Home महाराष्ट्र नाशकात खुनाचे सत्र सुरूच, अंबडला तरुणाची पूर्ववैमनस्यातून निर्घृण हत्या

नाशकात खुनाचे सत्र सुरूच, अंबडला तरुणाची पूर्ववैमनस्यातून निर्घृण हत्या

143

🔹हल्लेखोरांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा अंबड ग्रामस्थांचा निर्धार

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.18ऑगस्ट):-अंबडच्या स्वामीनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून मयूर केशव दातीर या तरुणाची तिघांनी मिळून निर्घृण हत्या केली आहे. हल्लेखोरांपैकी एक जण सराईत गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना ताजी असतांना गुरुवारी अंबड परिसरातही हत्येचा प्रकार घडल्याने नाशिक पुन्हा एकदा हादरले आहे.मयूर दुपारी दुचाकीवरून महालक्ष्मीनगर येथे हनुमान मंदिराजवळ आला असता त्याच्या मागावर असलेल्या आणि चार चाकीवरूनच आलेल्या तिघांनी मयूरच्या छाती व पोटावर चाकूने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत मयूरला तातडीने उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले.मात्र थोड्याच वेळात त्याचे प्राणोत्क्रमण झाले. दरम्यान मयूरवर झालेल्या हल्ल्याने अंबडचे ग्रामस्थ संतप्त झाले असून दीपक दातीर यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

दरम्यान घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपायुक्त राऊत, प्रशांत बच्छाव,अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह अन्य ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे.

हल्लेखोरांपैकी एक संशयित आरोपी करण कडुसकर असून त्याच्यावर अंबड ठाण्यात 18 च्या वर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपींची अंबड हद्दीत मोठ्या प्रमाणात दहशत आहे.काही दिवसापूर्वी एका पान टपरी चालकाला सिगारेट दिली नाही म्हणून जबर मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यावर किरकोळ कारवाई करत पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. त्याचवेळी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या तर कदाचित मयुरच्या खुनाची घटना टळली असती अशी परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.यां घटनेमुळे अंबड परिसरातील सर्व व्यवसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संशयित हल्लेखोरांना अटक होईपर्यंत मयूरचा मृतदेह ताब्यात घेणार नाही,असा पवित्रा अंबडच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here