख ग्रंथालय आहे. भारतीय भाषा साहित्य अकॅडमीने २४ भाषांना मान्यता दिली आहे.
ही भारतीय साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्ये अमलात आणणारी, भारतातील राष्ट्रीय पातळीवरची प्रमुख साहित्यसंस्था आहे. दि.१२ मार्च १९५४ रोजी नवी दिल्ली येथे ही साहित्यसंस्था स्थापन झाली. ही केंद्र शासनाच्या अखत्यारीखालील स्वायत्त स्वरूपाची संस्था असून तिला भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे पूर्णतः आर्थिक अनुदान दिले जाते. १९५६ मध्ये साहित्यसंस्था म्हणून तिची अधिकृत नोंदणी झाली. भूतपूर्व पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. या अकादेमीचे प्रमुख कार्य भारतातील साहित्यविषयक पूर्वसंचिताचे जतन करून, नवीन स्वतंत्र तसेच अनुवादित वाङ्मयाच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे, हे आहे. अकादेमी विविध प्रादेशिक भाषांतील लेखकांना उत्तेजनार्थ पारितोषिके व मानचिन्हे देऊन गौरवीत असते. प्रकाशने, अनुवाद, परिसंवाद, कार्यशाळा, देशाच्या विविध भागांत साहित्यमेळाव्यांचे आयोजन, लेखकांच्या वाचकांशी भेटी घडवून आणणे, असे नानाविध प्रकारचे उपक्रम राबवून त्यांद्वारे भारतीय साहित्याच्या अभिवृद्घीस व विकासास चालना देणे, हे या संस्थेचे उद्दिष्टानुसारी प्रमुख कार्यक्षेत्र आहे. अकादेमीच्या वतीने प्रकाशनांचा विस्तृत व विविधस्वरूपी कार्यक्रम राबविला जातो. भारतीय भाषांतील समकालीन वाङ्मयाची सूची तयार करणे, समकालीन लेखकांच्या उत्कृष्ट व निवडक साहित्यकृतींचे संग्रह प्रकाशित करणे, आधुनिक भारतीय भाषांतील वाङ्मयाचा इतिहास व विकास यांचा विस्तृत आढावा घेणारे प्रमाणभूत ग्रंथ इंग्रजी व हिंदी भाषांत तयार करून घेऊन ते प्रकाशित करणे, प्राचीन संस्कृत महाकाव्ये व पुराणे यांच्या सटीप आवृत्त्या प्रसिद्घ करणे इ.अनेक योजना व उपक्रम अकादेमीने आजपावेतो राबविले आहेत. भारतीय भाषांचे इतिहास प्रकाशित करून भारतातील प्रमुख भाषांच्या विकासाला उत्तेजन देणे व त्यांना जास्तीत जास्त परस्परांच्या सान्निध्यात आणणे, हे उद्दिष्ट अकादेमीने साध्य केले आहे. आपल्या देशातील विविध भाषांचा परिचय सर्वांना असणे शक्य नाही; परंतु भारतातील प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने आपल्या भाषेतील ज्ञानाबरोबरच इतर भाषांतील साहित्याची माहिती करून घेण्याची इच्छा ठेवली पाहिजे. इतर भाषांत लिहिलेल्या ग्रंथांचा, तसेच प्रसिद्घ पुस्तकांचा परिचय करून घेतला पाहिजे व या प्रकारे आपल्या व्यक्तिमत्त्वात भारतीय संस्कृतीचा विशाल व उदार दृष्टिकोण आणि बहुभाषिक प्रेरणा वृद्घिंगत केली पाहिजे, पं.नेहरुंच्या या उद्गारांमध्ये साहित्य अकादेमीच्या कार्याची उद्दिष्टे नेमकेपणाने प्रतिबिंबित झाली आहेत. या प्रक्रियेला मदत म्हणून साहित्य अकादेमीने भारतातील प्रादेशिक भाषांमधील प्रसिद्घ पुस्तकांचे इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्याची व विविध भारतीय भाषांचे इतिहास प्रसिद्घ करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. अकादेमीच्या या प्रयत्नांमुळे आपल्या मातृभाषेतून अन्य विविध भारतीय भाषांतील साहित्याचा आस्वाद घेणाऱ्या वाचकांच्या साहित्यिक- सांस्कृतिक ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याचे, त्या अधिक सखोल करण्याचे आणि भारतीय विचार व साहित्य यांच्यामागील एकात्म पार्श्वभूमीचे त्यांचे भान जागृत करण्याचे अकादेमीचे उद्दिष्ट बव्हंशी साध्य झाले आहे.
आपल्या विविधस्वरूपी उपक्रमांची कार्यप्रणाली व पद्घती निश्चित करण्यासाठी अकादेमीने लिखित संविधान तयार केले असून त्यातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार अकादेमीचे कार्य चालते. अकादेमीने एकूण चोवीस प्रादेशिक भारतीय भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. त्या प्रत्येक प्रादेशिक भाषेतील एकूण दहा सदस्यांचे सल्लागार मंडळ अकादेमीमार्फत स्थापले जाते व त्या त्या प्रादेशिक भाषेतील अकादेमीकृत कार्याचे आयोजन व सुसूत्रीकरण या सल्लागार मंडळामार्फत केले जाते. संबंधित भाषेतील वेगवेगळे उपक्रम, पुरस्कार, अनुवादयोजना राबविण्यासाठी ग्रंथनिवड इ.अनेक बाबतींत हे सल्लागार मंडळ अकादेमीला सल्ला देत असते व त्यानुसार अकादेमी कार्यवाही करते. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चार प्रादेशिक विभागांसाठी वेगवेगळी चार प्रादेशिक विभागीय कार्यालये अकादेमीने स्थापन केली आहेत व त्या त्या प्रादेशिक विभागांतील भाषांमध्ये परस्पर आदान-प्रदान घडवून आणणे, हे या विभागीय कार्यालयांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नवी दिल्ली येथे अकादेमीचे मुख्य मध्यवर्ती कार्यालय असून कोलकाता, मुंबई, बंगलोर व चेन्नई येथे प्रादेशिक विभागीय कार्यालये आहेत. अकादेमीचे चार भाषांतर-विभाग असून ते बंगलोर, दिल्ली, अहमदाबाद व कोलकाता येथे आहेत. बडोदे येथे अकादेमीचे प्रकल्प कार्यालय असून तेथे मौखिक तसेच आदिवासी साहित्याचे जतन व विकासाचे कार्य चालते. भारतीय भाषांतील साहित्याचे अभिलेखागारही तेथे आहे. नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयात तसेच बंगलोर व कोलकाता येथील विभागीय कार्यालयांत बहुभाषिक ग्रंथांचा विपुल, प्रचंड व मौलिक साठा असलेली वैशिष्ट्यपूर्ण व समृद्घ ग्रंथालये आहेत. चोवीस प्रादेशिक भाषांतील सुमारे दीड लाख ग्रंथ हे या संग्रहालयाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय.
साहित्य अकादेमी प्रतिवर्षी मान्यताप्राप्त चोवीस प्रादेशिक भाषांतील सर्वोत्कृष्ट सर्जनशील साहित्यकृतींसाठी चोवीस पुरस्कार व अनुवादित ग्रंथांसाठी चोवीस पुरस्कार देत असते. इंग्रजी भाषिक ग्रंथांसाठीही पुरस्कार ठेवले आहेत. स्वतंत्र साहित्यकृतीसाठी रु.एक लाख आणि मानचिन्ह व अनुवादित कृतीसाठी रु.पंचवीस हजार आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. शिवाय साहित्यातील मौलिक योगदानाबद्दल साहित्यिकांना विशेष गौरववृत्ती दिली जाते. या संदर्भात मराठी साहित्यातील विशेष उल्लेखनीय दोन घटना म्हणजे, साहित्य अकादेमीने सर्वोत्कृष्ट भारतीय ग्रंथांना पुरस्कार देण्याची योजना १९५५पासून सुरू केली. त्या योजनेतील पहिला मराठी पुरस्कार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथाला लाभला, तसेच साहित्य अकादेमीने २००४मधील सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केलेल्या पहिल्या विशेष जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रेष्ठ दलित कवी नामदेव ढसाळ हे ठरले. साहित्य अकादेमीमार्फत भाषा सम्मान हा पुरस्कार प्रादेशिक भाषांच्या विकासकार्यार्थ दिला जातो. दक्षिण आशियाई भाषांतील विद्वानांना आनंद कुमारस्वामी पुरस्कार देण्यात येतो. भारतीय साहित्याच्या संदर्भात विशेष मौलिक कार्य करणाऱ्या परकीय विद्वानांना सन्मान्य गौरववृत्ती दिली जाते. साहित्य अकादेमी एकूण चोवीस प्रादेशिक भाषांत व इंग्रजी भाषेतही पुस्तके प्रकाशित करते. या योजनेंतर्गत भारतीय भाषांतील पारितोषिकप्राप्त पुस्तकांचे अनुवाद, भारतीय साहित्यातील सर्व प्रादेशिक भाषांतील श्रेष्ठ आणि युगप्रवर्तक साहित्यिकांवर, त्यांचे जीवन व वाङ्मयीन कार्यांचा परिचय करून देणाऱ्या व्याप्तिलेखवजा प्रबंधिका, भारतीय प्रादेशिक भाषांचे वाङ्मयेतिहास, भारतीय तसेच विश्वसाहित्यातील श्रेष्ठ, अभिजात साहित्यकृतींची प्रादेशिक भाषांत भाषांतरे, निवडक ललित साहित्यकृतींची उदा. कथा, कविता, निबंध इ. संकलने, चरित्रे, भारतीय साहित्यिकांचे अल्पपरिचयात्मक कोश, अनुवाद-सूची, भारतीय साहित्यकोश इ.विविध प्रकारची पुस्तके अकादेमीने प्रकाशित केली आहेत. या वेगवेगळ्या प्रकारांत अकादेमीने सुमारे ४ हजार पुस्तके प्रकाशित केली आहेत. विशेष संदर्भमूल्य असलेल्या, अकादेमीमार्फत प्रकाशित काही महत्त्वाच्या ग्रंथांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल- एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडियन लिटरेचर पाच खंड- १९८७-९२ हा भारतीय साहित्यकोश; नॅशनल बिब्लिंऑग्रफी ऑफ इंडियन लिटरेचर- चार खंड: १९०१-५३ ही राष्ट्रीय ग्रंथसूची; निरनिराळ्या प्रादेशिक भाषांतील विद्यमान लेखकांचा अल्पपरिचय करून देणारा हूज हू ऑफ इंडियन रायटर्स- दोन खंड: १९९९; डॉ.सुकुमार सेनकृत हिस्टरी ऑफ बेंगॉली लिटरेचर- १९६० यांसारखे भारतातील प्रादेशिक भाषांतील साहित्याचे इंग्रजी, हिंदी भाषांतील इतिहास; मेन ऑफ लेटर्स तसेच मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर अशा ग्रंथमालांतर्गत भारतीय साहित्याच्या इतिहासातील महत्त्वाच्या टप्प्यांवरील युगप्रवर्तक अशा प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन साहित्यिकांचे जीवन व वाङ्मय यांचा परिचय करून देणारी इंग्रजी पुस्तकांची मालिका, याशिवाय साहित्य अकादेमीतर्फे इंडियन लिटरेचर- इंग्रजी भाषेतील द्वैमासिक, समकालीन भारतीय साहित्य- हिंदी भाषेतील द्वैमासिक व संस्कृत प्रतिभा- संस्कृत भाषेतील अर्धवार्षिक ही तीन नियतकालिके प्रकाशित केली जातात. वाङ्मयेतिहास, सौंदर्यशास्त्र तसेच विविध वाङ्मयीन विषयांवर अकादेमीमार्फत प्रतिवर्षी सुमारे तीस चर्चासत्रे प्रादेशिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरही आयोजित केली जातात. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या कार्यक्रम मालिकाही योजिल्या जातात. उदा.मीट द ऑथर, कविसंधी, कथासंधी, अस्मिता, मुलाकात, मेन अँड बुक्स, थ्रू माय विंडो, लोक, द मेनी व्हॉइसेस, आविष्कार, अंतराल, लिटररी फोरम अशा विविध वाङ्मयीन कार्यक्रमांचे हिंदी, इंग्रजी भाषांत आयोजन केले जाते. याशिवाय अकादेमी नियमितपणे अनुवाद-कार्यशाळाही भरवते.
अकादेमी दर वर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात साहित्य-महोत्सव सप्ताह आयोजित करते. या आठवडाभरात काही विशिष्ट विषयांवर प्रकल्प योजिले जातात. उदा.प्राचीन भारतीय साहित्य, मध्ययुगीन भारतीय साहित्य, आधुनिक भारतीय साहित्य यांसारखे विषय या प्रकल्पांत चर्चिले जातात. याबरोबरच अकादेमीने गेल्या सुमारे पाच सहस्रकांच्या कालावधीतील उत्कृष्ट निवडक भारतीय साहित्यकृतींचे संकलन एकूण दहा खंडांत प्रकाशित केले आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांतील आदिवासींच्या साहित्याचे भाषांतर व प्रकाशन हा अकादेमीने हाती घेतलेला आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होय. बडोदे येथील अकादेमीच्या कार्यालयात तो कार्यान्वित करण्यात आला आहे. ह्या प्रकल्पांतर्गत पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अकादेमीने नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने एक संयुक्त प्रकल्प राबविला असून त्याअंतर्गत शंभर भारतीय अभिजात साहित्यकृतींच्या भाषांतराची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. भारतीय साहित्याच्या अभिलेखागाराची योजना हा अकादेमीचा आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होय. या प्रकल्पांतर्गत चित्रफिती, दृक्ध्वनिफिती, श्रवणफिती, सीडी आदी तांत्रिक साधनांद्वारे भारतातील दुर्मीळ व मौलिक साहित्यधनाचे जतन व दस्तऐवजीकरण तसेच श्रेष्ठ भारतीय साहित्यिकांची मूळ हस्तलिखिते, छायाचित्रे इ. सामग्री जतन करणे, अशा काही योजना राबविल्या जात आहेत. अकादेमीच्या वतीने निरनिराळ्या राज्यांतील गुणी, तरुण लेखकांना प्रवासशिष्यवृत्ती दिली जाते. त्यांनी भारतातील अन्य राज्यांमध्ये जाऊन तेथील लेखकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, तसेच तेथील प्रादेशिक साहित्य-संस्कृतीचा परिचय करून घ्यावा, या उद्देशाने अशा शिष्यवृत्त्या दिल्या जातात. अकादेमीच्या सांस्कृतिक देवाण-घेवाण योजनेच्या अंतर्गत भिन्न भिन्न प्रदेशांतील- भाषांतील लेखकांनी परस्परांचे साहित्य अनुवादित व प्रकाशित करणे, तसेच दोन भिन्न भाषिक राज्यांमध्ये लेखक-विद्वानांची परस्पर आवक-जावक असे अनेकविध उपक्रम राबविले जातात. भारतातील सर्व राज्यांमधील प्रादेशिक भाषांमध्ये परस्परजवळीक साधावी, वाङ्मयीन आदान-प्रदान व्हावे, त्यायोगे साहित्यिक- सांस्कृतिक एकात्मतेची जाण वृद्घिंगत व्हावी आणि देशाच्या सांस्कृतिक व भावनात्मक ऐक्यास हातभार लावावा, ही अकादेमीची भूमिका या सर्व प्रकल्प-उपक्रमांमागे कार्यरत आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील एक सर्वोच्च सन्मान असून साहित्य अकादमी, नवी दिल्ली या संस्थेतर्फे दर वर्षी २४ भारतीय भाषांतील सर्वोत्तम साहित्यांसाठी दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप हे पुरस्काराचे मानचिन्ह, (जे स्वतः श्रेष्ठ दिग्दर्शक सत्यजित रे यांनी डिझाईन केले आहे.) आणि १ लाख रोख रक्कम असे आहे. साहित्य अकादमीची स्थापना ही १९५४ साली भारताच्या सांस्कृतिक खात्याने केली असून त्याचा उद्देश हा भारतात अभिजात साहित्याचा प्रचार करणे हा आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी दिला जातो. या पुरस्काराच्या नामांकनाची प्रक्रिया ही वर्षभर सुरू असते. यामध्ये सर्वात आधी प्रत्येक भाषेतील तज्ञ व्यक्तींची समिती नेमली जाते, ज्यातून त्या त्या भाषेतील ५ उत्कृष्ट पुस्तकांची निवड केली जाते. जी पुढे प्राथमिक समितीपुढे मांडली जाते. या समितीतून ज्या ज्या पुस्तकांच्या नावाची शिफारस होईल त्या पुस्तकांचा ३ पंचांकडून परत विचार केला जातो आणि शेवटचा निर्णय होऊन हा पुरस्कार जाहीर होतो. या पुरस्काराचे निकष म्हणजे साहित्य हे अभिजातच हवे, ज्यातून त्या भाषेचा आणि संस्कृतीचा प्रचार होईल. तसेच एकदा साहित्य अकादमी मिळालेल्या लेखकाचा परत विचार केला जात नाही. अपूर्ण साहित्य, संशोधनपर ग्रंथ, दुसर्या साहित्याचा आधार घेऊन लिहिलेली पुस्तके, अनुवादित पुस्तके, एकापेक्षा जास्त लेखकांनी लिहिलेली पुस्तके, तसेच साहित्य अकादमी मंडळात काम करणार्या लेखकांची पुस्तके अशा साहित्यांना या पुरस्कारात स्थान नसते. तसेच लेखक किंवा प्रकाशक स्वतः स्वतःच्या पुस्तकाची शिफारस करू शकत नाही. तसेच एखाद्या मृत्यू पावलेल्या लेखकाच्या मृत्यूच्या पाच वर्षांपर्यंतच त्याच्या साहित्याची शिफारस करता येते. या सर्व निकषांवरच ही पुस्तके निवडली जातात. सन १९५५पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे.
!! राष्ट्रीय साहित्य अकादमी स्थापना दिनाच्या सप्ताहभर समस्त साहित्यिक बंधुभगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
– संकलन व सुलेखन –
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त मधुभाष- 7775041086.