सध्या आपल्या देशात टोमॅटोच्या भावाने उच्चांक गाठला आहे. टोमॅटोचे दर दिडशेच्या पार गेले आहेत. पहिल्यांदाच भारतात टोमॅटोचे दर इतके वाढले आहेत. टोमॅटोचे दर वाढल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. कारण त्याला यावेळी पहिल्यांदाच टोमॅटोने पैसे करून दिले आहेत अर्थात दीडशे रुपये किलो हा दर किरकोळ बाजारात असल्याने प्रत्यक्ष बळीराजाच्या हातात किती पैसे पडतात हा ही संशोधनाचा विषय आहे मात्र काहीही असो यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले आहे अर्थात असे दरवर्षीच होते असे नाही. मागील वर्षी दर कोसळल्याने उकिरड्यावर टोमॅटो अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. रस्त्यारस्त्यांत टोमॅटोचा लाल चिखल झाला होता. आज टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असताना काही लोकांना ते पाहवत नाही.
जे गोरगरीब आहेत, ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना सध्या टोमॅटो विकत घेणे शक्य होत नाही हे मान्य केले तरी ज्यांचे पोट आधीच भरले आहे ते देखील टोमॅटोच्या दरवाढीवर टीका करत आहेत. यात सगळ्यात आघाडीवर आहेत ते आपले सिलिब्रेटी. ज्या सिलिब्रेटींचे वार्षिक उत्पन्न काही कोटींच्या घरात आहे ते देखील यावर टीका करतात हे पाहून हसावे की रडावे असा प्रश्न पडतो. आता हेच पहा ना बॉलिवूडचा अभिनेता सुनील शेट्टी याने टोमॅटोच्या दरवाढीवर टीका करणारे ट्विट केले. टॉमेटोचे भाव वाढल्याने आपण आपल्या हॉटेलमध्ये टोमॅटोचा वापर कमी केला असून घरी तर टोमॅटो खातच नाही असे ट्विट केले. आता सुनील शेट्टी सारख्या अभिनेत्याला दीडशे रुपये किलो टोमॅटो परवडत नाही यावर कोण विश्वास ठेवेल? सुनील शेट्टी हा केवळ अभिनेता नाही तर तो मोठा व्यावसायिक देखील आहे. देशातील प्रमुख शहरात त्याचे हॉटेल्स आहेत.
त्याचे वार्षिक उत्पादन कैक कोटीच्या घरात आहे तरीही त्याला ही दरवाढ परवडत नाही. सुनील शेट्टी प्रमाणेच ड्रामा क्वीन राखी सावंतने एक व्हिडिओ शेअर करत आता आपण टोमॅटो विकत घेणार नाही कारण आपल्याला ते परवडत नाही आता मी घरीच टोमॅटो पिकवणार असे तिने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. आता या सिलिब्रेटींना टोमॅटो विकत शक्य नाही यावर कोण विश्वास ठेवेल ? मात्र केवळ चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य सिलिब्रेटींकडून केले जातात मात्र हे करताना आपण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहोत याचे भान त्यांना राहत नाही. भाव वाढले की त्यावर टीका करणारे सिलिब्रेटी भाव कमी झाला आणि शेतकरी अडचणीत आला तर मात्र त्यांच्याप्रति सहानुभूती दाखवत नाही.
आजवर देशात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मात्र या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसायला कोणताही सिलिब्रेटी पुढे आला नाही. (अपवाद नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे ) यातून सिलिब्रेटींची शेतकऱ्यांप्रति असलेली अनास्था दिसून येते ज्यांचा दिवसाचा खर्च काही हजार रुपये आहे ज्यांचा पोशाख आणि घड्याळे लाखो रुपयांचे आहे जे केवळ पार्ट्यांवर लाखो करोडो रुपये खर्च करतात त्यांनी भाववाढीवर न बोललेलेच बरे!
✒️श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५