पुणे – महिलांचे सक्षमीकरण, दर्जेदार शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन ही माझ्या यापुढील कार्याची क्षेत्रे असतील. समाजाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करावा, असा माझा सल्ला आहे. मी जनतेसाठी आणि देशासाठी काम करण्याच्या भावनेने राजकीय क्षेत्रात आलो. राजकारण या विषयाकडे टोकाच्या भूमिका घेऊन पाहिले जाते. काही भूमिका पूर्वग्रहदूषित असतात तर काही पराकोटीच्या विरोधाच्या असतात. राजकीय क्षेत्रातले महत्त्वाचे पद तुम्हाला अनेक चांगल्या सकारात्मक योजनांच्या द्वारा लक्षावधींचे कल्याण साधू शकते. असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केले. मी माजी मुख्यमंत्री जरूर आहे, पण याचा अर्थ असा नव्हे, की जनतेने मला नाकारले. मी आता मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री नसलो तरी राजकारणात अधिक व्यापक ध्येय घेऊन कार्यरत राहीन, असेही ते म्हणाले.
एमआयटी स्कूलऑफ गव्हनर्नमेंट व एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटी आयोजित १३ व्या भारतीय छात्र संसदेच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी, लोकसत्ता चळवळीचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश नारायण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर, कुलगुरू डॉ.आर.एम. चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.
चौहान म्हणाले,’ त्यामुळे माझा विद्यार्थ्यांना हाच सल्ला असेल की जरूर राजकारणात प्रवेश करा आणि समाजाचे नेतृत्व करा’.राममंदिर उभारले गेले आहे, मात्र रामराज्य अस्तित्वात येण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आणि परिश्रमांची आवश्यकता आहे,
डॉ. जयप्रकाश नारायण म्हणाले,’स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण समाजाचे आध्यात्मिकरण घडवून आणण्याची किमया केली.आपण जात, धर्मांमध्ये अडकले असताना स्वामींनी एका नव्या भारताचा जन्म घडवला. राजकारणात समाजाचे भवितव्य घडवण्याची आणि बदलण्याची शक्ती असते. विभिन्न समाजघटकांचे विभिन्न आवडींचे विषय एकाचवेळी समजून घेत प्रत्येक समाजघटकाचे हित साधण्याचा प्रयत्न राजकीय क्षेत्राद्वाराच साध्य होऊ शकतो.आज अनेक राजकीय पक्ष हे घराणेशाहीची उदाहरण बनलेले दिसतात.अशा परिस्थितीत जर युवा उर्जा राजकीय क्षेत्रात मोठ्या संख्येने आली, तर सामाजिक क्षेत्रातील नैतिकतेला उजाळा मिळेल’,.
डॉ. ज्ञानवत्सल स्वामी म्हणाले,’भारत विश्वगुरू संज्ञेला पात्र आहे, तो विकसित देश आहे आणि सुपरपाॉवर आहे यात शंका नाही. विद्यार्थ्यांनी आपली देशाप्रती जबाबदारी ओळखावी आणि परस्पर सहकार्याचे तत्त्व अंगी बाणवावे. सामाजिक जीवनातील नीतिमत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातूनच समाजाचे अध्यात्मिकरण शक्य होते.आपल्यातील क्षमतांवर विश्वास ठेवा, मूल्यनिष्ठा ठेवा, योग्य ठिकाणी बदल करण्याची लवचिकता ठेवा. मग तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना यशस्वीपणे करू शकाल’.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले,भारतच विश्वशांती आणि सुसंवाद घडवून आणू शकतो.भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञान हेच अंतिम सत्य आहे. आता ही मूल्ये विश्वाला सांगण्याची आवश्यकता आहे.विद्यार्थ्यांनी देण्यामधला आनंद शिकला पाहिजे आणि आपल्या आचरणाने आदर्श निर्माण केले पाहिजेत.
राहुल कराड म्हणाले,भविष्यातले लोकनेते घडवण्यासाठी आणि युवा नेतृत्वाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि स्कूल ऑफ गव्हर्नन्स स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यावा.आपल्या लोकशाहीने आता परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल करायला हवी. चारित्र्यसंपन्न आणि उच्चशिक्षित नेतृत्व घडवण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे.भारतीय छात्र संसदेच्या निमित्ताने आम्ही एक पाऊल उचलले आहे’.
कौशल साहू आणि भरतेंदू या विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. संजय उपाध्ये यांनीही विचार मांडले.
डॉ.आर. एम. चिटणीस यांनी स्वागत केले. डॉ.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.मिलिंद पांडे यांनी आभार मानले.