Home अमरावती डॉ.गजानन गुल्हाने : शिक्षणशास्त्र शैक्षणिक संशोधनातील महामेरू

डॉ.गजानन गुल्हाने : शिक्षणशास्त्र शैक्षणिक संशोधनातील महामेरू

142

दि.01 मे 1983 रोजी स्थापन झालेल्या अमरावती विद्यापीठात विविध शैक्षणिक पदव्युत्तर विभाग कार्यरत आहेत. सर्वच पदव्युत्तर विभागांतर्फे शैक्षणिक संशोधनाचे कार्य होत असते. विद्यापीठातील शिक्षणशास्त्र पदव्युत्तर विभाग अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील समस्यांना सामोरे ठेवून एम.एड.,एम फिल,व पीएच.डी. प्राप्त करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक संशोधनाचे कार्य सातत्याने करताना दिसून येते.शिक्षणशास्त्र पदव्युत्तर विभागात विभाग प्रमुख म्हणून यापूर्वी डॉ. विणाताई ठाकरे,डॉ.गीता देवी पाटील,डॉ. राजेंद्र मानेकर,डॉ.अनिल सोमवंशी अशा शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षण तज्ञांनी काम केलेली आहेत,त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीने विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात आपला ठसा उमटवलेला दिसून येतो.तीच शृंखला डॉ.गजानन गुल्हाने यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख म्हणून पुढे चालू ठेवलेली आहे. किंबहुना,नवनवीन शैक्षणिक प्रवाहांना सामोरे जात असताना त्याला अनुसरून डॉ.जी.एल. गुल्हाने यांनी आपल्या विभागाचा संशोधनातील दर्जा कसा सर्वोत्तम राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे.याकरिता त्यांनी सखोल अभ्यास केला.देशभरातील विविध विद्यापीठातील शैक्षणिक तज्ञांच्या संपर्कात ते राहलेत.

शैक्षणिक संशोधनात होणाऱ्या बदलांचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी तो विचार अध्यापन करणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक अध्यापकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. विविध कार्यशाळा,चर्चासत्र , परिषदा,उजळणी वर्ग,उद्बोधन वर्ग,शिक्षण विषयक भाषणं, लेख, पुस्तकांचे लिखाण, विद्यापीठाचे स्वयंम,यूट्यूब यांच्या माध्यमातून लाखो अध्यापकांपर्यंत डॉ.गजानन गुल्हाने यांनी शैक्षणिक संशोधनाची महती पोचवली आहे.

शिक्षण क्षेत्रात अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर भर दिला जातो. ही प्रक्रिया अधिक सखोल,प्रभावी,कालोचित आणि सर्वांगीण स्वरूपात यशस्वीरित्या पार पाडायची असेल तर सर्वात महत्त्वाची व मूलभूत गोष्ट म्हणजे संशोधन होय. एकाद्या विषय अध्यापकाचे संशोधन जितके सखोल आणि व्यापक असते तेवढेच त्याचे त्या विषयाचे अध्यापन हे परिपूर्ण होत जाते. अध्ययन – अध्यापन हे कोणत्याही विषयाचे असो ते ठरीव साच्याचे,एकसारखे, स्थितिशील कधीही नसते.ती एक जीवंत प्रक्रिया असते. परिवर्तनशीलता,कालानुरूपता आणि विकास ही या प्रक्रियेची वैशिष्ट्ये असतात.ज्ञानाच्या क्षेत्रातील संकल्पना झपाट्याने बदलत आहेत.कालची नवी गोष्ट आज जुनी वाटायला लागते. अशावेळी,जाणीवपूर्वक विषय निवडून त्यावर अधिक सखोल, व्यापक असे संशोधन करणे हे आवश्यक झाले आहे.यानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधनाशिवाय तरुणोपाय नाही हे मनाशी निश्चित करूनच काम करावे लागणार आहे,अशी शिकवण डॉ.जी. एल.गुल्हाने यांच्या भाषणातून अनेकदा कानावर पडली आहे.

डॉ.गजानन गुल्हाने यांनी 35 वर्ष अध्यापनाचे कार्य केले आहे.प्रथम गणिताचे प्राध्यापक म्हणून दारव्हा,नंतर जवाहर नवोदय,गोवा,अमरावती येथे कनिष्ठ महाविद्यालयात काम केले.त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एम.एड्. ही पदवी पूर्ण करून गुरुवर्य डॉ.एकनाथराव गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणशास्त्र विषयात त्यांनी पीएच.डी.पदवी प्राप्त केली.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शिक्षणशास्त्र पदव्युत्तर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. 17 वर्षे पदवी व 19 वर्ष पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्यांनी केले. यातील 13 वर्ष शिक्षणशास्त्र पदव्युत्तर विभाग प्रमुख म्हणून काम केले आहे. 35 वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक कालखंडात डॉ. जी. एल. गुल्हाने यांनी 25 विद्यार्थ्यांना पीएच.डी.,11 विद्यार्थ्यांना एम.फिल.,तर 76 विद्यार्थ्यांना एम.एड्.चे संशोधन विषयाकरीता मार्गदर्शन केले आहे.
अध्यापन कौशल्य , सामाजिक परिवर्तनासाठी संशोधन,विशेष विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, शिकण्याची अक्षमता , संप्रेषण आणि वर्ग व्यवस्थापन कौशल्य या विषयांवर 47 व्हिडिओ विद्यापीठाच्या स्वयंम आणि युट्युब वर अपलोड केली आहेत. संशोधनपर पेपर वाचनासाठी 2013 मध्ये मलेशिया व 2023 मध्ये जापान चा दौरा त्यांनी केला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग व आय.सी.एस.एस.आर.दिल्ली यांचेकडून प्राप्त निधीतून तीन संशोधन प्रकल्प पूर्ण केली आहेत. डॉ. गुल्हाने यांनी शिक्षण क्षेत्राशी निगडित शैक्षणिक संशोधन 2010,शिकण्याची अक्षमता 2012,संशोधन आणि सांख्यिकी 2013,बालपण आणि वाढ 2015 व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान 2016 ही पाच पुस्तके व शैक्षणिक संशोधने हे संपादित पुस्तक लिहिली आहेत. विद्यापीठात शिक्षणशास्त्र पदव्युत्तर विभागातर्फे 12 विविध परिषदांचे आयोजन त्यांनी केले असून राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मध्ये त्यांचे 90 पेपर्स प्रसिद्ध आहेत. तर एकूण 116 राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविलेला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल डॉ.आनंद वासकर उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार 2012 -13,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार 2014,युथ अवार्डी फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्लीचा राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2018 ,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण विभागातर्फे आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेत मा.कुलगुरूंच्या हस्ते सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार 10 मार्च 2018,संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविलेल्या डॉ.जी.एल.गुल्हाने सी व्ही एम विद्यापीठ,आनंद गुजरात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ,नाशिक,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,नांदेड व सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही सदस्य म्हणून काम केले आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांसह गोंडवाना विद्यापीठ,एस आर टी एम विद्यापीठ,नांदेड व मुंबई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र संशोधन मान्यता समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.

विविध विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र संशोधन क्षेत्रात काम करतानाच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मा.डॉ.प्रोफेसर दिलीप मालखेडे यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून 2022 मध्ये त्यांची नियुक्ती केली.यासोबत डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरियल संशोधन केंद्राचे संचालक, विद्यापीठ रोजगार माहिती व मार्गदर्शन ब्युरो चे 2013 पासून सेवानिवृत्ती पर्यंत सदस्य म्हणून अतिरिक्त काम त्यांच्यावर सोपविण्यात आले होते.
शिक्षण क्षेत्रात आपली 35 वर्षाची निरंतरपणे सेवा देऊन विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून डॉ.गजानन गुल्हाने यांनी या विभागाचा कायापालट केला आहे.संशोधनाच्या कार्यात कुठलीही तडजोड सरांनी केली नाही. मुर्तिजापूर सारख्या एका छोट्या गावातून विद्यापीठातील विविध महत्त्वाची पदे भूषविणारे डॉ.गजानन गुल्हाने हे यशस्वी प्रशासक,कुशल संशोधक म्हणून शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. सह्दय मित्र म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत. शिस्तप्रिय, योजनाबद्धता,दूरदर्शीपणा, समाधानीवृत्ती,समाजसेवेचा वारसा,संकटकाळी मदतीला सदैव तत्पर असणारे, सौजन्यशीलतेने काठोकाठ भरलेलं असं सरांचं व्यक्तिमत्त्व आहे.

सेवानिवृत्ती निमित्त दि .1ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांच्या पीएच.डी.धारक विद्यार्थ्यांतर्फे तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने सत्कार व सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन हॉटेल ग्रेस इन, अमरावती येथे करण्यात आले आहे.डॉ. गजानन गुल्हाने यांचा जापान येथे कार्यरत असणारा मुलगा हर्ष,विवाहित मुलगी सौ. नेहा,वहिनी सौ.नीता व परिवाराला आरोग्यदायी, यशदायी दीर्घ आयुष्य मिळो या सदिच्छांसह आपणा सर्वांच्या हातून समाजाची व शिक्षण क्षेत्राची अशीच सेवा घडत राहो ही मनोकामना.

✒️प्रा. डॉ.संजय भी.खडसे(प्रोफेसर तथा सदस्य,शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळ,संत गाडगेबाबा अमरावती)विद्यापीठ ,अमरावती.
मोबाईल – 9890790585

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here