Home महाराष्ट्र सरकारच्या अविवेकाची दशकपूर्ती

सरकारच्या अविवेकाची दशकपूर्ती

107

जगात आदर्शवत अशी भारतीय राज्यघटना असूनही त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे जशी भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे. अगदी तशीच स्थिती आज समाजाच्या विकासात प्रमुख अडसर ठरत असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य ऐषो आरामाचे जीवन जगण्याचे पोषक वातावरण असूनही एक सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेने आयुष्य वेचणारे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अमानुष हत्या करून रोखण्यात आली. परंतु पुरोगामित्वाचे सतत तुणतुणे वाजवणा-या सरकारची नीतीच मुळात भ्रष्ट असल्याने दहा वर्षे झाली तरी दोषींवर कारवाई करता येत नाही ही नामुष्कीची गोष्ट आहे.

विशेष म्हणजे गत काळातील काही प्रकरणात न्यायालयाचे निर्णय देखील सत्ताधारींना अनुकूलच नव्हे, तर सत्ताधारींनी भाकीत केल्याप्रमाणे लागल्याचे पाहून लोकांचा न्यायालयावरचा देखील विश्वास उडालेला असताना न्यायप्रिय आणि निष्कलंक कारकीर्द असलेले आदरणीय धनंजय यशवंत चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून लाभल्याने लोकांच्या आशा आता नव्याने जागे झाले आहेत. म्हणून आदरणीय शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाच्या तपासात होणा-या टोकाच्या दिरंगाई बाबत श्रीमान एकनाथ शिंदे आणि श्रीमान देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार दरबारी खुले पत्र !

महाशय,

आदरणीय शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाच्या तपासात होणा-या टोकाच्या दिरंगाई बाबत आम्ही दरवर्षी आपल्याकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त करत असतो.आपल्याला माहितच आहे की विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा खून दहा वर्षापूर्वी दि 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला. या दुःखद घटनेला यावर्षी आज दहा वर्ष पुर्ण होत आहेत.त्यानंतर, डावे विचारवंत आणि राजकीय कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ बंदुकधारी मारेक-यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शाहू फुले आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या सारख्या विचारवंतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात खर्च करून महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारात भर घातली आहे. आपण एका बाजुला राजकारणाचा एक भाग म्हणून कुणाला तरी खूष करण्याकरिता कट्टर ‘हिंदुत्वाची’ कास धरल्याचे सांगत असता. आपले महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असेही म्हणता आणि दुस-या बाजूला महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांचे दिवसा ढवळ्या खून होतात हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. डाॕ. एम एम कलबुर्गी हे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे अभ्यासक आणि संशोधक होते तसेच ते हम्पी विद्यापीठ, कर्नाटक चे कुलगुरू होते. साहित्य अकादमीचा 2006 साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. लिंगायत विचारधारेतील ते एक पुरोगामी विचारवंत होते.

तसेच त्यांनी अंधश्रद्धांना विरोध केला होता. त्यामुळेच त्यांची धारवाड येथे 30 ऑगस्ट 2015 रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली.गौरी लंकेश या बेंगलोर, कर्नाटक मधील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता होत्या. गौरी लंकेश पत्रिका नावाचे साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. धार्मिक मुलतत्ववादी, अंधश्रद्धा आणि जातिय भेद यांच्या विरोधी त्या सातत्याने लिहीत होत्या. स्त्री चळवळीत सुध्दा त्यांचा सहभाग असे. या कामांसाठी त्यांना आण्णा पालीटकौवस्क पुरस्कार मिळाला होता. त्यांचा सुद्धा 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांचा त्यांच्या घराच्या बाहेर खुन करण्यात आला.

आमचा असा ठाम विश्वास आहे की डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना योग्य वेळी अटक होऊन त्यांच्या खुनाचा तपास सूत्रधारापर्यंत वेळीच पोहचला असता तर त्यानंतर झालेले कॉम्रेड गोविंद पानसरे, डाॕ. प्रा एम एम कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे खुन झाले नसते. म्हणूनच आम्ही अजुनही तपासात होत असलेली दिरंगाई आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो.गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास करताना तपास करणाऱ्या एस आय टी ला असे आढळले आहे कि या चार खूनांच्या मध्ये समान धागा असून परस्पर संबंध आहेच पण या खूनांच्या मागचा हेतू समान असून धार्मिक मुलतत्ववादी या कटात आहेत. आमचा असा विश्वास आहे कि या मागील मुख्य धार्मिक मूलतत्त्ववादी सूत्रधारांना पकडण्या मध्ये ऊशीर होत आहे. जे लोक आणि संघटना या खूनांच्या मध्ये गुंतलेले आहेत त्यांना केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अटक करणे आवश्यक आहे यासाठी आणि तपासात निर्णायक गती येण्यासाठी विशेष तपास टीम गठीत करावी लागेल.

सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक यांचे होणारे खून थांबवण्यासाठी एका कडक कायद्याची गरज आहे असे आमचे मत आहे कारण सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक याच्या जीवाला सध्या आपल्या समाजात धोका आहे. असे झाले तर सर्व लोक राज्य घटनेत दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्राच्या अधिकार उपभोगू शकतील.आम्ही सरकारकडे प्रामाणिकपणे खालील गोष्टींची मागणी करत आहोत.

1). सर्व चार खून एकमेकात गुंतलेले असल्यामुळे केंद्रीय आणि राज्य सरकारच्या यंत्रणांचा सुसंवाद होणे आवश्यक आहे. आणि यासाठी चारी खूनांचा तपास व्यवस्थित होण्यासाठी एका विशेष तपास टीम गठीत करावी लागेल.
2). खूनात सहभागी असलेल्या संघटना आणि सूत्रधारांना अटक व्हावी आणि आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी.
3). चारही केसेस मध्ये सरकारने चांगल्या वकिलांची नियुक्ती करावी.
4). अशा धार्मिक मुलतत्ववादी लोक आणि संघटनांच्यावर बंदी आणावी.
5). सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या लोकांच्या जीवांचे रक्षण करण्यासाठी एक कडक कायदा करावा.
धन्यवाद !, कळावे!!

✒️आपला विश्वासू
विठ्ठलराव वठारे(महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,सोलापूर जिल्हा शाखा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here