Home लेख सत्यशोधिका – त्यागमुर्ति रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृतिदिन विशेष

सत्यशोधिका – त्यागमुर्ति रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृतिदिन विशेष

144

लेखक – पी.डी.पाटील सर
महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव.

जन्म – ७ फेब्रुवारी, १८९८
मृत्यू – २७ मे, १९३५

दीन-दुबळ्यांच्या आई – प्रज्ञासुर्याची सावली माता रमाई. रमाबाई यांचे पूर्ण नाव रमाबाई भीमराव आंबेडकर असे होते. भारतातील थोर समाज सुधारक, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, अर्थतज्ञ, कायदेपंडित, बोधिसत्व, महामानव, परमपूज्य, सत्यशोधक डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या त्या पत्नी होत. लोक त्यांना आदराने रमाई म्हणत.
रमाईंचा जन्म ७ फेब्रुवारी, १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भिकू धुत्रे [ वलंगकर ] तर आईचे नाव रूख्मीनीबाई भिकू धुत्रे असे होते. दाभोळजवळ नदीकाठी असलेले वनंद गाव हे रमाईचं गाव. रमाबाईंना तीन बहिणी व एक भाऊ होता. रमाई चे वडील व वलंगकार बाबा हे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या सानिध्यात आले होते व सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होते. आई-वडिलांनी रमाईवर अत्यंत चांगले संस्कार केले होते. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. कोवळ्या मनाच्या रमाईवर या घटनेचा फार मोठा आघात झाला. रमाई आईचे दुःख विरसते न विसरते तोच काही दिवसात त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. आई-वडीलांच्या निधनानंतर रमाई आपल्या भावंडाना घेऊन काका व मामासोबत मुंबईला आल्या. मुंबईच्या भायखळा मार्केटच्या चाळीत ही सर्व भांवडे राहू लागली.
सुभेदार रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव आंबेडकर यांचे वडील. सुभेदार रामजी आंबेडकर हे भीमरावांसाठी वधूचा शोध घेत होते. त्यांना भायखळा मार्केट येथील वलंगकरांकडे मुलगी असल्याचे समजले. सुभेदारांनी रमाईस पाहिले व रमाई त्यांच्या पसंतीस पडली. त्यांनी मोठ्या आनंदाने रमाई व भीमरावांचे लग्न जमवले. भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये १९०६ साली अत्यंत साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला. विवाहाच्या वेळी बाबासाहेबांचे वय चौदा तर रमाईंचे वय नऊ वर्षे होते. त्याकाळी बालविवाहाची प्रथा प्रचलीत होती. सुभेदार रामजी आंबेडकर हे देखील साताऱ्याच्या शिक्षक ट्रेनिंगला गेले असता सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्याशी त्यांची भेट झाली आणि तेथून त्यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य हाती घेतले पुस्तकांशिवाय पर्याय नाही हे त्यांनी मनात घेतले आणि बाबासाहेबांना म्हणजेच आपल्या भीवाला लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लावली व चांगले शिक्षण दिले. त्याकाळी भीवा समाजाचा पहिला मॅट्रिक पास विद्यार्थी होता. केळुस्कर गुरुजींनी भीवा उर्फ भीमराव आंबेडकर यांना बुद्ध चरित्र भेट दिले होते. बाबासाहेबांनी खूप उच्च शिक्षण घेतलं त्यासाठी त्यांना विदेशात देखील जावे लागले त्यावेळेस रमाई यांनी बाबासाहेबांना खूप खंबीर साथ दिली व परिवार सांभाळण्याची जबाबदारी घेतली.
माता रमाई ने आपल्या जीवनात खूप सारा संघर्ष केला. आपला परिवार सांभाळण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले. इ.स.१९२३ ला ज्यावेळी बाबासाहेब लंडनला होते तेव्हा रमाईची खूप वाताहत झाली. दुष्काळाच्या आगीत रमाई होरपळत होत्या. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना हे दुःख पाहवत नव्हते. त्यांनी काही पैसे जमा करून रमाईकडे आले. पण रमाईंनी पैसे घेतले नाहीत. रमाई या स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारूण्य व उदंड मानवता काय असते हे माता रमाईंकडून शिकावे. मरण म्हणजे सत्य असतं हे कळतंही नव्हतं. एवढ्या कमी वयात आई-वडीलांचा मृत्यू पाहिला. इ.स. १९१३ ला सुभेदार रामजी यांचा मृत्यू, इ.स. १९१७ ला मृत्यू, बाबासाहेबांची सावत्रआई जिजाबाईचा बाबासाहेबांचा मोठा भाऊ आनंदरावाचा मृत्यू, आनंदरावाचा मुलगा गंगाधरचा मृत्यू, बाबासाहेबांचा मुलगा राजरत्नचा मृत्यू, जवळच्या नात्यातील असे कितीतरी मृत्यू त्यांनी पाहिले व सर्व दुःख पचविले. परदेशात असलेल्या बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी कधी आपलं दुःख कळू दिलं नाही.
एकदा बाबासाहेबांना विदेशात जायचे होते तर रमाईला कुठे ठेवायचे हा प्रश्न पडला ? त्याच वेळेस कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहूजी महाराज हे भीमरावांना भेटायला घरी आले होते. त्यावेळी शाहू महाराज असे म्हणतात रमाई माझी बहीण आहे आपण निश्चित विदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्या तोपर्यंत माझी बहीण माझ्या कोल्हापूरला सुखाने राहील असे एक अतूट नातं कोल्हापूरच्या संस्थानचे राजे शाहूजी महाराजांचे डॉ.भीमराव आंबेडकर व रमाईंशी होतं.
माता रमाई ने आपल्या मुलांना फार कष्टाने वाढवलं औषधी विना अन्नाविना आपली मुलं रमाईला गमवावी लागली. रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी शेण, गोवऱ्या, सरपणासाठी वणवण फिरल्या. बॅरिस्टरची पत्नी शेण, गोवऱ्या, सरपण ही असली कामे करते म्हणून लोक हिणवायचे म्हणून रमाईंना सूर्योदयापूर्वी व रात्री आठ वाजेनंतर ही कामे करावी लागत. एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला परतले. तेव्हा मुंबई बंदरात लोकांनी गर्दी केली. स्वागत, हस्तांदोलने सुरू होती. दूर कोपऱ्यात उभ्या असलेल्या रमाईकडं बाबासाहेबांची नजर गेली. जवळ जाऊन बाबासाहेब म्हणाले, “रामू ! तू लांब का उभी राहिलीस?” त्यावर रमाई म्हणाल्या, “तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी अगोदर भेटणे हे योग्य नाही. मी तर तुम्हास केव्हाही भेटू शकते. बाबासाहेब आपल्या पत्नीला प्रेमाने रामू म्हणायचे. रमाईंनी २८ वर्षे बाबासाहेबांना साथ दिली. बाबासाहेबांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासन तास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यास त्यांच्याशी तेवढ्याच अदबीने वागत. ‘साहेब पुस्तकांच्या कोंडाळ्यात आहेत नंतर भेटा’ असे म्हणत.
एकदा बाबासाहेबांना कामानिमित्त विदेशात जायचे होते. रमाईंना घरी एकटे कसे ठेवायचे म्हणून बाबासाहेबांनी धारवाडच्या वराळे नावाच्या मित्राकडे पाठवले. वराळे काका धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. वसतीगृहाच्या आवारात लहान मुले खेळायला येत. एकदा अचानक दोन दिवस मुले खेळायला आलीच नाहीत म्हणून रमाईंनी वराळे काकांकडे याबद्दल विचारणा केली. त्यावेळी वराळे काकांचा कंठ दाटून आला. त्यांनी सांगितले, वसतीगृहाला अन्नधान्यासाठी महिन्याला जे अनुदान मिळते ते अजून मिळाले नाही. हे अनुदान मिळायला किमान तीन दिवस तरी लागतील. तोपर्यंत मुलांना उपाशीच राहावे लागेल. त्यावेळी रमाई आपल्या खोलीत गेल्या आणि रडायला लागल्या. कपाटात ठेवलेला सोन्याचा डबा आणि हातातील सोन्याच्या बांगड्या काढून त्यांनी वराळे काकांच्या हातावर ठेवल्या. त्या काकांना म्हणाल्या, ‘हे सोनं ताबडतोब गहाण ठेवून किंवा विकून मुलांना काहीतरी खायला घेऊन या. मी या मुलांना उपाशी पाहू शकत नाही. वराळे काकांनी ते सोने गहाण ठेवून मुलांना खायला आणले. त्यानंतर मुलांनी पोटभर जेवण केले. हे पाहून रमाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. लहान मुले रमाईंना ‘रमाआई’ म्हणून बोलवू लागले.
रमाईचं शरीर काबाडकष्टाने पोखरून गेलं होतं. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच गेला. त्याच वर्षी मे महिन्यात त्यांचा आजार विकोपाला गेला. बाबासाहेब रमाईंच्या जवळ बसून होते. नामांकित डॉक्टरांचे इलाज चालू होते. परंतु त्यांच्या तब्येतीत फरक पडत नव्हता. बाबासाहेब स्वतःच्या हाताने औषधी व मोसंबीचा रस रमाईला देत होते. परंतु आजार काही केल्या बरा होत नव्हता आणि तशातच २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईंची प्राणज्योत मालवली. बाबासाहेबांवर फार मोठा दुःखाचा आघात झाला. यशवंताबरोबर लाखो दीन-दुबळ्यांना पोरके करून रमाई निघून गेल्या. बाबासाहेब एकाकी पडले. पहाडासारखे बाबासाहेब ढसाढसा रडू लागले. दुपारी दोन वाजता वरळी येथील स्मशानभूमीत रमाईंचा अंत्यसंस्कार झाला.

आम्हा दुरावली
मायेची सावली
निर्वाण पावली
आमची रमाई माऊली

बाबासाहेबांची सावली – त्यागमूर्ति रमाईला शतशः नमन व कोटी – कोटी वंदन !…

***

*मा.पी.डी.पाटील सर*
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here