✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006
परवा शिवप्रतिष्ठानच्या मनोहर भिडे यांनी थेट राष्ट्रध्वजालाच आव्हान दिले. त्यांनी स्वातंत्र्य दिन आणि तिरंग्याचे महत्व नाकारत देशाविरूध्द देश अशी नवी लढाई पुकारली आहे. तिरंग्याला सलाम ? असा प्रश्न करत, “जमत नाही !” अशी मग्रुर भाषा वापरली. भारतमातेचीच लेकरं तिच्याच स्वातंत्र्याविरूध्द आणि तिच्या राष्ट्रध्वजाविरूध्द उभी केली आहेत. हे भयंकर व गंभीर आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले, ज्या तिरंग्यासाठी हजारो लोकांनी गोळ्या झेलल्या, जीव दिला त्या तिरंग्याचा व स्वातंत्र्याचा अवमान त्यांनी केला आहे. त्यांनी या पुर्वी महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या विरोधात अतिशय खालच्या स्तरावर जात गरळ ओकली आहे आणि हे काम भिडे सातत्याने करत आहेत. गेल्या सत्तर वर्षापासून ते हेच बोलत आहेत. आज भिडे नव्वदीत आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता ते वयाच्या विशीपासून हेच बोलत आहेत. महात्मा फुले, महात्मा गांधी यांना शिव्या घालण्याचे त्यांचे काम अव्याहतपणे चालूच आहे. केंद्रात व राज्यात त्यांची सत्ता नव्हती तेव्हा ते आतल्या खोलीत किंवा दबक्या आवाजात बोलायचे. आता राज्यात व केंद्रात त्यांचीच सत्ता आली आहे. त्यामुळे ते उघड उघड बोलतात.
बदल्यात त्यांचा ‘बाल’ बाका होत नाही. कारण ते जे बोलतात तोच अजेंडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पर्यायाने भाजपाचा आहे. या राज्याचा गृहमंत्री त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि करू शकत नाही. कारण तो ही त्याच विचाराचा आहे. भिडेंचे जे मत आहे, जो विचार आहे तोच त्यांचाही आहे. भिंडेचे विचार त्यांना मान्य आहेत फक्त संविधानिक पदावर असल्याने ते उघडपणे बोलत नाही, किंवा थेट भिडेंची भूमिका स्विकारत नाहीत इतकेच. बाकी सत्तेचे सुरक्षाकवच पुर्ण ताकदीने ते भिडेंना देत आहेत. भिडेंनी ज्या पध्दतीने तिरंग्याबद्दल वक्तव्य केले तसे वक्तव्य इतर कुणी केले असते तर फडणवीस आणि भाजपाने राज्य डोक्यावर घेतले असते. देशभक्तीचा डांगोरा पिटला असता. प्रचंड मोठ्या प्रमाणात देशाचा अवमान झाल्याचा, देशद्रोह केल्याचा गदारोळ घातला असता. राहूल गांधींनी सावरकरांच्यावर टिका केल्यावर फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पुढे करत ‘सावरकर सन्मान’ यात्रा काढली.
पण इकडे महात्मा गांधींचा, महात्मा फुलेंचा खुप वाईट पध्दतीने अवमान करूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना त्यांच्यासाठी सन्मान यात्रा काढावी वाटली नाही किंवा रस्त्यावर ताकदीने उतरत या प्रकाराला त्यांनी विरोध केला नाही. उठता-बसता महात्मा गांधी, महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ आंबेडकरांचे नाव घेणा-या या लोकांना त्यांच्या सन्मानाशी देणे घेणे असल्याचे दिसले नाही.
भिडेंना ताकद देण्याचे काम कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांनीच केले आहे. या पक्षाच्या नेत्यांनीच भिडेंना आजवर पोसले आहे. त्यांची सत्ता असताना भिडेंना चाप किंवा जरब लावण्याचे काम त्यांनी कधीच केले नाही. भिडेंचे सांगली जिल्ह्यात साधारण १९८० पासून काम सुरू आहे. प्रारंभीच्या काळात ते पाय रोवत होते, पाय पसरवत होते तेव्हा कॉंग्रेसचे पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे आर आर पाटील, जयंतराव पाटील या लोकांनीच त्यांना मदत केली, ताकद दिली. त्यांच्या अनेक अडचणी दुर करण्याचे काम याच नेत्यांनी केले. भाजप पेक्षा जास्त ताकद त्या काळात याच नेत्यांनी त्यांना दिली. कॉंग्रेसचे तत्कालीन केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री प्रतिक पाटील त्यांचे शिष्यच होते. ते स्वत: काठी घेवून मोहिमा करत होते. भिडेंना रसद दिली ती याच लोकांनी. भिडे शिवाजी महाराजांचे नाव घेवून आर एस एसचा विचार बहूजन समाजाच्या पोरांच्यात व कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यात बेमालूमपणे पेरत होते. त्यांची ही ‘पेरणी’ या नेत्यांच्या लक्षात येत नव्हती. सत्तेला चटावलेल्या या नेत्यांना भिंडेच्या मागची पोर भांडवल वाटत होती. ती आपल्या उपयोगाला येतील असे वाटत होते पण तसे झाले नाही. भिडेंनी या पोरांच्या डोक्यात शिवरायांच्या व संभाजी राजांच्या आडून गोळवळकर, हेगडेवार आणि नथूराम गोडसे पेरला होता.
“शिवाजी-संभाजीच्या रक्तगटाची पिढी तयार झाली पाहिजे !” असे भिडे तोंडाने म्हणत होते पण प्रत्यक्षात मात्र ते गोळवळकर-हेगडेवार आणि गोडसेच्या रक्तगटाची पिढी घडवत होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भाबड्या नेत्यांना या गोष्टीचा कधी थांगपत्ताही लागला नाही. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा २०१४ ला पराभव झाला तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणिव झाली. त्यांनी ते एकदा बोलूनही दाखवले. पण त्यानंतर कधी त्यावर तोंड उघडायची हिम्मत दाखवली नाही. अजूनही कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले सुधारलेले दिसत नाहीत. सहा महिन्यापुर्वी कॉंग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम स्वत: भिडेंच्या दुर्गा दौडीत मशाल घेवून पळत होते. तेच विश्वजीत कदम परवा मंत्रालयासमोर भिडेंना अटक करा ! अशी घोषणा देत असलेल्या कॉंग्रेस नेत्यांच्या गर्दीत उभे होते.
विश्वजीत कदम मुंबईत भिडेंच्या अटकेची मागणी करत होते पण स्वत:च्या जिल्ह्यात येवून भिडेंच्या विरोधात एखादी निषेध रँली काढण्याची हिम्मत त्यांनी का दाखवली नाही ? हागल्या-मुतल्या गोष्टी फेसबुकवर टाकणा-या विश्वजीत कदमांनी भिडेंचा निषेध ट्विटरवरती केला तो ही इंग्लिशमध्ये. कडेगाव मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांना घेवून एखादी निषेध सभा त्यांना घेता आली असती पण त्यांनी तसे केले नाही. भिडेंच्या अटकेची मागणी करणा-या पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत कधी विश्वजीत कदमांना जाब विचारला आहे का ? पुरोगामी महाराष्ट्राचा संकल्प सोडत राज्यभर राष्ट्रवादीची यात्रा काढणा-या जयंत पाटील यांनीही स्वत:च्या जिल्ह्यात याबाबत काही केल्याचे दिसले नाही.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपला, आपल्या पक्षाचा नेमका विचार काय आहे ? ते आपल्या कार्यकर्त्यांना कधीच समजून सांगितले नाही. स्वत:च्या पक्षाचा विचार त्यांच्यात कधी पेरला नाही. राजकीय सभेत भाषणं ठोकताना फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र अशा गपड्या ठोकल्या पण कधी त्यांचा नेमका विचार समजून सांगितला नाही. कार्यकर्त्यांचे केेडर कँप घेत पुरोगामी महाराष्ट्राचा नेमका अर्थ काय ? हे कधीच सांगितले नाही. एका बाजूने भिडे आणि आर एस एस त्यांचे वैदीकशाहीचे, पेशवाई विचार समाजात पेरत असताना हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे गणंग आपल्या पक्षाचा धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी विचार रूजवताना दिसले नाहीत. त्यांचेच कार्यकर्ते भिडेंच्या सतरंज्या उचलत होते. त्यांचे फुटसोल्जर होवून काम करत होते. सरळ सरळ उजवा गोळवळकरी विचार अंगिकारत होते पण त्याचा कधी धोका या लोकांना वाटला नाही. राज्यातल्या पुरोगामी राजकारणाचे क्रेडीट (श्रेय) व बेनिफीट (फायदा) घेणारे तथाकथित पुरोगामी कंंपूचे पप्पा असलेल्या शरद पवारांनाही असं कधी वाटले नाही. त्यांनीही महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कार्यकर्त्यांच्यात पेरण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
निव्वळ डोक्यावरच्या पगड्या प्रतिकात्मक पध्दतीने बदलण्यात धन्यता माणणारे शरद पवारही भिडेंच्या कार्यक्रमाला आले होते. त्यांना ‘संताजी’ व पंतगराव कदमांना ‘धनाजी’ अशी पदवी तेव्हा भिडेंनी दिली होती. मनोहर भिडेंना पोसण्याचे, वाढवण्याचे खरे पाप याच लोकांनी केले आहे. पुरोगामी चळवळ आणि विचार भक्कम होईल यासाठी राज्यात भरीव काम करताना हे लोक दिसले नाहीत. जे काम तामिळनाडू सारख्या राज्यात झाले ते काम महाराष्ट्रात का झाले नाही ? हा महत्वाचा प्रश्न पडतो आहे. या मंडळींनी या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. आणि जे उत्तर मिळेल त्यावर प्रामाणिकपणे काम केले तरच उपयोग आहे. अन्यथा या करंट्या लोकांना काळ माफ करणार नाही.