Home मनोरंजन सदाबहार अभिनेते ; देव आनंद

सदाबहार अभिनेते ; देव आनंद

108

 

हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार, चिरतरुण आणि चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते जेष्ठ सिनेअभिनेते दिवंगत देव आनंद यांची आज १०० वि जयंती. १०० वर्षांपुर्वी अजच्याच दिवशी म्हणजे २६ सप्टेंबर १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला. हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. देव आनंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरमधील कॉलेजमध्ये १९४२ साली त्यांनी संगीतात ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिथेच त्यांची खुशवंत सिंग व बलराज साहनी यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाशी भेट झाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काहीकाळ नोकरीही केली मात्र नोकरीत त्यांचे मन रमले नाही. लवकरच त्यांनी नोकरी सोडून चित्रपटाची वाट धरली. प्रभात कंपनीच्या हम एक है या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. मात्र त्यानंतर त्यांचे काही चित्रपट आपटले. त्यांच्याच कंपनीचा म्हणजे नवकेतनचा अफसर हा चित्रपट देखील पडला मात्र या अपयशाने ते डगमगले नाही. अपना भी टाइम आयेगा…. असे ते त्यावेळी निर्मात्यांना म्हणत असत त्यांनी अभिनय केलेला बाजी हा चित्रपट पडद्यावर आला आणि त्यांचे हे बोल खरे ठरले. बाजी हा चित्रपट तिकीट बारीवर यशस्वी ठरला. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली या चित्रपटाने त्यांना नायक म्हणून मान्यता दिली. या चित्रपटानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. केसांचा तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यामुळे उठून दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले. ते प्रेक्षकांचे आवडते नायक बनले. त्यांचे सर्व चित्रपट हिट होऊ लागले. बाजी, मुनीमजी, दुष्मन, कालाबाजार, सीआयडी, पेईंग गेस्ट, गॅम्बलर , तेरे घर के सामने, काला पाणी, जाल, गाईड, तेरे घर के सामने, छुपा रुस्तम, हरे रामा हरे कृष्णा, हिरा पन्ना, देस परदेस, ज्वेल थिप, जॉनी मेरा नाम, अव्वल नंबर, स्वामी दादा असे त्यांचे सर्वच चित्रपट यशस्वी ठरले. १९५० ते १९७० असे जवळपास दोन दशके त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवले. राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यासारख्या तगड्या नायकांसमोर त्यांनी मोठे आव्हान उभे केले. त्याकाळात या तिघांना हिंदी चित्रपट सृष्टीतील त्रिदेव असे म्हंटले जायचे कारण या तिघांनी तो काळ अक्षरशः गाजवून सोडला होता. देव आनंद आणि राज कपूर यांच्यापेक्षा देव आनंद यांचे चाहते अधिक होते विशेषतः त्या काळातील तरुणाईने त्यांना डोक्यावर घेतले होते. त्यांचा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी तरुण कॉलेज सोडून चित्रपट गृहाबाहेर रांगेत उभे असायचे. तरुण मुली तर त्यांच्यासाठी अक्षरशः वेड्या झाल्या होत्या. त्यांची एक झलक पाहण्यासाठी मुली घरातून पळून मुंबईला येत असत. त्यांच्या यशात त्यांच्या गाण्यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या बहुतेक चित्रपटाला सचिन देव बर्मन यांचे संगीत लाभले. सदाबहार गायक किशोर कुमार हे त्यांच्यासाठी गाणी गात. संगीतकार सचिन देव बर्मन, गायक किशोर कुमार आणि पडद्यावरील नायक देव आनंद हे त्रिकुट असे काही जमले की त्यांच्या अनेक गाण्यांनी इतिहास घडवला. तू कहा ये बता, देखो रुठो ना करो, एक घर बनाएंगे तेरे घर के सामने, दिल का भवर करे रे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, चुडी नही मेरा दिल दिल है दिल, फुलो का तारों का सबका कहना है, दिन ढल जाये, छोड दो आंचल जमाना क्या कहेगा यासारखी त्यांची असंख्य गाणी आजही लोकप्रिय आहेत. आजही ही गाणी आवर्जुन ऐकली जातात. देव आनंद यांनी केवळ चित्रपटात अभिनयच केला असे नव्हे तर त्यांनी काही चित्रपटांसाठी पटकथा लेखन केले तर काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. आंधिया, हरे रामा हरे कृष्णा, हम नौजवान, अव्वल नंबर, प्यार का तराना, गँगस्टर, मै सोलह बरस की, सेन्सॉर या चित्रपटासाठी त्यांनी पटकथा लेखन केले तर हिरा पन्ना, देस परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर अशा काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. अभिनयासाठी त्यांना अनेक फिल्मफेअर पुरस्कार तर मिळालेच पण भारत सरकार कडूनही त्यांना मानाचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला. चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना मिळाला. ३ डिसेंबर २०११ रोजी त्यांचे निधन झाले. जवळपास पाच दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या या सदाबहार अभिनेत्याला त्याच्या १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here