Home गडचिरोली मराठी: जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा!

मराठी: जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा!

129

[मराठीभाषा गौरव दिन सप्ताह: कवी कुसुमाग्रज जन्मदिन विशेष.]

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज- वि.वा.शिरवाडकर यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना अभिवादन म्हणून दि.२१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस- २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत. मात्र दोन्ही एकच समजण्याची चूक करू नये. कारण माझ्या मराठीचा उदोउदो करण्यास ते दोन्ही दिवस कामाचेच आहेत. श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार यांच्या शब्दांतून मराठीचा अभिमान जागवा… 

माझी मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. ती भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. माझी मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. सन २०११च्या जनगणनेनुसार भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा ठरते. ती भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. पवित्र ग्रंथराज ज्ञानेश्वरी हा मराठीतील ७४५ वर्ष जुना पहिला ग्रंथ आहे. मराठीचे वय सुमारे एक हजार वर्षे असूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा का नाही? याची मला खंत वाटते. मराठी भाषेचा गौरव संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या साहित्यातूनही केलेला दिसून येतो-

“माझ्या मराठीची बोलु कौतुके!
परि अमृतातेही पैजा जिंके!!”

महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. कुसुमाग्रजांच्या शब्दांत मराठी भाषा गुणगौरव-

“माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा।
तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा।।”

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. त्यांचा जन्म पुणे येथे दि.२७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. कवीवर्य कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव व कविराज कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या हेतूने त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा शासन निर्णय दि.२१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला. कारण मराठी भाषा अमर झाली असल्याचे कविराज कुसुमाग्रज सांगतात-

“विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती,
म्हणू़न नव्हती भिती तिजला पराजयाची!
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली,
म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची!!”

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१०मध्ये त्यांचा जन्मदिवस- २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेला आहे. दि.१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेव्हापासून १ मे हा दिवस मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल, असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी मराठी राजभाषा अधिनियम १९६४ सर्वप्रथम दि.११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६पासून तो अंमलात आला. १ मेेे रोजी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने घोषणा करीत असतांना त्यांनी मांडलेले मराठी भाषा दिनावरील विचार प्रेरक होते. वसंतराव नाईक सरकारने पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यात पहिल्यांदाच भाषा संचालनालयाची निर्मिती केली व प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना केली. राज्यकारभार मराठीतून चालणार, असे अधिकृतपणे जाहीर केले होते. मराठी भाषा गौरव दिवस- २७ फेब्रुवारी आणि मराठी भाषा दिवस- १ मे हे स्वतंत्र दिवस असून त्या दिवसांचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. नादमधुर काव्यलेखन शैलीनेही माझ्या मराठीचा गोडवा अधिकच पसरविण्यात ते पुढेच असल्याचे कळते-

“ओळखलात का सर मला?
पावसात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले,
केसांवरती पाणी!”

विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. तर वि.स.खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतात नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. अशा या थोर साहित्यिकाचे दि.१० मार्च १९९९ रोजी निधन झाले.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या मराठी बांधवांना सप्ताहभर प्रेरक हार्दिक शुभेच्छा !!

✒️श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार,प.पू. गुरुदेव हरदेव कृपानिवास, रामनगर गडचिरोली.व्हॉट्सॲप.९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here