✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.3एप्रिल):- संपूर्ण देशभरातील पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या आणि सकारात्मक पत्रकारितेची बिजे रोवणाऱ्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेच्या विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांच्या हस्ते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. हेमंत सोनारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
याप्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे होते. राष्ट्रीय कार्यकारिणी सचिव दिव्या भोसले, ॲक्सिस बँकेचे वणी शाखा व्यवस्थापक प्रकाश ठाकरे, व्हाईस ऑफ मीडियाचे नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर, व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा डिजीटल मीडिया सेलचे अध्यक्ष विजय सिद्धावार, व्हाईस ऑफ मीडियाचे नागपूर शहर कार्यवाहक राकेश शुक्ला, जिल्हा कार्यवाहक राजेश सोनटक्के, सौरभ वाघमारे उपस्थित होते.
महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी व्हाईस ऑफ मीडियातर्फे सध्या सुरू असलेल्या कार्याचा गौरव केला. पत्रकारांच्या समस्या अनेक आहेत. त्या समस्यावर उपाय शोधून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबविणारी ही संघटना इतिहास निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. हेमंत सोनारे यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने देशभरात सुरू असलेल्या उपक्रमांचा गौरवोल्लेख करीत सामाजिक दृष्टिकोनातून आणखी काय काय करू शकतो, याबाबत विवेचन केले. व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले, व्हाईस ऑफ मीडियाचे विदर्भ विभागीय कार्यालय नागपुरात सुरू झाल्याने विदर्भातील पत्रकारांना संपर्कासाठी एक हक्काचे स्थान तयार झाले आहे. विदर्भातील पत्रकारांचा १६ एप्रिल रोजी विभागीय मेळावा नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने संपूर्ण कामकाज आता विभागीय संपर्क कार्यालयातून सुरू राहील. यासाठी स्वतंत्र संपर्क क्रमांक लवकरच जाहीर करु, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन व्हाईस ऑफ मीडियाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष आनंद आंबेकर यांनी केले. यावेळी प्रकाश शुंकलवार, संकेत डोंगरे आदी उपस्थित होते.