🔸आमदार देवेंद्र भुयार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.23ऑक्टोबर):-ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणामध्ये आता अजून वाटेकरी नको. राज्य शासनाने मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, ‘‘ओबीसीमधून कुणालाच आरक्षण देऊ नये, मराठा बांधवांना स्वतंत्र आरक्षण द्या” अशी मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे केली असून आमदार देवेंद्र भुयार यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आहे. ओबीसी प्रवर्गातून कुणालाही आरक्षण देऊ नये आणि मराठा बांधवांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केली आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकार घेताना दिसून येत आहे. हा समस्त ओबीसी वर्गावर अन्याय आहे. केंद्रामध्ये ओबीसीला २७ टक्के आरक्षण आहे. जातींचे उपवर्ग तयार करून आरक्षणाची विभागणी करण्यात आली. त्यामुळे ओबीसीला फक्त १९ टक्के आरक्षण मिळत आहे. त्यातही ३५० पेक्षा अधिक जातींचा या प्रवर्गात समावेश आहे. मराठा समाजाची अंदाजे लोकसंख्या ३५ टक्के असल्याने त्यांचा समावेश ओबीसीमध्ये केल्यास ओबीसीतील मुळ जातींचे आरक्षण संपल्यात जमा होईल. याकरिता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देता, स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांच्यातर्फे करण्यात आली.
ओबीसींची गेली अनेक वर्षांपासून जातीनिहाय जनगणनेची मागणी आहे. केंद्र सरकारने किंवा बिहार राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी. असे केल्यास सर्व जातींच्या लोकसंख्येची व सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा अचूक डेटा उपलब्ध होईल, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.
ओबीसी समाज शांत आहे. पण या गोरगरीब समाजाचा कुणीही अंत पाहू नये. ओबीसी समाज राज्यात ६० टक्के आहे. सर्वात जास्त मराठा समाजाचे लोक ओबीसी समाजाच्या मतावर आम्ही निवडून देत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात राज्य सरकारने ओबीसी समाजाची जनगणना करावी. माळी, कोळी, धनगर, वंजारी, तेली, साळी, धोबी, भाट अशा ३५० जाती ओबीसीमध्ये आहेत. पण राजकीयदृष्ट्या ओबीसी समाज जागृत नसल्याने राजकारणात यांचा टक्का एकदम कमी आहे.ओबीसीमधून आरक्षणाची मागणी कुणी करीत असेल तर त्यास विरोध करीत आम्ही सर्व ओबीसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्यातर्फे देण्यात आला .