नक्की प्रेम म्हणजे काय असतं?हो..
काय असतं?
आईच वडिलांचं बाळावर असणार प्रेम …खर प्रेम की गोठ्यातल्या गाईवर असणार शेतकऱ्याच प्रेम…खर प्रेम.?
की…
एखाद्या टपोरी मुलावर शरीर आकर्षणाने निर्माण झालेलं प्रेम..?? अथवा
केवळ दिसायला सुंदर म्हणून आकर्षित होऊन तिच्यावर होणारे प्रेम वा तिची लागलेली ओढ…!
खरं प्रेम….?
आपला रोज भेटणारा आणि सोबत खेळणारा मित्र आला नाही तर लहानपणी अनेक वेळ रस्त्या कडे डोळे फाडून त्याची वाट बघत राहणे हे सुद्धा प्रेमच आहे ना..कारण ओढ हि मनातून असते ना__
नवख ओढiळ आणि दुधाळ वासरू कुरवाळणे आणि त्याला गोंजारणे हे सुद्धा प्रेमच आहे ना__?
घरी चिमण्या येतात म्हणून तांदूळ टाकणारी आणि टाकायला लावणारी आजी,तिची चीमण्याप्रती असलेली भावना म्हणजेच असणारी ओढ हे एक प्रेमच ना..?
आपल्या खुंट्या ला असणारा केसरी ” नावाचा बैल उन्हाळ्यात लवकर घरी नाही आला तर हुर हुरून जाणार मन आणि तो कुठ बरं गेला असेल अशी लागणारी चिंता म्हणजेच प्रेम च ना..!
आपल गावं म्हणून जी भावना मनात निर्माण होते ती भावना म्हणजेच प्रेम..
गावाचे शेजारी दिमाखात उभ असणार आंब्याच,चिंचेचं,कवठाच,पेरूच, बेलाच झाड फळे मिळाल्यानंतर किती हवंहवंसं वाटत,केवळ फळच नाही तर त्यांची गार सावली मनाला किती शांती देऊन जाते त्यांचे प्रती असणारी आत्मियता पण प्रेमच आहे ना..!
अगदी समाजासाठी जिवाचं रान करणारे समाज सुधारक त्यांचे प्रती असणारे आत्मभान आणि आपुलकी हे सुद्धा एक प्रकारचे प्रेम च आहे…
प्रेमाबद्दल लिहायचे झाल्यास, “माणसाचे मनात निर्माण झालेल्या उचित गोष्टी प्रती सकारात्मक भावना म्हणजेच प्रेम” बाकी काही नाही.
पण एखादा प्रियकर, प्रेयशी अथवा नवरा,बायको यांचं प्रेम हे वेगळं असतं.
दोन दिवसांचे आधी एका साहिल नावाचे प्रियकराने आपल्याच नाबालीग प्रेयशिस अगदी निर्घृण पने भोसकून ठार केले..
त्याने केवळ भोसकले च नाही तर ती ठार व्हावी म्हणून तिचे डोक्यावर दगड घालून आपला अतिउग्र राग व्यक्त केला आणि तिचा जीव घेतला.
तिचे आणि त्याचे प्रेम होते,
तिचा पुन्हा नवीन बॉयफ्रेंड होता,
ती त्याला टाळत होती,
तिचे अनेक अकाउंट होते,
तिला वकील बनायचं होत …अशा किती नी कितीक गोष्टी सामोर आल्या पण तिचे मृत्यू नंतर त्या गोष्टीला अर्थ उरत नाही.
प्रेम…हे असं कधीच नसतं.
ते निराकार असतं..
एक संथ आणि हळूवार मनाची हालचाल..आणि एक अभौतिक विचारांचं मंथन ज्यात अपेक्षित आणि उचित गोष्ट भेटलीच पाहिजे अशी भावना कधीच नसते.
जसे भक्ती करणाऱ्या भक्तास हरी,पांडुरंग कधीच स्पष्ट दिसत नाही पण तरीही त्याची भोळी भावना असते.की ….
“” गेला हरी कुण्या गावा…””
अर्थातच तो मनातल्या मनात तल्लीन असतो आणि आनंदी असतो यात कोणताच स्वार्थ भाव राहत नाही.
आई वडील आपल्या मुलांवर अपार प्रेम करतात पण त्यांनी कधी बोलल्याचे ऐकिवात नाही की बाळा आई लव यू…!
आणि ह्या म्हणायच्या गोष्टी कधीच नसतात.
त्या कृती आणि जबाबदारीतून आपोआप व्यक्त होत असतात.
आपल्या मुलांना पोटभर जेवण मिळावं म्हणून उपाशी राहणारे आई वडील..आपल्या लहान भावांना ,बहिणींना उपास पडू नये म्हणून उपास भोगणारा थोरला भाऊ हा बापा समान च असतो पण तो सुद्धा कधीच म्हणत नाही.की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे कारण ते जबाबदारी तुन व्यक्त होत.बोलण्यातून नाहीच…
शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना वारंवार संस्कार आणि निती शिकवत असतात चुकीच्या वेळी छडी मारत असतात..त्यांचे समोर कोणतच व्यसन करत नाहीत हे सुद्धा त्यांचं त्यांचे विद्यार्थ्यावर असणार प्रेम च आहे ना..
अगदी शाळा,कॉलेज झाल्यावर सुद्धा तुम्ही काय करत आहात कसे आहात.?याचे चौकशी करणारे शिक्षक,प्राध्यापक यांना असणारी आपुलकी म्हणजे पण तुमच्या प्रती असणारे प्रेम च आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला जीव ओवाळून टाकून मृत्यूच्या अग्निकुंड मधे उडी मारणारे शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू, बिरसा मुंडा यांचे पण मातृ भूमीवर अपार प्रेमच होते ना..म्हणून तर त्यांनी जीवच अर्पण केला..क्रांतिकारकांचे देशाप्रती असणारे प्रेम हे सर्वश्रेष्ठ प्रेम होय.
या प्रेमाची तुलना आई चे प्रेमाशी सुद्धा करता येणार नाही.
कारण क्रांतिकारकांचे प्रेम हे शंभर आईचे मना येवढे असते.
एक आई केवळ आपल्या एक दोन बाळा प्रती प्रेम अर्पण करते पण क्रांतिकारी देशभक्त हे लाखो,करोडो देश वासी लोकांसाठी प्रेम अर्पण करत असतात.आम्ही प्रेमाची व्याख्या कशी करत आहोत हेच वर्तमानात कळत नाही आहे..!
कुणी मुलगी,एखादी स्त्री पळून गेली आणि तिकडे तिच्या प्रियकराने तिची हत्या केली अथवा तिची कुठे तरी विक्री केली..असे अनेकदा वाचण्यात ऐकण्यात येते आणि त्याला बॉण्ड असतो मग प्रेमाचा…प्रेम येवढं अस असतं का की जे पळून जायला भाग पाडत..?
प्रेम अस येवढं कमजोर कधीच नसतं.
प्रेम हे शक्तिशाली असतं.
यात नवनिर्माण असतं आचार, विचार,संस्कार यांनी ओतप्रोत झालेलं असतं.
आपल्या सोबत सर्वांगीण विकासाची चळवळ निर्माण करणार.. आणि आदर्श निर्माण करणार असत.
प्रेम वाहणार असतं साचून दुर्गंधी करणार नसतं.
प्रेम बहरणार असतं विकासाला चालना देणार असतं यात विनाश नाही तर उत्कर्ष असतो.
प्रेमात लालसा,लोभ,इर्षा,मद,मत्सर ह्या गोष्टी नष्ट होऊन माणसाचं मन योग्या सारखं पवित्र होऊन त्याला एका वेगळ्या मानसिक अवस्थेवर घेवून जात असत.
ते केव्हा …?
तर जेव्हा त्याला आयुष्याचे सत्याची आणि खऱ्या जाणीव नेणिवेची जाणीव होते तेव्हा__
प्रेम म्हणजे जनु वाहणारा वाराच जे दिसत नाही पण जाणवतं..
मनाची तल्लीनता,सुदृढता निर्माण करणार प्रेम…
अगदी खिशात रुपया नसतांना सुद्धा मनाला लखपती असण्याचा भास देणारं सुद्धा प्रेम च असतं..
पण प्रेम कसं आणि त्याची व्याख्या प्रेत्येकाप्रती वेगवेगळी असते.
त्याला सिमा नाही.
अगदी कॉलेज मध्ये तुम्ही कधी येता म्हणून रस्त्याकडे डोळे लावून बसणारी नवखी मैत्रीण..तीच तात्पुरतं का असो ना ते पण प्रेम च असतं.
तिला काही गोष्टी कळत नाहीत म्हणून किंवा तुमच्यासोबत तिला कंफर्टेबल वाटते म्हणून तुमची ती तात्पुरती वाट बघते.
तुम्ही किती चांगले आहात याची प्रचिती आल्यावर आपली जात एक नाही म्हणून कधी तरी ती म्हणते की ” लव्ह मॅरेज च करने मला आवडेल… म्हणून तुमची टेस्ट घेते.
ह्या गोष्टी तुमच्या श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या दर्शक असतात.
तेव्हा तुम्ही म्हटलं पाहिजे की आधी आपल्या पायावर उभी राहायला शिक आणि मग कर हा विचार कुणी चांगला मुलगा भेटला तर__ हे वाक्य तिच्या मनात कोरले जातात आणि राहतात अगदी तिच्या आयुष्याचे शेवट पर्यंत.कुणाच्या असहाय तेचा आणि वेळेचा फायदा संधी साधू लोक घेत असतात.त्यात तरुण वर्ग सध्या तरी आघाडी वर आहे.
वर्तमानात प्रसारित,प्रचारीत होणारी चित्रपट,गाणी,धारावहिक, यामध्ये केवळ आणि केवळ हिरो,हिरोईन यांचं प्रेम प्रकरण..त्यात आपल्या घराचे,समाजाचे विरोधात त्यांनी बंड करून केलेलं प्रेम हे पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलांचे डोक्यात घर करत असतं आणि त्यातून अनेक स्टोरी निर्माण होतात.
गावातील एखादी मुलगी पळून जाऊन लग्न करण्यात यशस्वी झाली तर आपण सुद्धा यशस्वी होऊ असा गैरसमज सुद्धा कफल्लक प्रेमाचा आविष्कार करून टाकतो मग त्यात आयुष्य खराब झालं तरी चालते..याला प्रेम म्हटल्या जाणार नाहीच..
आपल्या सभोवताल असणारा समाज सुद्धा तेवढाच परिणामकारक असतो,आपली संगत कुणासोबत आहे हे सुद्धा या प्रेम होने न होण्याला कारणीभूत असते.असे एकंदर चित्र आहे..
प्रेमाच्या नावाखाली शरीराची लचके तोडून मनाची शांती करणारे बहुतेक प्रेमवीर असतात.आणि काही लोकांना या गोष्टीत रस असतो आपली वासना शांत करण्यासाठी वापरून घेतलेलं एक नाव म्हणजे प्रेम होय.यात भलेभले लोक फसले आहेत..हनी ट्रॅप मधे बडे अधिकारी अडकले आणि त्यांनी आपले देशाची माहिती शत्रू राष्ट्राला पोहोचविली ते सुद्धा शारीरिक आकर्षण आणि शाब्दिक प्रेमाच्या कित्त्यातच नाही का..?म्हणून प्रेम होत नसतं त्याचा बाजार होत असतो.
एखाद्याचा काळ कठीण आहे म्हणून त्याचा वापर करून घ्यायचा आणि आपल्या मनाची शांती झाली की त्याला बाजूला सारून टाकायचं..या प्रकाराला सुद्धा प्रेम म्हणता येणार नाहीच.
प्रेमाचे अनेक रंग आहेत आणि त्यात सांस्कृतिक प्रेम आणि राष्ट्रीय प्रेम याची तुलना नाहीच.
सामूहिक कुटुंब पद्धती पाश्चिमात्य विचारधारेचे प्रभावाने लोप पावू लागली आणि नव वसाहतवाद चालू झाला.आपण कंपनीत जाऊन काम करू हे वसाहतवादाच च एक स्वरूप आहे.ज्यात केवळ नवरा आणि बायको व त्यांची मुले हेच कुटुंब असतं.बाकी म्हाताऱ्या लोकांना थारा नसतो सोबतच नातेवाईकांना सुद्धा नाही कारण ते प्रगत समजल्या जातात रोज असणाऱ्या ड्युटी मुळे त्यांचेकडे वेळच नसतो.आणि महिला सशक्तीकरण हा एक भुरळ घालणारा शब्द ज्या शब्दामुळे स्त्रियांना बंड करण्याचं मोठं बळ येत..आलच पाहिजे ते पण सकारात्मक गोष्टी साठी नकारात्मक गोष्टी साठी नाही.आपला जीवन साथी आपणच निवडला पाहिजे अशी भावना निर्माण होणे आणि निवडणे म्हणजे आपण परिपूर्ण आहात असे नाही.तुम्ही तरुण आहात वेगाने मार्ग क्रमण करू शकता याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सर्व रस्ते माहीत आहेत ते रस्ते समाजातील बुजुर्ग लोकांना आणि समाजाच्या पारंपरिक संस्कृतीत दडलेले असतात.आणि जेव्हा एखाद्या वृक्षाच मुळ तुटते ते नासते तेव्हा वृक्ष खंगत असतो.तसचं तरुणांचं आहे त्याच सामाजिक,सांस्कृतिक मुळ तुटलं की तो संपला आणि त्यातूनच प्रेम विवाह,पलायन,अपहरण,हत्या असे प्रकार घडून जातात.जे लोक महिन्याला काही रुपये कमवीत असतात ते पूर्णतः वयक्तीक स्वातंत्र्यात असतात त्यांना वाटत आपण जे करतो ते योग्यच..इथूनच वाटा निर्माण होत जातात.
अलीकडे महाराष्ट्रातील मुली बेपत्ता होत आहेत अशी न्यूज आली.त्यातल्या त्यात नागपूर मधील सुद्धा पाच हजाराचे आसपास मुली बेपत्ता आहेत अशी न्यूज आली..या गोष्टींना सुद्धा काही आमिष आणि प्रेम याचा टच आहेच शिवाय निघून जाणाऱ्या मुलींची परिस्थिती अथवा त्यांचा काहीतरी वेगळं करण्याचा इगो हा कारणीभूत असेल.
प्रेम करणारी मुल वेगवेगळ्या प्रकारची असतात.प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष,व्यावसायिक, भिक्षेकरी आणि संधीसाधू या पैकी व्यावसायिक प्रेमी खूप खतरनाक असतात.ते संबंधित मुलीची विक्री करतात किंवा तिला वेशव्यावसाय करायला भाग पाडतात.अन्यथा मानवी अवयव सुद्धा विकले जातात त्यातून सुद्धा ते पैसा कमवित असतात.पण मुलींना या संबंधाने माहिती नसते व त्या फसल्या जातात.व परिणामी आपल कुटुंब, समाजच नाही तर आपला जीव गमावून बसतात.केवळ मुलांच्याच नाही तर मुलींचे माध्यमातून सुद्धा प्रेमाचा वापर करून पैसा गोळा करण्याचं फ्राड काम केल्या जात आणि यात पण अनेक मुल अडकली आहेत तशा बातम्या आपण पेपर व टिव्ही वर बघितल्या असाल.
संत कबीर म्हणतात
“” पोथी पड पड जग मुवा..
पंडित भया न कोय __
ढाई अक्षर प्रेम का..
पढे सो पंडित होय __ याचा अर्थ केवळ पोथी वाचून अर्थ नाही तर या जगात सर्व मानव प्राण्या संबंधात प्रेमाने वागा,पशू,पक्षी,जलचर,वनचर याबद्दल प्रेमभाव ठेवा.दुःखी लोकांना मदत करा.रोग्यांची सेवा करा.विनाकारण कुणाला त्रास देऊ नका.हे खरं प्रेम आहे केवळ आपला हेके खोर पना पुढे करून कुटुंबाला खाली बघायला लावणार प्रेम नव्हे तो अनाचार आहे.
संतांनी मानव प्रेमाचा संदेश दिला होता आणि आजही त्यांचे विचार प्रासंगिक आहेत.
आज बघतो तर काय सर्वत्र धिंगाणा झालेला आहे.
खंजरी वाजवून तुकडोजी महाराज सांगायचे.. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे__
पण जगाला प्रेम अर्पण करण्याचं सोडा प्रेमात जगण्याच्या आणा भाका घेणारे प्रेमी लोक एकमेकांचे जीवावर उठत आहेत.
कधी प्रेमातील मुलीची हत्या होते तर कधी मुलाची हत्या होते.
स्वतः हत्या करता येत नसेल तर काही गुंड प्रवृत्तीचे लोक मागे लावून त्याला अथवा तिला संपवलं जात.. असं फालतू मरायच वा मारायचं मग पडायचं कशाला प्रेमात..??
काही लोक तर असे आहेत की प्रेमात पडतील पण मग आपल्या हातून फार मोठा गुन्हा झाल्याची मानसिकता निर्माण होऊन स्वतःस फासावर जातात.कधी कधी एकच व्यक्ती तर कधी कधी दोघे पण___ प्रेमात पडून जातात पण जगण्याची कला माहीत नाही आधार नाही मग ते दोघेपण स्वतःच स्वतःचे आयुष्य संपवून जातात अशा विचित्र घटना घडत आहेत..म्हणून सावध असने काळाची गरज झाली आहे.
झिंग नांग चिक नाग वाले वर्हाडी झटका फेम कवी खूप छान गान म्हणायचे..
नव नव असते तवा
भली वाटते खुशी __
गळ्यi कडे आल म्हणजे
मरते घेऊन फाशी… अर्थातच जबाबदारी घेता आली नाही की आयुष्य नकोस होत आणि ते लोक जीव देतात किंवा जीव घेतात हि स्थिती चिंताजनक आहे.
मनुष्य बुद्धिमान प्राणी आहे.तारुण्य प्रत्येकास लाभते पण ते केवळ मजा करण्यासाठी नसते.आयुष्यात मोठं काम करायचं असेल तर काही गोष्टीचा त्याग करावाच लागेल.अन्यथा अपेक्षित यश तुम्हास मिळणार नाही.
प्रेमात ती आणि तो अतिशय महत्त्वाचे घटक असतात.लोकांसाठी ती अथवा तो कितीही वेगळे असले तरी ते एकमेकांसाठी अप्रतिम असतात.
यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो म्हणतात.किंवा त्यांचं संभाषण आणि यामुळेच त्यांचं प्रेम घट्ट होत जाऊन बाकी आप्तांचे प्रेमळ बंध तुटत जाऊन ते एका वेगळ्या जगात असल्याचा त्यांना भास होऊन ते एकरूप होऊन दुसऱ्याच विश्वात ते निघून जातात यालाच प्रेमातील पलायन असे म्हणत असतील.
प्रेमी युगुलाचे प्रेम हे साबणाच्या फुग्यासारखे असते.
जमले तर जमले नाहीतर खंगले..
यात तरुणाने लक्षात घेतले पाहिजे.
ती तुमच्यावर पूर्णतः विसंबून आलेली आहे..
जीव ओवाळून टाकला आहे तुमच्यावर..
आपल कुटुंब,आपल घर,आपले नातेवाईक या सर्व लोकांना सोडून दिल आहे तुमच्यासाठी..
आणि हवाली केलंय स्वतःला तुमची गुलाम म्हणून..मग तिचा पण तेवढा च करा न आदर..!
ती केवळ ती आहे का नाही.??ती त्या पेक्षा ही अधिक असते.
आयुष्याचे सोबतीला ती प्रेयशी,पत्नी म्हणूनच नाही तर तुमची आई बनून तुमची बहिण म्हणून तुमची काळजी घेणारी तीच असते ना..?मग तिला सुद्धा आयुष्य म्हणून काही अधिकार आहेच की__
तुमच्यासोबत आली,लग्न झाले म्हणून ती गुलाम नाहीच..पण त्या प्रकारात गुंतलेल्या संबंधित तरुणांची मानसिकता कशी आहे यावर त्यांचे आयुष्याचा गाडा चालत असतो.प्रेम करायचं म्हणून करायच आणि ती कोणाशी बोलली म्हणून संशय घ्यायचा हि कोती प्रवृत्ती म्हणजे प्रेम नाहीच अंतर्मनातील स्वार्थ जो नात्याला तडा देतो.
थोड्याशा कारणातून तिची हत्या करणारे अनेक माथेफिरू लोक आहेत.असे होऊ नये यासाठी वैचारिक जागृती झाली पाहिजे. आणि भविष्यातील अघटीत घटना थांबवल्या पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे.
ज्या तरुणांना नेमक आयुष्य म्हणजे काय.? हे सुद्धा कळतं नाही आणि ते सुद्धा बापाचे बळावर दुचाकीवर मुलींना फिरवत असतात.
आणि काही मुली सुद्धा मजा केली पाहिजे म्हणून फिरत असतात तसेच “वापरा आणि सोडा ” अशा तत्वाचे जगात या लोकांचे भविष्य ते काय असणार.??
काल कुणातरी मुलीची तिच्या प्रियकराने हत्या केली.
उद्या तुमच्या घरातील,नात्यातील,शेजारील मुलीचा सुद्धा नंबर लागू शकतो.म्हणून मुलांना विश्वासात घ्या,बोला..ते काय करतात.?
कुठे जातात.? कुणाच्या सोबत जातात.? ज्यांचे सोबत जातात ते कुठल्या विचारांचे आहेत याचा पत्ता घ्या..
उगाच त्यांना सगळ कळत म्हणून जनावरा सारखं मोकाट सोडू नका.जग प्रचंड खतरनाक आहे मोकाट जनावर इलेक्ट्रिक करंट ने मरतात तसेच हे मोकाट असणारे मुल, मुली अनुचित सामाजिक व्यवस्थेने मारले जातात याच भान ठेवा. आम्ही खूप शहाणे आहोत आमचे मुल,मुली तसे नाहीत हा आगावू स्वाभिमान सोडा आणि त्यांची आधी खात्री करा..कारण आपला मुलगा, मुलगी हिच आपली खरी प्रॉपर्टी आहे. पैसा येतो जातो पण मुल वारंवार आयुष्यात येत नाहीत म्हणून पैस्यापेक्षा त्यांचेकडे लक्ष द्या.
चांगली गोष्ट, चांगली माणसं समजून घ्यायला आयुष्य अपुर पडत ते समजत नाहीच. कारण चागल्या गोष्टी लवकर समजून घेणं म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीच..
तसचं प्रेम असतं. प्रेमी युगुल एकत्र राहत आहे म्हणून प्रेम आहे असं होत नाही अस असतं तर त्यांचे ब्रेक अप झाले नसते. म्हणून प्रेम हा फार मोठा विषय आहे पण चिल्लर बाज लोकांनी त्याचा कचरा केला.
प्रेमाला रंग नसतो__
प्रेमाला जात नसते__
प्रेमाला धर्म नसतो __
प्रेमाला मोजमाप नसते__ आणि प्रेमास मर्यादा सुद्धा नाही ते समजत पण नाही आणि उमजत पण नाही.
__________________________
✒️ मा.गुरुदेव(सामाजिक कार्यकर्ता)
(Mo.No. 7498279713)