✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.1ऑक्टोबर):-पितृपक्षात पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ ज्ञानदान व पुस्तकदान उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रुजावा व त्यांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दि 30 सप्टेंबर शनिवार रोजी एचएआरसी संस्थेमार्फत अक्षर आनंदचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांच्या प्रयत्नातून आनंदी वाचन पेटी भेट देण्यात आली. या पेटीमध्ये 80 पुस्तकांचा खजिना उपलब्ध असून या आनंदी वाचन पेटीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात नक्कीच आनंद निर्माण होण्याबरोबरच जीवन जगण्याचा दृष्टिकोन मिळेल.
पेटीमध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, महापुरुषांची चरित्रे शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत हे साहित्य आहे. या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज चव्हाण तर प्रमुखअतिथी म्हणून एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक ,मार्गदर्शक प्रा.डॉ.शिवा आयथळ व राजेंद्र खापरे हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ.पवन चांडक यांनी हा अभिनव उपक्रम राबविण्यामागील हेतू स्पष्ट केला.जुन्या रूढी परंपरांना छेद देत नाविन्यपूर्ण समाजपयोगी उपक्रम राबविणे हा एचएआरसी संस्थेचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा उपक्रम जिल्हाभरातील निवडक शाळांमध्ये राबविला जात आहे. पितृपक्षात ज्ञानदान व पुस्तक दान करून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रुजवण्याचे व आत्मविश्वास निर्माण करण्याचे हे कार्य करताना अनेक मदतीचे हात हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.शिवा आयथळ यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची एक नवी दृष्टी आपल्या मार्गदर्शनातून दिली. विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजे, त्यांनी प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. प्रश्नाचे उत्तर आई बाबा, शिक्षक यांच्याबरोबरच पुस्तकातून आपल्याला मिळतात म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तके वाचायला पाहिजे असा संदेश त्यांनी दिला. आयुष्यात आईवडील, शिक्षक आणि पुस्तक हे तीन शिक्षक असतात यांच्याकडून आपण शिकले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी आनंदी,उत्साही व अभ्यासू बनावे. डोळे उघडे ठेवून स्वप्न बघावी ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. मोबाईल वापराचे दुष्परिणाम रागाचे व ताणतणावाचे व्यवस्थापन याविषयी त्यांनी विस्तृत विवेचन केले.
परिस्थितीने कितीही सोलले तरी धारदार बना असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला. ताठ मान करून जगणाऱ्या मानवी व्यक्तिमत्त्वाला मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे मान खाली घालून जगण्याची सवय लागली ही सवय लवकर मोडण्याचे आवाहन त्यांनी केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोपामाईन व कोर्टीसोल या मेंदूतून बाहेर पडणाऱ्या रसायनाचे संतुलन बिघडले आहे त्यामुळे प्रत्येकजण नैराश्यग्रस्त बनत आहे म्हणून मोबाईलचा अती वापर टाळून प्रत्येकाने वाचनावर लक्ष केंद्रित करून जीवनात चांगल्या दहा सवयी अंगीकारल्या पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंदुमती कदम तर आभार प्रदर्शन रीहाना अत्तार यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी बंजारा नृत्य सादर केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलजा शिरसाट, शैला सरदे, उषा गडमे यांनी प्रयत्न केले.