🔹व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा
✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.3मार्च):-माध्यम क्षेत्रात काम करणारा पत्रकार असंघटित असून विखुरलेला आहे. या सर्वांना विविध विंगच्या माध्यमातून एकत्रित करून पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबीयांना सुविधा पुरविण्यासाठी लढा उभारला जाईल, असे आश्वासन व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिले.
पत्रकारांनी पत्रकारांसाठी कार्यरत “व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रव्यापी संघटनेचा कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा 1 एप्रिल रोजी रोकडे ज्वेलर्स सभागृह, चवथा माळा, लक्ष्मीनगर चौक, नागपूर येथे पार पडला.यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे मार्गदर्शन करीत होते. यावेळी ग्रामीण प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटिक, रोकडे ज्वेलर्सचे संचालक भैयाजी रोकडे, बुलढाणा जिल्हाअध्यक्ष अरुण जैन यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी व सदस्याच्या कुटुंबीयांसाठी खेळ, विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विजयाता ठरलेल्या सहभागींना रोकडे ज्वेलर्सच्या वतीने आकर्षक बक्षिसे देखील देण्यात आले.
व्हाईस ऑफ मीडिया नागपूर जिल्हा च्या वतीने कौटूंबिक स्नेह मिलन सोहळ्यात रोकडे ज्वेलर्सच्या लक्ष्मी नगर येथील शाखेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य संचालक श्री भैयाजी रोकडे यांचे शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकारणीतील सदस्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून विदर्भात झालेली संघटन बांधणी आणि उपक्रमांची माहिती देत आगामी नियोजनाची रूपरेषा सांगितली. ग्रामीणचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शहर अध्यक्ष फहीम खान यांनी मानले.