Home महाराष्ट्र “जन्म दाती नागसेनवनाची माती”

“जन्म दाती नागसेनवनाची माती”

74

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्त मानवी जीवनाच्या उध्दारासाठी संघर्षात्मक कार्य करून राष्ट्र उभारणी मध्ये त्यांचे अत्यंत मोलाचे कार्य आहे. याच मुळे आज आपला भारत देश अखंड म्हणून दिसत आहे. येथे अनेक धर्म आणि पंथाचे लोक खेळीमेळीने जीवन जगतांना दिसत आहे कारण भारत देशात समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधूभाव रूजविण्या साठी त्यांनी आपल्याला प्रचंड अभ्यास करून व अत्यंत परिश्रमातून संविधान बहाल केले. यामुळे त्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत.हे मान्य करावे लागेल. त्यांच्याच मुळे आज आपण स्वाभिमानाने जीवन जगत आहोत. कारण पिढ्यान पिढ्या पासून अंधारात असलेल्या समाजला उजेडात आणण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले आहे. हजारो वर्ष शिक्षणा पासून वंचित असलेल्या समाजाला शिक्षणाचे महत्व स्पष्ट करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले म्हणून बाबासाहेब म्हणतात.
“हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्व आहे. हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते पण ही मोठी चूक आहे.हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न वस्त्र व निवाऱ्याची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्च वर्गाची सेवा करावयास लावणे नव्हे.खालच्या वर्गाची ज्यांच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागते.तो न्यूनगंड त्यांच्यातून नाहीसा करणे. चालू समाज पद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपणे लुबाडण्यात आले आहे.त्याचे स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे.याची त्यांना जाणीव करून देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे.उच्च शिक्षणाच्या प्रसारा खेरीज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर माझ्या मताप्रमाणे हेच औषध आहे”
म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करून समस्त बहुजन आणि दिन दलित समाजाच्या जीवनात शिक्षणाचा उजेड पेरला.त्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिनांक ८ जुलै १९४५ ते ८ जुलै २०२३ ला ७८ वर्ष पूर्ण होतात. या सोसायटीने दिन दलित दुबळ्या मेल्यागत असलेल्या माणसाच्या शरीरात शिक्षण रुपी ऑक्सिजन पेरून इथल्या समस्त बहुजन समाजाला नवजीवन प्राप्त करून दिले आहे. याचे जिवंत उदाहरण आज आपल्याला समाज माध्यमातून दिसून येते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीने आपल्या देशाला समृद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञ,विचारवंत, डॉक्टर, इंजिनीयर, लोकनेता शिक्षण तज्ञ, प्रशासनातील अभ्यासू व्यक्तिमत्व, राष्ट्रीय खेळाडू, कलावंत, चित्रकार, पत्रकार, लेखक, कवी आणि समृद्ध समाज निर्मितीसाठी संस्कारमय शिक्षण देणारे नागसेन निर्माण केले. याचा सार्थ अभिमान आम्हा भारत वासियांना आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी चा विस्तार : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व यामधूनच समृद्ध देश निर्माण होण्याकरिता त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून बालवाडी पासून ते उच्च महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत त्यांनी संस्थेच्या शाखा विविध ठिकाणी निर्माण केल्या त्या पुढील प्रमाणे १) सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,मुंबई – १९४६, २) सिद्धार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई- १९५३,३) सिद्धार्थ विधी महाविद्यालय,मुंबई – १९५६, ४) डॉ.आंबेडकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय,वडाळा,मुंबई- १९७१, ५) डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा मुंबई – १९७८, ६) मिलिंद कला महाविद्यालय नागसेनवन,औरंगाबाद – १९५०,७) मिलिंद विज्ञान महाविद्यालय नागसेनवन, औरंगाबाद -१९५०,८) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय नागसेनवन, औरंगाबाद – १९६०,९) डॉ.आंबेडकर विधि महाविद्यालय, नागसेनवन, औरंगाबाद- १९६८,१०) पी. ई. एस.शारीरिक शिक्षण महाविद्यालय,नागसेनवन औरंगाबाद-१९८४,११) पी. ई. एस. इंजीनियरिंग कॉलेज नागसेनवन, औरंगाबाद,१२) पी. ई. एस. पॉलिटेक्निक कॉलेज, नागसेनवन, औरंगाबाद,१३) बुद्धिस्ट स्टडी सेंटर नागसेनवन, औरंगाबाद, १४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय महाड -१९६१,१५) डॉ. आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, येरवडा, पुणे-१९६५,१६) सिद्धार्थ औद्योगिक आणि प्रशासन महाविद्यालय,मुंबई – १९६७,१७) सिद्धार्थ सायं विद्यालय मुंबई – १९४७,१८) मिलिंद बहुविध विद्यालय, नागसेनवन,औरंगाबाद -१९५५,१९) मिलिंद प्राथमिक विद्यालय नागसेनवन, औरंगाबाद -१९७५,२०) मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय, औरंगाबाद-१९६५,२१) गौतम विद्यालय,पंढरपूर -१९७४,२२) पी. ई.एस. विद्यालय,न्यू मुंबई -१९७८,२३) नागसेन विद्यालय,नांदेड -१९८१,२४) पी.ई.एस.इंग्रजी माध्यम विद्यालय,मुंबई -१९८३,२५) पी. ई. एस. नागसेन विद्यालय, बंगलोर- १९८४,२६) संत गाडगे महाराज चोखामेळा विद्यार्थी वस्तीगृह, पंढरपूर-१९४९,२) मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी आश्रम, दापोली-१९६२,२८) सुभेदार सवादकर विद्यार्थी आश्रम,महाड -१९७८,२९) सिद्धार्थ विहार वस्तीगृह वडाळा, मुंबई -१९६४, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वरील शाखा सध्या कार्यरत असून या नंतरच्या काळात ज्याप्रमाणे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार व्हायला हवा होता. तो झाल्याचे दिसत नाही याचे शल्य समाज मनात आहे.
मिलिंद महाविद्यालय नागसेनवन, औरंगाबाद १९ जून २०२३ ला मिलिंद महाविद्यालयाचा वर्धापन दिन आहे.या निमीत्ताने महाविद्यालयाच्या इतिहासाला उजाळा देण्यासठी हे शब्दांकन!. मिलिंद महाविद्यालय म्हणजे एक संस्कार केंद्र असून या महाविद्यालयाने दिन दलित दुबळ्या बहुजन समाजातील हजारो वर्षाचा अंधार दूर केल्याचे आज आपल्याला दिसून येते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कष्टातून प्रचंड परिश्रमातून मिलिंद महाविद्यालयाची ही जिवंत वास्तु निर्माण केलेली आहे.१९ जून १९५० रोजी मिलिंद महाविद्यालय सुरू झाले. सुरुवातीला या कॉलेजमध्ये बी. ए. आणि इंटर सायन्स पर्यंत शिक्षण दिले आणि दुसऱ्याच वर्षी सायन्स डिग्रीपर्यंत वर्ग उघडून हे संपूर्ण कॉलेज करण्याचे ठरविले हे कॉलेज बाबासाहेबांनी सुरुवातीलाच भाडेतत्त्वावर भाड्याच्या बंगल्यात सुरू केले हे बंगले कॅन्टोन्मेंट म्हणजे छावणी भागात असल्यामुळे दोन महिन्याची नोटीस देऊन खाली करण्यास मिलिटरी केव्हाही सांगू शकेल, याची चिंता बाबासाहेबांना होती. बाबासाहेब रात्रंदिवस कॉलेजच्या चिंतेत असायचे या ठिकाणी कॉलेजच्या गरजेच्या मानाने सध्याची जागा अगदीच अपुरी पडते याची जाण बाबासाहेबांना सतत सतवायची याच वेळी विद्यार्थ्यांकडून होस्टेलची मागणी सुद्धा वारंवार होत होती. कारण स्थानिक विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. आणि शहरात इतरत्र राहण्याची पुरेशी व्यवस्था नाही.या सर्व कारणांमुळे कॉलेजला स्वतःची इमारत बांधणे अत्यंत जरुरीचे आहे.आणि त्या दृष्टीने सोसायटीने इमारत बांधायला सुरुवात केलेली आहे . याची सतत चिंता बाबासाहेबांना असायची यामुळे या वास्तूशी बाबासाहेबांची नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. म्हणून हे महाविद्यालय समस्त जनतेने आणि आंबेडकरी अनुयायांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी अनंत कष्ट घेतलेले आहेत.
मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीच्या संदर्भात बाबासाहेब माहिती सांगतात सोसायटीने मोठी धोंड शिरावर घेऊन हे कॉलेज सुरू केलेले आहे. ती धोंड किती आहे याची फारच थोड्यांना कल्पना आहे. हैदराबाद संस्थानातील उन्नतीसाठी निजाम सरकारने उभारलेल्या एक कोटी रुपयांच्या शेड्युल कास्टस ट्रस्ट फंडातून बारा लाख रुपये कर्ज घेऊन सोसायटीने हे कॉलेज सुरू केलेले आहे.आम्हाला कर्ज बिनव्याजी दिल्याबद्दल फंडाच्या बोर्डाचा मी आभारी आहे.उपकार मानण्यासारखीच ही गोष्ट असली तरी वार्षिक पन्नास हजार रुपयांच्या हप्त्यांनी हे कर्ज फेडावयाचे आहे.ही गोष्ट सोसायटीला दृष्टी आड करता येणार नाही.ही परतफेड १९५६ पासून सुरू होणार आहे. या बारा लाख रुपये कर्जातून इमारत आणि इतर सामान – सुमान यावर खर्च करावयाचा होता. आतापर्यंत उपकरणे आणि फर्निचर यावर तीन लाख रुपये खर्च झालेले आहेत. हे वजा जाता साधारणपणे नऊ लाख रुपये सोसायटीच्या हातात. राहतात कॉलेजच्या इमारतीसाठी २० लाख रुपये लागतील असा अंदाज आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळमळीतून स्पष्ट केलेला हा इतिहास डोळ्यासमोरून जातांना आपले डोळे पाणावतात.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते १सप्टेंबर १९५१ रोजी बसविण्यात आली. या प्रसंगी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. आंबेडकर अस्पृश्य आणि गोरगरीब समाजात करीत असलेल्या शिक्षण प्रसार – प्रचार कार्याबद्दल गौरवोद्गार काढून कौतुक केले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ध्येय आणि उद्दिष्टांची त्यांनी प्रशंसा केली. राष्ट्रपतींनी प्रत्यक्ष कोनशिला बसवण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना का व कशासाठी केली याची सविस्तर माहिती दिली आणि हे कॉलेज उघडण्यासाठी हैदराबाद संस्थानाचीच का निवड करण्यात आली . याचे कारण ही बाबासाहेबांनी स्पष्ट केले. बाबासाहेब राष्ट्रपतींना महाविद्यालयाची वाटचाल सांगून महाविद्यालयाचे महत्व स्पष्ट करताना सांगतात या कॉलेजमध्ये विशेष म्हणजे मुलांच्या बरोबरच मुलीही शिक्षण घेत आहेत.सामाजिक मागासलेपणा आणि सहशिक्षणाचा हा गंध ही नसलेल्या या भागात मुलांच्या बरोबरीने मुलींनाही शिक्षण देऊन कॉलेज एक नवीनच पायंडा घालीत आहे. या कॉलेजमध्ये सर्व जातीच्या धर्माच्या मुली शिक्षण घेत आहेत. मुलींना शिक्षणाला उत्तेजन मिळावे व मोठ्या संख्येने त्यांनी कॉलेजमध्ये यावे म्हणून शहरापासून कॉलेजपर्यंत येण्याकरिता कॉलेजने एक बस ही ठेवली आहे.या कॉलेजचे द्वार सर्व धर्मीयांना मोकळे आहे.येथे कुठल्याही प्रकारची जातीयता नाही. कॉलेजच्या प्राध्यापक वर्गात सर्व धर्माचे आणि जातींचे प्राध्यापक आहेत. विद्यार्थ्यांनी विद्या विनय आणि शील बनविणे हे कॉलेजचे ध्येय आहे.
१९ जून १९५० रोजी मिलिंद महाविद्यालय सुरू झाले.त्या वेळी सुरुवातीला फक्त १४० विद्यार्थी होते. हे कॉलेज सर्व साधनांनी युक्त करण्या करिता सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीने कोणतीही संधी दवडली नाही.कॉलेजने एक लक्ष २६ हजार रुपये खर्च करून लॅबोरेटरी सर्व प्रकारची उपकरणे व साधने यांनी सुसज्ज केले आहे.यासाठी तज्ञ डेमॉनस्ट्रेटरच्या देखरेखी खाली सायन्सच्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतः प्रयोग करण्यास संधी मिळते.हेच नाहीतर एका वर्षात या कॉलेजला एक सुंदर लायब्ररी आहे.त्यात कॉलेजला लागणारी सर्व प्रकारची पुस्तके आहेत.सोसायटीने या लायब्ररी करिता चाळीस हजार रुपये खर्च केले असून एक वर्षाच्या आतच चार हजार पुस्तकांचा संग्रह केला. वांड:मयीन आणि चौसष्ट विषया वरील मासिके येथे येत असतात. कॉलेज विद्यार्थी आणि संशोधन करणारे विद्यार्थी या दोघांनाही उपयुक्त होईल अशी ही लायब्ररी व्हावी अशी सोसायटीची इच्छा आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकास होण्यासाठी खेळ आणि व्यायाम याकडे खास लक्ष पुरविले जाते. मुलांच्या शास्त्रीय आणि बौद्धिक विकासाकडे ही लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यात शास्त्रीय विषयांची आवड निर्माण करण्यासाठी तांत्रिक औद्योगिक आणि संशोधन स्थळांच्या सफरी करण्यात येतात.वाद-विवाद वांड:मय आणि सायन्स अशी मंडळे स्थापन करण्यात आली आहे. आणि या सर्वांचा फायदा पुष्कळ विद्यार्थी घेत आहेत.
यापुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात लोकांच्या डोळ्यात भरण्यासारखे कॉलेजने जे काही मिळवलेली असेल त्याचे सर्व श्रेय केवळ कॉलेजलाच जावे असे मी म्हणत नाही. तर त्याचे इतरही वाटेकरी आहेत आणि याकरता सोसायटी सर्वांची ऋणी आहे. हे मी जाहीर करतो. या यशाच्या वाटेकऱ्यात जे माझे मित्र आहेत त्यात हैदराबादचे माजी शिक्षण मंत्री श्री. राजा धोंडी राज बहादुर हे आहेत. त्यांच्या मदतीशिवाय कॉलेज सुरू करणेच शक्य झाले नसते. तदनंतर हल्लीचे मुख्य प्रधान श्री. एम. के. वेलोदी, अर्थमंत्री श्री. सी. व्ही. एस. राव, महसूल मंत्री श्री. शेषाद्री, शिक्षण मंत्री श्री. रामकृष्ण राव, त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र श्री.गोपालस्वामी अय्यंगार,मिनिस्टर फॉर स्टेट उस्मानिया युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर नबाब आल्लीयावर जंगबहादुर, हैदराबाद.शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट फंडाचे सेक्रेटरी श्री.आबासे, औरंगाबादचे त्यावेळी चे कलेक्टर श्री.राजवाडे,लँड ऍक्वीझिशन ऑफिसर श्री.अष्टपुत्रे, हैदराबाद. स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष श्री.बिंदू,पी.डब्ल्यू.डी.मंत्री श्री.नबाबजंग यावरजंग, पीडब्ल्यूडी चे आर्किटेक्ट दवे या सर्वांची मी अंतकरणपूर्वक आभार मानतो. आभार मानताना कॉलेजचे प्रिन्सिपाल आणि त्यांचे इतर सहकारी वर्ग यांना मी विसरू शकत नाही. कारण त्यांनी आपली घरे दारे मुंबईत सोडून औरंगाबादला येण्याचा अपूर्व स्वार्थ त्याग केलेला आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये प्रत्येकाचे आभार मानून हे महाविद्यालय किती कष्टातून उभे राहिले याचा संक्षिप्त इतिहासच आपल्यासमोर मांडला आहे. आज मिलिंद महाविद्यालयाचा वर्धापन दिन असल्याने मिलिंद महाविद्यालयांच्या आठवणी जागृत होणे साहजिकच आहे. या कालावधीमध्ये सोसायटीत अनेक चढउतार निर्माण झाले आणि या बरोबरच मिलिंद महाविद्यालयात ही सोसायटी प्रमाणेच अत्यंत खडतर प्रसंग व चढउतार निर्माण झाले याला आपण सर्वजण साक्षीदार आहोत .आपल्यातीलच महाभाग उजागर होताना येथे दिसून येतात.याला सावरण्याचे काम मिलिंद महाविद्यालयाचे अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले ज्यांना बाबासाहेबांचा सहवास लाभला असे दिवंगत प्राचार्य एस.टी.प्रधान साहेब यांची कन्या प्रसिद्ध विचारवंत,आयरन लेडी डॉ.वैशाली प्रधान मॅडम मिलिंद महाविद्यालयाला प्राचार्य म्हणून जेव्हा पासून लाभल्या तेव्हापासून मिलिंद महाविद्यालय चांगल्या प्रकारे भरभराटीच्या दिशेने कार्यरत आहे.त्यांचे ध्येय आणि उद्दिष्टे म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातील मिलिंद उभं रहावं या साठी त्या सतत कार्यरत आहेत. बोधी वृक्षाच्या हिरवळी सारखं मिलिंद ला बहर यावा ही अपेक्षा करतो.

संदर्भ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे – खंड १८ भाग ३
प्रा.देवानंद पवार औरंगाबाद
संवाद : 9158359628
bodhiparnprakashan@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here