🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.12ऑगस्ट):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे देवणी व देगलूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या निषेधार्थ देवणी व देगलूर तालुका पत्रकारांच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करीत आमदार किशोर पाटील यांना बडतर्फ करून इतर आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी नायब तहसीलदार राहुल पत्रिके यांच्या मार्फत दि. ११ रोजी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे.
पाचोरा येथील एका घटनेच्या संदर्भात संदीप महाजन यांनी बातमी दिली होती. त्याचा राग धरुन आ. किशोर पाटील यांनी पत्रकार महाजन यांना चार दिवसांपुर्वी फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. ही क्लीप राज्यभर व्हायरल झाल्यावर दि. १० रोजी संदीप महाजन बातमी कव्हर करुन घरी परतत असताना चार पाच जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. पत्रकारावर असे हल्ले होणे म्हणजे लोकशाही धोक्यात आल्याचे चिन्हे असुन माध्यमांची अशी गळचेपी पत्रकार बांधव कदापी सहण करणार नाहीत. आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी तसेच आ. किशोर पाटील यांना बडतर्फ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदनावर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, शकील मणियार, जयेश ढगे, मनसे तालुकाध्यक्ष सोमनाथ कलशेट्टे, भैयासाहेब देवणीकर, दिलीप शिंदे, गजानन गायकवाड, कृष्णा पिंजरे, नर्सिंग सूर्यवंशी, रमेश गायकवाड, पदमाकर सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या असून पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देगलूर तालुक्याच्या वतीने पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करणेबाबत उपजिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी देगलूर तालुका अध्यक्ष सुनिल मदनुरे, शहराध्यक्ष मोबीन शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.