अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी) :-
समाजात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सामाजिक एकात्मता व अखंडता जपली पाहिजे. त्यातून समता व बंधुता हि घटनात्मक मूल्य अधिक दृढ होतील. त्यामुळे सामाजिक सलोखा जपणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
नुकत्याच झालेल्या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील रोशन मोहल्ला येथे कॉग्रेस पक्षाचे गंगाखेड शहराध्यक्ष मिनजानीब शेख युनूस शेख कशीर यांनी ‘ईद ए मिलाफ’ या सामाजिक सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
भारत हा विविध जाती-धर्मांचा देश आहे. इथे वर्षानुवर्षे एकात्मता व अखंडता जपली आहे. मात्र, आधुनिक काळात वेगवेगळ्या अफवा, घटना आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे विचार राष्ट्रीय एकात्मतेस अडचणीचे ठरू लागले आहेत. त्यामुळे सामाजिक समतेची शिकवण देणाऱ्या सर्व महापुरूषांची विचारसरणी घेऊन सकारात्मक वाटचाल करायला हवी. त्यासाठी लिहिण्या-बोलण्यातले शब्द वागण्यात असायला हवेत. म्हणजे कृतीशील अनुकरण हाच एकमेव पर्याय आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, माजी शहराध्यक्ष खालेद भाई, सैफ चाऊस, शेख अल्लाउद्दीन, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक फिरोज पटेल, अनिल मस्के, पत्रकार पिराजी कांबळे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.