अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी गंगाखेड –
चांगले व तंदुरुस्त आरोग्य राहावे, यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करीत असतो. किरकोळ आजारात सुध्दा माणसं मानसिक तणावत असतात. त्यामुळे काहीवेळा रुग्णांना औषधोपचार पेक्षाही मानसिक आधाराची गरज असते. म्हणून आजारात रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर लोकांना देवदूत वाटतात. त्यामुळे रुग्णांना समर्पित भावनेतून आरोग्य सेवा द्या, असे आवाहन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालयात सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ या उपक्रमाचे उद्घाटन आ.डॉ.गुट्टे यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
कोरोना माहामारीत आरोग्य व्यवस्थेची गरज आणि महत्त्व आपल्याला समजले आहे. त्यामुळे दर्जेदार उपचार व्यवस्था काळाची गरज आहे. त्यासाठी लोकांना मोफत वैद्यकीय उपचार करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सुरू केलेला हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यातून सर्वसामान्य लोकांना निश्चितच दिलासा मिळेल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसेच दाट लोकवस्तीच्या ठिकाणी सुध्दा हि रुग्णालये सुरू होणार आहेत, असे आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुल गित्ते,माजी जिल्हा परिषद सदस्य किसनराव भोसले, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रणजित कोळेकर, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, मुख्याधिकारी तुकाराम कदम, डॉ.बिराजदार साहेब, रासपचे शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, ॲड.मिलिंद क्षिरसागर, पत्रकार पिराजी कांबळे, माजी उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, इकबाल चाऊस वैजनाथ टोले, प्रताप मुंडे यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ आपला दवाखाना’ केंद्राची वैशिष्ट्ये…
सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहातील.
दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारीका, एक फार्मसीस्ट, एक मदतनीस अशी नियुक्ती असेल.
येथे १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतील.
ग्रामीण भागात प्रामुख्याने एसटी स्थानकाच्या जवळ हे दवाखाने असतील.