Home महाराष्ट्र मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ! ...

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ! उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ; आज होणार चित्र स्पष्ट ! निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता !

139

 

रुपेश वाळके दापोरी प्रतिनिधी /
अमरावती जिल्ह्यातील अत्यंत महत्वाची समजली जाणाऱ्या मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुका प्रक्रीया सध्या सुरू असून, उमेदवारी अर्जांच्या संख्येवरून इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. आज २० एप्रिलला माघारीच्या अंतिम दिवशी घडणाऱ्या घडामोडींनंतरच मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरे चित्र स्पष्ट होणार असले, तरी निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या होतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, या निवडणुका जिल्ह्यात राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरत असल्याने राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून निवडणुक जिंकण्याचा चंग बांधला आहे. विशेषतः मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वात प्रतिष्ठेची ठरणार आहे.
ग्रामीण भागातील राजकारणाची व सत्ताकारणाची आगामी दिशा निश्चित करणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वच बाजार समित्यांमध्ये इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. बऱ्याच काळापासून रखडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीला मुहूर्त लागल्यानंतर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले असून आज २० एप्रिलला किती उमेदवार रिंगणात राहणार हे स्पष्ट होणार आल्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारांची जोरदार धावपळ सुरू आहे. काहींनी समर्थकांसह दाखल होत शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. स्थानिक राजकारणात आपले वर्चस्व राखण्यासाठी बाजार समिती महत्वाची मानली जाते. तिच्याद्वारे शेतकऱ्यांच्या संपर्कात राहता येते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी ही निवडणूक गांभिर्याने घेतली आहे.
मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विविध पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी आपले पॅनल निवडून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून यामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार, माजी आमदार प्रा. साहेबराव तट्टे, प्रशांत डहाणे यांनी एक गट तयार केला असून दुसरा गट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक रोडे, उपसभापती अरुण कोहळे, राज्यसभेचे खासदार माजी कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे दुसऱ्या गटाचे नेतृत्व करीत असून आपलेच पॅनल निवडून आणण्यासाठी वरील दिग्गजांनी कंबर कसली आहे.
मोर्शी तालुक्यामध्ये दोन परंपरागत प्रतिस्पर्धांमध्ये लढत रंगणार असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज आधीच दाखल केले आहेत. त्यांना आपाल्या गटांकडून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता असून तिसरे पॅनल पडणार असल्याचा अंदाज मोर्शी तालुक्यातील नागरिक बांधत असून आपल्या गटातील कार्यकर्त्यांनी बंडखोरी केल्यास त्यांची समजूत पक्षश्रेष्ठी काढणार कशी हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होणार असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून इच्छुक ऊमेदवारांनी आपला अर्ज मागे न घेतल्यास या बंडखोरीचा फायदा कोणत्या गटाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोर्शी कृषी बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वच नेत्यांनी भक्कम पॅनल तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १८ जागांसाठी एकूण १२३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात बहुसंख्य माजी सभापती व संचालकांचा समावेश आहे. तालुक्यातील सर्वत्र अनेक मातब्बरांनी अर्ज दाखल केल्याने मोठी चूरस दिसून येणार आहे हे विशेष .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here