मोर्शी तालुका प्रतिनिधी : आंबट गोड चवीसाठी मोर्शी वरूड चांदुरबाजार अचलपूर नरखेड काटोल यासह विदर्भातील संत्रा जगभर प्रसिद्ध आहेत. मात्र, आधीच अतिवृष्टीचा मार सहन केल्यानंतर आता बांगलादेशच्या वाढीव आयात शुल्काने नागपुरी संत्रा पुरता पिळून काढला आहे. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क वाढवून प्रती किलो तब्बल ८८ रुपये केले आहे. याचा जबर फटका निर्यातीला बसला असून, यामुळे संत्र्यांची उचल कमी झाली आहे. परिणामी संत्र्याचे भाव गडगडले आहेत. जानेवारी महिन्यात ४० ते ५० हजार रुपये प्रती टनाने विकल्या जाणाऱ्या संत्र्याचे भाव आज १० ते १२ हजार रुपये टनापर्यंत आले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका विदर्भातील संत्रा उत्पादकांना बसतो आहे.
बांगलादेश आयात शुल्कवाढीचा मोठा फटका विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना बसला असल्यामुळे व्यापाऱ्यांनीही खरेदीकडे पाठ फिरविल्यामुळे आंबिया बहाराचा संत्रा जानेवारी महिन्यातही झाडावरच लटकलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्चही निघणे कठीण आहे. कापूस, तूर, सोयाबीन आदी पिकांप्रमाणे संत्र्याचाही हमीभाव शासनाने ठरवून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.
या वर्षी संताधार पावसामुळे जुलै-ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यामध्ये संत्रा बागांमधील मोठ्या प्रमाणात फळगळ झाली त्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले , त्या संकटावर मात करून शिल्लक राहिलेल्या संत्रा फळावर लाखो रुपये खर्च करून विविध फवारण्या व उपाय योजना करून फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र अचानक आता संत्र्याला भाव मिळत नसल्याने परराज्यातील बाजारपेठांमध्ये संत्र्याला उठाव नसल्याचे व्यापारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. संत्राला भाव मिळत नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा अडचणीत सापडला आहे.
नागपुरी संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशात केली जात असून, बांगलादेशने संत्र्याच्या आयातीवर ८८ रुपये प्रतिकिलो आयात शुल्क लावला आहे. त्यामुळे नागपुरी संत्र्याची आयात ८० टक्क्यांनी घटली आहे. संत्रा निर्यातीतील सातत्य कायम ठेवून निर्यात वाढविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संत्र्याच्या निर्यातीला ८५ रुपये प्रतिकिलो सबसिडी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देणे अत्यावश्यक असल्याचे मत संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके यांनी व्यक्त केले आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ, विविध रोगामुळे संत्रा गळती, यासारख्या विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. आधी संत्री खरेदी करण्याकरिता व्यापारी वर्ग संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या घरी चकरा घालत होते पण यावर्षी चित्र उलटे दिसत आहे. शेतकऱ्यांना २०० रुपये कॅरेट ने संत्रा विकावा लागत आहे.
कोणी संत्रा घेता का संत्रा ?
संत्र्याच्या मागची साडेसाती काही केल्या संपत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच सतत तीन वर्षांपासून नुकसान होऊनही ही शासन नुकसान भरपाई देण्यास तयार नाही. अस्मानी संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना सुलतानी संकटाला देखील समोर जावे लागत आहे. बांगलादेशाने संत्र्यावरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविल्याने संत्र्याचे भाव पडले आहेत. “कोणी संत्रा घेता का संत्रा”? अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शासनाच्या उदासीन धोरणांमुळे संत्रा उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.