🔹रक्तविर सेना फाउंडेशनचे विभागीय आयुक्तांना निवेदन
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.17 जुलै) :- महाराष्ट्रात विविधप्रकारच्या सरकारी पद भरत्या सुरू आहेत. अशात ब्रम्हपुरी तालुक्यात झालेल्या कोतवाल पद भरती परीक्षेत अपारदर्शकतेचे कृत्य दिसुन आल्याने कोतवाल पद भरतीसाठी बसलेल्या परिक्षार्थ्यांमध्ये नाराजी होती. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्व परीक्षार्थी तहसील कार्यालयात निकाल पाहण्यासाठी उपस्थित झाले. निकाल बघता वेळी तहसील कार्यालयाच्या भिंतीवर फक्त परिक्षार्थ्यांचे निकाल आलेली यादी प्रसिद्ध केली होती. आदर्श उत्तर पत्रिका दिसुन आली नाही. ह्या हि कारणाने परिक्षार्थ्यांमध्ये मनःस्ताप अनावर आले.
उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांपैकी काहीनीं तर फक्तं परीक्षेत बसुन पेपर सोडविण्याचे सोंग केले आणि तेच उत्तीर्ण झाले. अशा ही चर्चा बेधडक सुरू होत्या, कोतवाल पद भरती परिक्षार्थ्यांच्या सर्व समस्यांना लक्षात घेत ब्रम्हपुरीतील सामाजिक संघटना रक्तविर सेना फाउंडेशनने ह्या मुद्द्याला हाती घेतले. कोतवाल पद भरती परीक्षार्थ्यांच्या न्याय-हक्कासाठी आवाज बुलंद केला.
व उपविभागीय अधिकाऱ्यानं मार्फत मुख्यमंत्री, महसुल मंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. रक्तविर सेनेच्या प्रचार माध्यमातून कोतवाल पद भरती प्रकरणाची माहिती तालुक्यातील प्रत्येक गावात आणि विविध जिल्ह्यात प्रसार करण्यात आली. चालता-बोलता तालुक्यातील प्रत्येक गावात ह्या चर्चेला उधाण आलं आणि जनसामान्यांच्या मुखातून कोणी 10 लाख तर कोणी 12-15 लाख लाच देऊन उत्तीर्ण झाल्याची चर्चा सुरू झाली.परीक्षार्थ्यांना न्याय मिळावा म्हणुन प्रत्यक्ष रक्तविर सेना फाउंडेशन मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने रक्तविर सेना फाउंडेशनने विभागीय आयुक्त कार्यालय नागपुर गाठले. नागपुर ला जाऊन विभागीय आयुक्तांना कोतवाल पद भरती प्रकरणाची संपुर्ण माहिती देऊन विभाग स्तरीय चौकशी व कायदेशीर कडक कार्यवाहीची मागणी निवेदन देऊन करण्यात आली.
निवेदन देतावेळी प्रामुख्याने रक्तविर सेना फाउंडेशनचे संस्थापक/ अध्यक्ष निहाल ढोरे, उपाध्यक्ष मायासिंग बावरी, RSF चंद्रपुर जिल्हा कार्यप्रमुख प्रज्वल जनबंधु, RSF चंद्रपुर जिल्हा ग्रुप निरीक्षक सतिश उर्फ बिट्टू दर्वे, ग्रा.प मेंडकी उपसरपंच सचिन गुरनुले, परीक्षार्थी आशिष राऊत, जितेंद्र मंडपे,आशिष निकुरे उपस्थित होते.