Home महाराष्ट्र आयुष्याच्या विस्कटलेल्या दोरीने विणकाम व चप्पल दुरुस्ती करणारी महिला…..

आयुष्याच्या विस्कटलेल्या दोरीने विणकाम व चप्पल दुरुस्ती करणारी महिला…..

132

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100*

 

म्हसवड : आज जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत आहे. अनेक सेलिब्रिटी व गर्भश्रीमंत व सुख सुविधा उपभोगणाऱ्या महिलांचा गौरव होत आहे. हा त्यांचा अधिकारच आहे. परंतु, गावकुसाबाहेर राहून आपले जिद्द व परिस्थितीची जाणीव ठेवून कार्यरत राहणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यापैकी सातारा येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या शेजारी चप्पलच्या स्टॉलवर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या श्रीमती सुरेखा पवार यांची कहाणी म्हणजे जिद्द , प्रेरणा व भावी पिढीच्या भविष्याची काळजी घेणाऱ्या माता असा त्रिवेदी संगम पाहण्यास मिळत आहे. याचबरोबर उत्कृष्ट विणकाम करून घराची शोभा वाढवणाऱ्या या सुरेखा पवार यांची हस्त कला आवर्जून पहावे असेच आहे.
याबाबत माहिती अशी की ,नैसर्गिक रित्या संकट आल्यानंतर महिला मनाने खचून जातात. त्यांना कुणाचाही आधार मिळत नाही. अशा वेळेला माहेरची माणसं हाच मोठा आधार असतो. परंतु, जेव्हा आभाळ फाटते. त्यावेळी ठिगळ तरी कुठे लावायचे ? कारण माहेरची परिस्थिती गरिबीची होती .तरीसुद्धा आपल्या आईच्या चप्पल दुरुस्तीच्या व्यवसायात स्वतःला झोकून देत त्यांनीही हाच व्यवसाय हेच आपल्या उदरनिर्वाहाचे साधन समजून घेतले. एवढेच नव्हे तर आपल्या मुलाला भारत देशाच्या सीमेवरती सेवा करण्याची संधी मिळावी. म्हणून त्याला लष्करी दलात समाविष्ट करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या श्रमाचे व मेहनतीचे फळ त्यांना मिळणार आहेत. घराच्या प्रवेशद्वारा जवळ तोरण व सजावट तसेच अनेक प्रकारचे नक्षीकाम एवढेच नव्हे तर विणकामातून तयार केलेली चप्पल सुद्धा ते बनवू शकतात अशी त्यांची हस्त कला आहे. श्रीमती सुरेखा पवार यांचे लहानपणी वडील वारल्यामुळे दुःख, दारिद्र्य व अपमान याची त्यांना चांगलीच ओळख झाली होती .सुशीलादेवी साळुंखे गर्ल हायस्कूल मध्ये शिक्षणाचे स्वप्न त्यांनी पाहिले पण परिस्थितीने त्यांना जाग आल्यामुळे त्यांची झोपमोड झाली. आणि ते स्वप्न भंग पावले. अनेकांच्या घरी धुणे भांडी धुण्याचे काम करत असताना छोट्या-मोठ्या दुकानातही त्यांनी पॅकिंगचे काम केले. मुलगी वयात येण्यापूर्वीच एक खाणारे तोंड कमी व्हावं या भावनेतून त्यांचे लग्न करून दिले. परंतु हे लग्न सहा महिने टिकले. कारण त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांनी माहेरची वाट धरली आणि कायमचे सासर मुकले .
आज प्राथमिक शिक्षक सहकारी बँक प्रवेशद्वारा नजिक एका छोट्याशा स्टॉलमध्ये ते सकाळपासून ते सायंकाळपर्यंत काबड कष्ट करून चप्पल दुरुस्तीचे काम करत आहेत. महिला वर्ग सुद्धा आवर्जून याच ठिकाणी चप्पल दुरुस्त करून घेतात. लॉकडाऊन च्या दोन वर्षाच्या काळामध्ये ते कसे जगले असतील ? कारण कुणाचाही आधार नव्हता. फक्त आधाराला फक्त एक मुलगा होता. त्या मुलाकडे पाहून त्यांनी आपला संसाराचा गाडा तसाच पुढे घेवून गेले .
आज त्यांचा मुलगा लष्कर भरती झाल्यामुळे त्यांच्या सुखाचे दिवस सुरू झालेले आहेत. ज्या व्यवसायाने त्यांना आधार दिला. हा व्यवसाय रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत करणार अशी त्यांची जिद्द आहे. आज महिला दिनानिमित्त त्यांच्या जिद्दीला सलाम करण्यात आला आहे. आजोबा रामभाऊ गडकरी यांच्याकडून त्यांनी ही कला अवगत केलेली आहे. आज चप्पल दुरुस्ती व चप्पल , बुट पॉलिश करणाऱ्या लघु उद्योजक श्रीमती सुरेखा पवार आज त्या खऱ्या अर्थाने गोरगरीब महिलांसाठी एक आदर्श बनलेल्या आहेत. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून व्यवसायामध्ये नाव कमावणाऱ्या सर्वच महिलांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्या विसरल्या नाहीत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here