Home महाराष्ट्र बहुजन समाज द्रोही-बाळ गंगाधर टिळक

बहुजन समाज द्रोही-बाळ गंगाधर टिळक

117

बाळ गंगाधर टिळक हे दोन वर्तमानपत्रे काढत हेाते – मराठीतून ‘केसरी’ व इंग्रजीतून ‘द मराठा’. त्यातील त्यांचे विचार पाहीले असता ते बहुजन समाज द्रोही होते हे स्पष्ट होते. त्यासंबंधीची काही उदाहरणे खाली देत आहे.

1) अस्पृश्यांच्या शिक्षणाला विरोध अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना कोणत्याही शाळेत प्रवेश नव्हता. महात्मा फुले यांनी पाठपुरावा केल्यानंतर इंग्रज सरकारने अस्पृश्यांना शाळेत प्रवेश देणे सुरू केले. त्याला टिळकांचा प्रखर विरोध होता. ‘द मराठा’ या इंग्रजी वर्तमानपत्राच्या दि. २६ मार्च १८८२ च्या अंकात त्यांनी “Mahar boys in Govt School” या नावाचा अग्रलेख लिहीला. त्यांत त्यांनी लिहीले की, “इंग्लंडच्या राणीने १८५८ मध्ये जो जाहीरनामा काढला आहे त्यामध्ये त्यांनी आपण भारतीयांच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करणार नाही असे आश्वासन दिले आहे व आता इंग्रज सरकार अस्पृश्यांना शाळेत प्रवेश देत आहे. ही आमच्या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ आहे”. याचा अर्थ टिळकांच्या मते अस्पृश्यांना शिक्षण देणे हे धर्माच्या विरूध्द होते.

२) इतर बहुजनांच्या इंग्रजी शिक्षणाला विरोध इतर बहुजनांच्या बाबतीत टिळकांचे मत होते की, त्यांना फार तर लिहिता-वाचता येण्याइतके जुजबी प्राथमिक शिक्षण द्यावे; इंग्रजी किंवा उच्च शिक्षण देऊ नये. जेव्हा इंग्रज सरकारने सर्वांना उच्च शिक्षणाची दारे उघडी केली त्यावेळी टिळकांनी ‘द मराठा’ च्या दि. १५ मे १८८१च्या अंकात ‘Our Education System’ या नावाचा अग्रलेख लिहून ब्रिटिशांच्या शिक्षण विषयक धोरणांवर टिका केली. त्या लेखात ते म्हणतात “सर्वांनाच इंग्रजी शिक्षण दिले तर शेतकऱ्यांचा नांगर कोण चालविणार? लोहाराचा भाता कोण चालविणार? चांभाराची रापी कोण चालविणार? या पारंपारिक व्यावसायिकांच्या मुलांना उच्च शिक्षण दिल्यास हातातोंडाला आलेली मुले त्यंच्या वयस्कर आई-वडिलांपासून दूर लोटल्यासारखे होईल. व पुढे ही मुले नोकरीसाठी आपल्याच (सरकारच्याच) मागे लागतील”. थोडक्यात बहुजनांनी आपापला पारंपारिक धंदाच करावा, त्यांनी उच्च शिक्षण घेऊन इतर क्षेत्रात प्रगती करू नये असे टिळकांचे मत होते.

अशाच प्रकारचे विचार त्यांनी कोल्हापूर जवळ अथणी येथिल सभेत व्यक्त केले होते. जेव्हा इंग्रज सरकारने विधीमंडळात बहुजनांचे प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अथणीच्या सभेत टिळक म्हणाले होते “कुणब्यांना विधीमंडळात जाऊन नांगर चालवायचा आहे काय? तेल्यांना घाणा चालवायचा आहे काय? शिंप्यांना कपडे शिवायचे आहेत काय? लोहाराला भाता चालवायचा आहे काय?” यावरून टिळक हे बहुजन-उध्दारणाच्या किती उलट होते हे स्पष्ट होते.

३) स्त्री शिक्षणाला विरोध टिळकांचा स्त्रीयांच्या शिक्षणाला तिव्र विरोध होता. त्यांनी पुणे नगरपालीकेच्या स्त्री शिक्षण विषयक ठरावाला विरोध केला होता हे सर्वश्रृतच आहे. त्यांनी ‘द मराठा’ च्या दि. ७ सप्टेंबर १८८७ व दि. १८ सप्टेंबर १८८७ च्या अंकात ‘Higher Female Education’ आणि ‘Cirriculum of the Female High School; Is it in the right direction?’ हे दोन लेख लिहिले. त्यात ते म्हणतात “शिक्षित महिला या रखमाबाई (त्यावेळची एक समाज सुधारक महिला) व रमाबाई (रानडे) यांच्या सारख्या स्वतंत्र बाण्याच्या व स्वतंत्र विचारांच्या होतील व त्या वैदिक धर्म पाळणार नाहीत व सनातनी धर्माच्या रिती-रिवाजांना विरोध करू लागतील.”

टिळकांचे स्त्री विषयक धोरण हे अत्यंत सनातनी होते. दि. १२ फेब्रुवारी १८८२ च्या ‘द मराठा’ च्या अंकात ते म्हणतात की पेशवाईच्या काळात जे स्त्री विषयक धोरण होते ते योग्य होते. पेशवाईच्या काळाचा आपण विचार केल्यास असे दिसून येते की वडिल किंवा भाऊ यांचेवर मुलींचे लग्न ९ वर्षे वयाच्या पूर्वी करण्याचे बंधन होते. त्यांनी ९ वर्षापर्यंत मुलीचे किंवा बहिणीचे लग्न न केल्यास त्यांना जबर शिक्षा होती. यासबंधी नाना फडणवीस यांनी २० आदेश काढले होते. मुलींचे लग्न लवकर न केल्याबद्दल व विधवांशी सहानुभुतीने वागल्याबद्दल किंवा त्यांचे केस वपन न केल्याबद्दल अनेक पुरूषांना शिक्षा झाल्या होत्या. टिळकांना अशा प्रकारचे स्त्री विषयक धोरण अभिप्रेत होते.

4) शेतकरी विरोधी धोरण पेशवाईमध्ये बहुतेक सावकार ब्राह्मण होते व ते शेतकऱ्यांचे शोषण करीत. दुष्काळ पडला तरी शेतकऱ्यांना सावकाराला कर्जाचे हप्ते देणे बंधनकारक होते. त्यांनी हप्ते दिले नाहीत तर त्यांनी कैदेची शिक्षा होती. ब्रिटिशांनी ही पध्दत बंद केली. त्याला टिळकांनी कडाडून विरोध केला. कर्जाचे हप्ते न देणाऱ्या शेतकऱ्यांना कैदेत टाकण्याची पध्दत बंद केली तर सावकार बरबाद होतील असे त्यांना वाटत होते. त्यांच्या मते सावकार हे शेतकऱ्यांचे देव आहेत (‘द मराठा’ दि. ३ डिसेंबर १८८२). त्यांनी सतत सावकारांची बाजू घेतली व शेतकऱ्यांना विरोध केला. शेतीची सुधारणा करण्याच्या व शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून कृषी बँक स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना टिळकांनी प्रखर विरोध केला. (‘द मराठा’ दि. ६ मार्च १८८१, २६ मार्च १८८१, ८ मे १८८१, १५ मे १८८१, २९ मे १८८१, ५ जून १८८१, २६ जून १८८१, ३१ जुलै १८८१). टिळकांच्यावर ‘Foundation of Tilak’s Nationalism – Discrimination, Education and Hundutwa’ हे पुस्तक लिहीणाऱ्या लेखिका परिमला राव यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे की, टिळक हे २५ वर्षे सतत शेतकरी विरोधी भूमिका घेत असतानासुध्दा ही बाब त्यांच्या कोणत्याही चरित्रात कशी आली नाही. परिमला राव यांना काय माहित की ही सर्व चरित्रे ब्राह्मण्यवाद्यांनीच लिहीली आहेत. (परिमला राव यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशकावर दबाव आणून ब्राह्मण्यवाद्यांनी त्याची छपाई कायमची बंद केली आहे.)

वरील माहितीवरून स्पष्ट होते की, टिळक हे उघड उघड दलित विरोधी, बहुजन विरोधी, महिला विरोधी व शेतकरी विरोधी होते. अशा टिळकांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार पंतप्रधान मोदी स्विकारणार काय हा खरा प्रश्न आहे? ते जर तो स्विकारणार असतील व शरद पवार हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील तर हे दोन्ही नेते टिळकांच्या धोरणांशी सहमत आहेत असे समजावे लागेल.

(टिळकांचा मोठेपणा दाखविण्यासाठी त्यांना तीन वेळा तुरूंगवास झाला असा गवगवा करण्यात येतो. तथापि हा तुरूंगवास त्यांना स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केल्यामुळेश अथवा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे झालेला नसून, एक शिक्षा बर्वे नावाच्या कोल्हापूरच्या दिवाणाची अब्रुनुकसानी केल्याप्रकरणी, दुसरी शिक्षा ताई महाराज नावाच्या विधवेची फसवणुक प्रकरणी व तिसरी शिक्षा पुण्याच्या प्लेगच्या साथीत ब्राह्मण जातीच्या खोट्या धार्मिक भावना भडकावून हिंसाचाराची चिथावणी देण्यासाठी झालेल्या आहेत.)

✒️एस् एम् मुश्रीफ(माजी पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र)मो:-9028402814

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here