(शास्त्रज्ञ डॉ.शांतिस्वरूप भटनागर जयंती)
ज्यांचा ब्रिटिश सरकारने सन १९३६मध्ये ऑर्डर ऑफ दि ब्रिटिश एम्पायर व सन १९४१मध्ये नाइट हा किताब देऊन गौरव केला. सन १९४३मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थेचे सदस्य होण्याचा ज्यांना बहुमान मिळाला. इ.स.१९५४मध्ये भारत सरकारने ज्यांना पद्मविभूषण हा किताब देऊन गौरवले. ते विश्वविख्यात भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ.शांतिस्वरूप भटनागर होत. त्यांच्या पावन जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या लेखनशैलीतून ही ज्ञानवर्धक माहिती…
डॉ.शांतिस्वरूप भटनागर हे भारतीय रसायनशास्त्रज्ञ होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात भटनागर यांनी बहुमोल कामगिरी केली. कौन्सिल ऑफ सायन्टिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च- सीएसआयआरचे ते शिल्पकार होते. डॉ.शांतिस्वरूप भटनागर यांच्या नावाचा पुरस्कार भारतातील कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च संस्थेतर्फे प्रदान करण्यात येतो. भटनागरजींच्या पश्चात तरुण भारतीय संशोधक व तंत्रज्ञ यांनी केलेल्या महत्त्वाच्या मूलभूत संशोधनाला योग्य मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दरवर्षी देण्याचा प्रघात सन १९५७पासून पडला आहे. आजतागायत हा पुरस्कार सुमारे साडे चारशेच्या जवळपास शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे. तो खुपच प्रतिष्ठेचा समजला जातो.
भारताला उच्चस्तरीय संशोधन कार्य आणि तांत्रिक कामगिरीच्या दिशेने नेणारे महान शास्त्रज्ञ डॉ.शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म दि.२१ फेब्रुवारी १८९४ रोजी पंजाबमधील शाहपूर जिल्ह्यात झाला, जो आता पाकिस्तानमध्ये येतो. त्यांचे वडील परमेश्वर सहाय हे शिक्षक होते.
शांतिस्वरूप हे केवळ ८ महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली. त्यांचे बालपण सिकंदराबाद येथे अभियंता असलेले त्यांचे आजोबा प्यारेलाल यांच्यासोबत गेले. शांतिस्वरूपजी यांनी आजोबांकडे सुरुवातीचे शिक्षणच घेतले नाही, तर अभियांत्रिकीच्या कामातही त्यांना रस आणि कुतूहल निर्माण झाले. त्यांना भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयात रस होता. ते शाळेत असे प्रश्न विचारत, की जे शिक्षकांनाही थक्क करत असत. सन १९०८मध्ये श्री.परमेश्वर सहाय यांचे मित्र लाला रघुनाथ सहाय यांनी शांतिस्वरूपजींच्या अभ्यासाची जबाबदारी घेतली. तेव्हा ते लाहोरला त्यांच्याकडे आले. त्यांनी दयाल हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले, जेथे लाला रघुनाथ सहायजी हे प्राचार्य होते. शासकीय शिष्यवृत्ती स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. हळूहळू ते आत्मनिर्भर होऊ लागले. ते शाळेत मन लावून अभ्यास करत असत आणि घरी छोटे मोठे पार्टस बनवणे किंवा जुन्या वस्तूंना ठोकून मारून त्यांचे नवीन वस्तूत रूपांतर करत. तीन वर्षांत त्यांनी हायस्कूलची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली. पुढे त्यांनी लाहोरच्या दयालसिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
त्यांचा अभ्यास अव्याहतपणे सुरू राहिला. प्रा.जगदीशचंद्र बसूंना भेटण्याची संधीही त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांचे विज्ञानावरील प्रेम आणखी वाढले. सन १९१३मध्ये ते एफएससीमध्ये रुजू होऊन त्यांनी ती परीक्षा प्रथम विभागात उत्तीर्ण केली. दोन वर्षांनी त्यांनी रसायनशास्त्रात एमएससी पूर्ण केले. त्यांनी पदवीही मिळवली आणि दयालसिंग कॉलेजमध्येच अध्यापनाला सुरुवात केली. त्याच वर्षी लाला रघुनाथ सहाय यांची मुलगी लाजवंती हिच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी दयालसिंग ट्रस्टने शिष्यवृत्ती दिली आणि ते सन १९१९मध्ये लंडनला गेले. परदेशात त्यांनी इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनीतील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने आणि प्रतिभेने सर्वांनाच वेड लावले होते. त्यांनी क्षारांची विद्राव्यता आणि त्याचा परिणाम या विषयावर लेखन केले व याच प्रबंधावर इ.स.१९२१मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठाची डीएससी पदवी मिळवली. देशभक्त डॉ.भटनागरजी तेथून घरी परतले.
भारतात डॉ.भटनागरजींनी पंडित मदनमोहन मालवीय यांच्या विनंतीवरून बनारस हिंदू विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापकपद स्वीकारले. सन १९२४मध्ये ते लाहोर येथील पंजाब विद्यापीठात भौतिकीय रसायनशास्त्राचे प्राध्यापक व तेथील रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेचे संचालक झाले. पुढच्या दोन वर्षात त्यांनी चुंबकीय रसायनशास्त्रातील संशोधनास प्रारंभ केला. या विषयाच्या अभ्यासात उपयुक्त असलेले चुंबकीय व्यतीकरण संतुलनमापक- मॅग्नेटिक इंटरफिअरन्स बॅलन्स हे उपकरण के.एन.माथूर यांच्या सहकार्याने त्यांनी तयार केले. त्याचे एकस्व- पेटंट मिळविले. इ.स.१९३६मध्ये त्यांनी स्टील ब्रदर्स या व्यापारी कंपनीला खनिज तेलासंबंधीच्या काही औद्योगिक समस्या सोडविण्यात संशोधन करून मौलिक मदत केली. या कार्याकरिता या कंपनीने दिलेल्या मोबदल्यातून त्यांनी पंजाब विद्यापीठात एक खास प्रयोगशाळा स्थापन केली.
त्यामध्ये केरोसीनचे शुद्धीकरण, गंधहीन मेणाचे उत्पादन, वंगणे व वंगणक्रिया तसेच धातूंच्या क्षरणक्रियेला प्रतिबंधन यांसारख्या विविध समस्यांवर संशोधन केले. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांत वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळाचे रूपांतर कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेत झाले. भटनागरजींची या संस्थेचे पहिले संचालक म्हणून नेमणूक झाली. ब्रिटिश सरकारने सन १९३६मध्ये ऑर्डर ऑफ दि ब्रिटिश एम्पायर व सन १९४१मध्ये नाइट हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. सन १९४३मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटी व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्री या संस्थेचे सदस्य होण्याचा त्यांना बहुमान मिळाला. इ.स.१९५४मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा किताब देऊन गौरवले. डॉ.शांतिस्वरूप भटनागरजी यांचे वयाच्या ५१ वर्षी दि.१ जानेवारी १९५५ रोजी निधन झाले.
!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे त्यांना व त्यांच्या संशोधन कार्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
✒️अलककार:- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.मु. पो. ता. जि. गडचिरोली,फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com