🔸कार्यात्मक श्रमाची मिळकत
✒️सुनील शिरपुरे(यवतमाळ प्रतिनिधी)
यवतमाळ(दि.17मार्च):-ॲड.संगीता नारायण खंडाळे यांना दुबईमध्ये नुकतेच प्रमुख पाहुणे एस के ग्रुपचे प्रमुख सचिन चव्हाण, दुबई येथील ड्रिम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला व सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी मिलिंद रोकडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. ॲड.खंडाळे या कॅथलॅब इन्चार्ज म्हणून विविध हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. हॉस्पिटल व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे व आता त्या यशस्वी वकील नि लेणी संवर्धक म्हणून कार्य करत आहेत. विचारवंत लेखक, उत्कृष्ट प्रशासक, महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे अध्यक्ष डॉक्टर बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून या कार्यक्रमाचे दरवर्षी दुबई येथे आयोजन करण्यात येते. अशा प्रकारचा सोहळा आयोजित करणारे ते एकमेव आयोजक आहेत.
यावर्षी हा सोहळा ६ मार्च २०२३ रोजी दुबई येथील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल मीडिया रोटाना येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील जवळपास ३० मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस के ग्रुपचे प्रमुख सचिन चव्हाण, दुबई येथील ड्रिम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला, मीनाझ फईम, यशदा पुणे येथील केंद्रप्रमुख डॉक्टर बबन जोगदंड, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे व निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड आणि प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यवसायिक, तिक्षगत वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद वाघमारे व डॉ. प्रोफेसर विजय पोतदार नांदेड आयुर्वेदिक विद्यालय हे हजर होते.
दुबई येथील हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा जीवनगौरव पुरस्कार मिळवल्याबद्दल ॲड.संगीता नारायण खंडाळे यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ॲड.संगीता नारायण खंडाळे या समाजातील गरीब लोकांना वैद्यकीय सुविधा कमीत कमी खर्चामध्ये मिळवून देण्याचे कार्य करतात व भारतातील प्राचीन वारसा लेणी संवर्धनाचे कार्य आणि मोफत कायदेविषयक सल्ला देऊन समाजातील गरीब पीडित व्यक्तींसाठी कार्य करतात. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्या म्हणाल्या की, “सामाजिक क्षेत्रात काम करत असलेल्या कार्याचा हा गौरव आहे. या पुरस्काराने नवीन संधी व जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आहे. याबद्दल मी समाधानी असून या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आयोजक डॉक्टर बबन जोगदंड सरांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करते.”