कराड 🙁 दि. 18 एप्रिल, प्रतिनिधी) “मुलींनी स्वसंरक्षण करण्याची आज नितांत गरज आहे. म्हणून अशा शिबिराचे आयोजन महत्वाचे आहे. समाजात अतिशय गंभीर परिस्थिती असून मुलींनी सतत भानावर असायला हवे. देव, विद्या, गुरू, निसर्ग आणि आईवडील यांच्यावर आपले नितांत प्रेम हवे. विवाहव्यवस्था ही समाजाच्या जडणघडणीत तयार झालेली सामाजिक व्यवस्था आहे. वडिलांना मुलगी अठरा वर्षांची झाली की ती मोठी झाल्याचा आनंद होतो आणि मुलीबद्दल असलेल्या अपेक्षांचे ओझे होते. आपल्या आईवडिलांचा खाली मान घालावी लागेल असे क्रुत्य करू नये. आपण आपले स्वसंरक्षण करणे आजच्या वर्तमानात अत्यंत आवश्यक आहे. ” असे प्रतिपादन मा. श्री बी. आर. पाटील साहेब (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कराड शहर पोलिस स्टेशन, कराड) यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व शहर पोलिस स्टेशन, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थिनीसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव हे होते.
अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव म्हणाले की, पोलिसीखात्यामध्ये संवेदनशील अधिकारी लपलेला असतो. 18 एप्रिल ते 24 एप्रिल मध्ये होणाऱ्या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात सर्व विद्यार्थिनीनी सहभागी व्हावे. आक्रमक विद्यार्थिनी घडल्या पाहिजेत. असे अवाहन त्यांनी केले .आपल्या आईवडिलांची स्वप्ने स्वावलंबी होऊन पूर्व करावीत. कायद्याचे ज्ञान घेऊन भविष्याचा विचार करायला हवा.”
कु. राजश्री सुभाष कांबळे हिने स्वागत गीत सादर केले. तर प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे यांनी करून दिला. प्रा. डॉ. श्रीमती एम. ए. शिंदे यांनी आभार व्यक्त केले तर प्रा. श्रीमती टी. टी. सरकाळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास पोलिस हवालदार मा. श्रीमती हसीना मुजावर, मा. श्री संभाजी बामणे, श्री माणिक थोरात, नंदिनी खेतमर (प्रशिक्षक), अभिषेक यादव (प्रशिक्षक) याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापिका व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.