कराड : (दि. २९, प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडचे वाय. बी. चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कराड येथील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये निवड झालेल्या यशवंतांचा सत्कार समारंभ मा. आमदार श्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला. त्यामध्ये वाय. बी. चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कराड मधील रोहित जाधव (राज्य कर निरीक्षक 2021), शिवराज जाधव (राज्य कर निरीक्षक 2021), ऐश्वर्या काटकर (कर सहायक 2022), शिवांजली जाधव (आय. टी. आय. निदेशक 2023) या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सोबत संस्थेचे विश्वस्त व सदस्य श्री अरुण पाटील (काका), यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार सर, माजी सनदी अधिकारी श्री तानाजीराव साळुंखे, यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख समन्वयक श्री अमित जाधव सर उपस्थित होते.
एमपीएससी परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील मुलांचे प्रमाण वाढावे यासाठी यशवंतराव चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत कमी शुल्क असणाऱ्या या केंद्रामध्ये तज्ञ आणि अनुभवी विषयतज्ञासोबतच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका उपलब्ध आहे. यामध्ये सुसज्ज व समृद्ध ग्रंथालय, नानाविध मासिके व वर्तमानपत्रे मुले वाचतात. याबरोबरच इंटरनेट सुविधेसह कॉम्पुटर लॅब व मैदानी सरावासाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध असल्याने याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे. तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी सशुल्क राहण्याची व भोजनाची सर्वोत्तम सोय देखील आहे.
येणाऱ्या निवडणुक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या सरकारी जागांसाठी, सरकारी सेवांमध्ये जाण्याची सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यासाठीची तयारी लवकरात लवकर चालु करणे अपेक्षित आहे. याकरिताची परिपूर्ण बॅच केंद्रामध्ये १६ जानेवारीपासून सुरू होत असून त्यासाठी मोफत सेमिनार शनिवार ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या वेणूताई चव्हाण कॉलेज येथील मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीमध्ये आयोजित केला आहे. तरी इच्छुकांनी ८८३०२०१४९९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. ग्रामीण भागातील अभ्यासू,मेहनती व महत्त्वकांक्षी विद्यार्थ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा. असे आवाहन केंद्र प्रमुख समन्वयक श्री अमित जाधव यांनी केले आहे.