✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.12मार्च):-” विचार ,भावना आणि कल्पना यांचे धारामृत म्हणजे काव्य.अखिल समाजाचे व्यक्तिमत्व घडविण्यात साहित्याचा विशेषतः कवितेचा फार मोठा वाटा असतो म्हणून कवितेतून सकारात्मक भूमिका घेऊन जनप्रबोधन करावे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याचे उत्तम उदाहरण आहे.” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बाल साहित्यिका सौ.मायाताई धुप्पड यांनी केले.जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी व जागतिक महिलादिनाच्या औचित्याने सत्यशोधक समाज संघ जळगाव आणि भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे ऑनलाईन खुले कवी संमेलन शुक्रवार दिनांक १० मार्च २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाले.
त्याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.मायाताई धुप्पड बोलत होत्या.कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्राध्यापिका संध्या महाजन उपस्थित होत्या.पुढील मार्गदर्शनात मायाताई धुप्पड म्हणाल्या की ,” आजच्या कवी संमेलनात स्री मनाचे,तिच्या संघर्षाचे, आर्त विराणीचे पैलू उलगडून दाखविताना तिने आपली अंगणातील तुळशीची जागा सोडली नाही ! ही समाजरचना उत्तम राहावी या दिशेने दखलपात्र वाटचाल आहे.कविता भावनांचे उन्नयन करते हा विचार अनेक कवितांमधून मांडला गेला. प्रा.संध्या महाजन,जयश्री काळवीट,ज्योती राणे ,विजय लुल्हे आणि इतर अनेक कवयित्रींच्या अर्थगर्भ व भावगर्भ कवितांनी मनाचा ठाव घेतला सांगून त्यांनी कौतुकाची ममत्वाने सर्वांना थाप दिली .प्रथमतः क्रांतीज्योती सावित्री मातेच्या प्रतिमेला देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुप्रसिद्ध चित्रकार सुनील दाभाडे यांनी पुष्पांजली अर्पण केली व उपस्थितांनीही भावसुमने श्रद्धार्पण केली.
कवी संमेलनात सुनीता पाटील तालुकाध्यक्ष खानदेश साहित्य संघ अमळनेर यांनी ‘ सृजनाचे वैभव ‘ कवितेतून स्त्रीच्या सृजनासह समर्पण, त्याग, पराक्रम व अमूल्य संस्कारांचे महत्त्व सांगितले.संध्या महाजन (भुसावळ ) यांनी ‘ कवीतेचं बेट ‘ कवितेतून भिती आणि चिंतामुक्त करून जगणं मोहक करण्यासाठी कवितेच्या बेटावर वस्ती करण्याचे साहित्यिकांना आवाहन केले.मंगल नागरे – देशमुख ( अमळनेर ) यांनी ‘ बाई ‘ कवितेतून संसारातल्या जीवघेण्या कोंडमाऱ्यातूनही स्वतःला सावरणारी अन् मोहरणारी चंदनगंधित स्त्रीच्या जगण्यातले दिव्यत्व मांडले.कु.मनीषा बिऱ्हाडे ( पाचोरा ) यांनी ‘ मी लेक सावित्रीची ‘ कवितेतून उच्च शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात भरारी घेणाऱ्या चारित्र्यशील व संपन्न विचाराने कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून सदाचाराने क्रांतीज्योती सावित्रीमातेचा वारसा चालविण्यातला कृतार्थ अभिमान दमदारपणे मांडला.
मंजुषा पाठक ( जळगाव ) यांनी ‘ विसरू नको ‘ कवितेतून पुरुषांच्या स्वार्थी व वासनांधतेचे बुरखे फाडून पुरुषसत्तेचा विकृत चेहरा उघडा केला ! स्रीने क्षणोक्षणी सजग राहून सामर्थ्याने प्रथापरंपरेच्या जोखडातून स्वतः मुक्त होऊन प्रतिकार केला पाहिजे हे सांगताना भृणहत्या करू नकोस व दिनदलितांची अन् राष्ट्रसेवा करीत संस्कृती जपण्याचेही भान ठेव असा अमूल्य संदेश दिला.शैलजा करोडे यांनी ‘ कधी कधी ‘ कविता सुरेल आवाजात सादर करून मने जिंकली.जयश्री काळवीट ( भुसावळ ) यांनी ‘ उठा सावित्रीच्या लेकी ‘ कवितेच्या सुमधुर गायनातून स्रीने मूकपणे अन्याय अत्याचार न सोसता आता कडक बिजली होऊन नराधमांच्या नरडीचा घोट घेऊन राक्षसी विकृतीचा प्रतिकार करावा.सावित्रीच्या लेकींनी उठून सजगतेनं प्रकाशाचे भेट व्हावे.जिजाई,रमाई यांच्याप्रमाणे प्रेरणास्तंभ होण्याचं करुणार्त आवाहनाने ढवळून काढत कार्यक्रम उंचीवर नेला ! पत्रकार कवयित्री कु.चेतना हिरे यांनी ‘ युगस्त्री ‘ कवितेतून सावित्रीमाईंनी अदम्य जिद्दीने सनातन्यांविरुद्ध बंड करून धर्मरुढींच्या बेड्या तोडल्या.
अतुलनीय कतृत्वातून समस्त माता भगिनींसाठी सावित्री माता युगस्री झाल्या हे धारदार शब्दांनी मांडून चैतन्य आणले.संयोगिता शुक्ल यांनी ‘ भारत की सुपूत्री ‘ कविता सुरेख गायनातून महिलांनी प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर गाठूनही यथोचित सन्मान होत नाही ही खंत व्यक्त केली.तरीही स्री समर्पणातून प्रत्येक घराची शान असल्याचे ठासून सांगितले.रेखा मराठे ( अमळनेर ) यांनी ‘ स्त्री जन्माची व्यथा ‘ कवितेतून स्त्रीच्या अंगभूत विविधांगी कर्तृत्वाचा ऐतिहासिक आलेख साकारला ! ज्योती राणे ( जळगाव ) यांनी ‘ साऊ ‘ कवितेतून चूल आणि मूल मध्ये बंदिस्त झालेल्या स्त्रीने आता गुणसामर्थ्याने स्वतःला सिद्ध केल्याचे सक्षमपणे सांगितले.
चित्रा पगारे यांनी ‘ ती अशीच आहे ‘, कवितेतून स्त्री शक्ती ठाव न घेता येणारी परमेश्वराची अनाकलनीय आणि गुंतागुंतीची अद्भुत निर्मिती असल्याचे सांगितले.विजय लुल्हे ( जळगाव ) यांनी ‘ आस्वादाच्या अरण्यात ‘ कवितेतून अभिव्यक्तीची असह्य तगमग आणि अभिजात संयमाचे अद्वैत मांडले. प्रा.संध्या महाजन ( जळगाव ) यांनी ‘ ती ‘ कवितेतून लेकरांना शिक्षण मिळाव, शिकून लेकरांच उज्ज्वल भविष्य घडाव यासाठी नवऱ्याची मारझोड सहन करणाऱ्या कष्टकरी अशिक्षित स्त्रीच्या विदारक कहाणीने साऱ्यांचे डोळे पाणावले.कु.चेतना हिरे व कु.मनिषा बिऱ्हाडे या नवोदित कवयित्रींच्या आशयसंपन्न कवितांना ज्येष्ठांनी प्रचंड दाद दिली !
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवयित्री जयश्री काळवीट क्रांतीज्योती सावित्री माईंच्या कार्याबद्दल मार्गदर्शन करताना म्हणाल्या,” आजच्या शिक्षित महिला एकविसाव्या शतकाकडे न जाता व्रत वैकल्यांच्या आहारी जाऊन मागे जात आहेत.आता एक सावित्री पुरेशी नाही सर्वांनी सावित्री झाल्या पाहिजे आणि अन्यायाला वाचा फोडून सामर्थ्याने प्रतिकार केला पाहिजे.मेकअप मध्ये वेळ न घालवता परिवर्तनासाठी पावलोपावली अखंड लढा देत प्रबोधन केले पाहिजे.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार तथा ‘ तरुण भारत ‘ दैनिकाचे वरिष्ठ उपसंपादक रवींद्र मोराणकर ,प्रसिद्ध कवी जयवंत बोदडे उपस्थित होते. रेखा मराठे यांच्या कुटूंबातील ज्येष्ठांनी कवी संमेलनाचा आस्वाद घेतला. त्यांच्या सासूबाई रत्नप्रभा मराठे यांनी भारावून कवयित्री जयश्री काळवीट यांचेशी संवाद साधून कौतूक केले.कवी संमेलन आयोजनाची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार,राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे , विधीकर्ते भगवान रोकडे, जिल्हा समन्वयक पी.डी.पाटील सर यांनी दिली.कवी संमेलनाचे यशस्वी आयोजन व कार्यवाही सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक तथा डॉ.कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक प्रमुख विजय लुल्हे व आम्ही सिद्ध लेखिका समुहाच्या कार्यकर्त्या ज्योती राणे यांनी अमूल्य परिश्रम घेतले.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्योती राणे यांनी केले. तांत्रिक सहाय्य चित्रकार सुनिल दाभाडे यांनी कुशलतापूर्वक सांभाळले.