Home महाराष्ट्र ‘इंडिया’ यूपीएच्या मुळावर…

‘इंडिया’ यूपीएच्या मुळावर…

144

केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात एकजूट निर्माण करण्यासाठी बंगळूरुला विरोधी पक्षांची बैठक झाली व त्याच दिवशी केंद्रातील सत्ताधारी एनडीएची नवी दिल्लीत बैठक झाली. एनडीएला शह देण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. देशात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए विरुद्ध इंडिया’ असा सामना होईल, असे बंगळूरुच्या बैठकीनंतर चित्र रंगवले गेले. प्रत्यक्षात या बैठकीत ‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीने काँग्रेसप्रणीत यूपीए आघाडीचे नामोनिशाण पुसून टाकण्याचे काम केले आहे. आम्हाला काँग्रेसचा वरचष्मा मान्य नाही आणि आम्ही गांधी घराण्याचे नेतृत्व स्वीकारू शकत नाही, यावर विरोधी पक्षांच्या आघाडीने बंगळूरुच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले आहे. ‘आता काँग्रेसप्रणीत यूपीएला विसरा, इंडिया नवे नाव घेऊन लढू या’ असा संदेश बंगळूरुच्या बैठकीने दिला आहे. इंडियाने यूपीएच्या नावाखाली असणारी काँग्रेसची मक्तेदारी संपुष्टात आणली.

डिसेंबर २०२१ मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते, “यूपीए काय आहे? यूपीए आहेच कुठे?” दीड वर्षांनी १८ जुलै २०२३ रोजी बंगळूरु येथील विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आता सारा प्रचार, सारी मोहीम, सारी प्रसिद्धी इंडियाच्या बॅनरवर होईल. कोणी त्याला आव्हान देत असेल, तर बघून घेऊ.”

यूपीए म्हणजे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स आणि इंडिया म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लूसिव्ह अलायन्स. दि. १८ जुलैच्या बंगळूरुच्या विरोधकांच्या बैठकीत ‘इंडिया’चा उदय झाला आणि यूपीएचा अंत झाला.

सन २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स)चा पराभव झाला. भाजपचे केवळ १३८ खासदार निवडून आले होते. लोकसभेत १४५ खासदार विजयी झालेला काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी यूपीए आघाडी निर्माण करण्यात काँग्रेसचा पुढाकार होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव हरकिसन सुरजित यांनी काँग्रेसला साथ देण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ भाजपचे सरकार नको, या एका मुद्द्यावर १४ राजकीय पक्षांनी काँग्रेसचे समर्थन केले. यूपीएमध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस होता. द्रमुक, राजद, पीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, लोकजनशक्ती, एमडीएमके, तेलंगणा राष्ट्र समिती, पीडीपी, आरपीआय (गवई), केरळ काँग्रेस असे पक्ष यूपीएमध्ये सामील झाले. सीपीएम, सीपीआय, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक या चार डाव्या पक्षांनी यूपीएला बाहेरून समर्थन दिले होते.

सुरुवातीला युनायटेड सेक्युलर अलायन्स असे यूपीएचे नाव होते. पण द्रमुकचे करुणानिधी यांनी सेक्युलर या शब्दाचा तमिळमध्ये अर्थ गैर धार्मिक होतो, असे सांगितल्यावर युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स असे नामकरण करण्यात आले. २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली व यूपीए सरकारमध्ये शरद पवार, लालूप्रसाद यादव, राम विलास पासवान, शिबू सोरेन, चंद्रशेखर राव, टी. आर. बाळू, दयानिधी मारन, ए. राजा, अंबुमणी रामदास असे विविध घटक पक्षांचे नेते मंत्री म्हणून सहभागी झाले.

सन २००६ मध्ये यूपीएला पहिला झटका बसला. तेलंगणा स्वतंत्र राज्याच्या मागणीवरून चंद्रशेखर राव सरकारमधून बाहेर पडले. २००७ मध्ये वायको यांनी साथ सोडली. अमेरिकेशी अण्वस्त्र करार करण्याच्या मुद्यावरून चारही डाव्या पक्षांनी यूपीए सरकारचे समर्थन काढून घेतले.

सन २००९ मध्ये काँग्रेसचे २०६ खासदार निवडून आले व पुन्हा केंद्रात यूपीएचे सरकार स्थापन झाले. या सरकारमध्ये तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, नॅशनल कॉन्फरन्स, व इंडियन मुस्लीम लीग हे पाच मित्रपक्ष सहभागी झाले होते. राजद, सपा व बसपाने यूपीए सरकारला समर्थन दिले होते. पण सन २०१० मध्ये राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करताना राजदने यूपीएचे समर्थन मागे घेतले. २०१२ मध्ये तृणमूल काँग्रेस व द्रमुक हे यूपीएतून बाहेर पडले. त्याच वर्षी आणखी काही लहान पक्ष यूपीएतून बाहेर पडले.

सन २०१४ लोकसभा निवडणुकीत मोदींच्या त्सुनामीत काँग्रेसचा देशभर धुव्वा उडाला. काँग्रेसचे देशभरात केवळ ४४ खासदार निवडून आले. काँग्रेसच्या खासदारांची ही सर्वात कमी संख्या होती. तांत्रिकदृष्ट्या यूपीए २०१४ नंतर कुठे कागदावर नव्हती. यूपीएमध्ये जे मित्रपक्ष होते, त्यांचे काँग्रेसशी संबंधही नंतर चांगले राहिले नाहीत. समविचारधारा असणारे पक्ष असा शब्दप्रयोग राजकारणात रूढ झाला. ममता बॅनर्जी यांनी डिसेंबर २०२१ मध्ये कुठे आहे यूपीए? असा प्रश्न विचारल्यामुळे भाजपविरोधात नवी आघाडी उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. यूपीएवर निवडणूक काळात भ्रष्टाचाराचे वारेमाप आरोप झाल्यामुळे यूपीएची प्रतिमा डागाळली होती. घराणेशाही व भ्रष्टाचारी असा प्रचार स्वत: नरेंद्र मोदी व भाजपने चालविल्यामुळे यूपीएच्या विश्वासार्हतेला धक्का बसला.

यूपीए हा राजकारणात टिंगल-टवाळीचा विषय बनला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यूपीएचे वर्णन करताना म्हटले, “यू म्हणजे उत्पीडन, पी म्हणजे पक्षपात व ए म्हणजे अत्याचार…”बंगळूरु येथे झालेल्या २६ विरोधी पक्षांच्या बैठकीत ‘इंडिया’ या नावाला ममता बॅनर्जी यांनीच समर्थन द्यावे, असेही ठरले. एन म्हणजे नॅशनल की न्यू?, डी म्हणजे डेव्हलपमेंट की डेमॉक्रॅसी? अशी चर्चा झाली. प्रत्यक्ष बैठकीत ममता यांनीच ‘इंडिया’ नावाचा प्रस्ताव सादर केला. राजकीय पक्षांच्या आघाडीला इंडिया हे नाव कसे काय योग्य ठरेल? अशी शंका नितीश कुमार यांनी उपस्थित केली. इंडिया नावाला सीताराम येच्युरी, डी. राजा, यांचीही फारशी पसंती नव्हती. मेहबुबा मुफ्ती यांनी तर भारत जोडो अलायन्स असे नाव ठेवावे, अशी सूचना केली. आघाडीच्या नावापेक्षा जागा वाटप हे सर्वात महत्त्वाचे आहे, असा मुद्दा अरविंद केजरीवाल यांनी मांडल्यावर त्याचे गांभार्य सर्वांच्या लक्षात आले. केरळ, पश्चिम बंगाल किंवा दिल्ली-पंजाबमध्ये डावे पक्ष व काँग्रेस विरोधात तेथील प्रादेशिक पक्ष सत्तेवर आहेत, तिथे जागा वाटप कसे होणार? हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही, असे स्वत: राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अन्य विरोधी पक्षांना हायसे वाटले.

आगामी निवडणूक एनडीए विरुद्ध इंडिया अशी होण्याची शक्यता आहे. जे भाजपच्या विरोधात आहेत, ते ‘इंडिया’च्या बरोबर आहेत, असा प्रचार राबविण्यात येणार आहे. इंडिया नावाबरोबर ‘जितेगा भारत’ अशी टॅगलाइन असेल.बंगळूरुच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या २६ राजकीय पक्षांपैकी १६ पक्षांचे १४२ खासदार संसदेत आहेत. त्यात काँग्रेसचे ४९, तृणमूल काँग्रेस २३, द्रमुक २४, आप १, जनता दल यू १६, झामुमो १, राष्ट्रवादी काँग्रेस ५, उबाठा सेना ६, सपा ३, नॅशनल कॉन्फरन्स ३, सीपीआयएम ३, आरएसपी १, वीसीके १, आययूएमएल ३ खासदार आहेत. राजद, रालोद, अपना दल के, पीडीपी, सीपीआय एम एल (एल), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, केडीएमके, एमएमके, केरळ काँग्रेस जोसेफ या दहा पक्षांचा एकही खासदार संसदेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी उभी फूट पडल्यावर शरद पवारांच्या पक्षात व अजित पवारांच्या पक्षात नेमके किती खासदार आहेत, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

✒️डॉ. सुकृत खांडेकर(मो:-9594224000)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here