Home महाराष्ट्र इंद्र मोकाट आणि गौतमीचाच बोभाटा का ?-Gautami Patil On Ajit Pawar

इंद्र मोकाट आणि गौतमीचाच बोभाटा का ?-Gautami Patil On Ajit Pawar

279

🔸भाजपाच्या चित्रा वाघांचा राष्ट्रवादी अवतार म्हणजे अजित पवार-Gautami patil Lavani-Ajitit Pawar

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्याबाबत सध्या खुपच ओरडा-ओरड चालू आहे. विशेष म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अधिवेशनात मुद्दा मांडण्याचा तिला इशारा दिलाय. “महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारं नाही !” असेही ते म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटील महाराष्ट्रात धुमाकूळ घालते आहे. तिचे नृत्य पाहण्यासाठी युवकांची तोबा गर्दी होते आहे. मुंग्यांचे वारूळ फुटल्यासारखे लोक तिचे नृत्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. तिचे नृत्य पाहताना लोक वेड्यासारखे नाचतात, सगळा कार्यक्रम डोक्यावर घेतात. शिट्टया, टाळ्या आणि हळ्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. गौतमी पाटीलचे हे खुप मोठे यश आहे. तिच्यासाठी लोक वेडावले आहेत. तिच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका काहींनी घेतलाय असे दिसून येते. त्यातूनच तिच्यावर बंदी घाला अशी कोल्हेकुई सुरू झाली आहे.

कला क्षेत्रातल्या प्रस्थापितांना गौतमीची भिती वाटू लागली आहे. अनेकांनी गौतमीचा धसका घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गौतमीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. पण ही बंदी घालण्याची मागणी करताना संस्कृती नावाची ढाल पुढे केली जात आहे. संस्कृतीच्या आडाला दडत गौतमीला दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुराणात देवांचा राजा असलेल्या इंद्राची व अहिल्येची एक कथा आहे. गौतम ऋषीची पत्नी असलेल्या अहिल्येवर इंद्राचे मन जाते, ती त्याला आवडते. एकदा गौतम ऋषी अंघोळीला जातात अन इकडे देवांचा राजा असलेला इंद्र गौतम ऋषींचा वेश धारण करतो. त्यांच्या आश्रमात अहिल्येकडे येतो. तिच्याशी संभोग करतो. तेवढ्यात अंघोळ आटपून गौतम ऋषी आश्रमात येतात आणि पाहतात तर इंद्र आपल्या पत्नीशी संभोग करत असल्याचे त्यांना दिसते, ते संतापतात व अहिल्येला आणि इंद्राला शाप देतात.

गौतम ऋषीच्या शापाने अहिल्येची शिळा होते पुढे राम अवतारात रामाच्या पदस्पर्शाने ती मुळ स्वरूपात आली म्हणे. काशी केली इंद्राने पण समाजात बदनाम झाली अहिल्या. गौतम ऋषींची पत्नी गौतमी (अहिल्या) बदनाम झाली. तिला नवरा सोडून दगड व्हावे लागले. इकडे इंद्र महाशय बिनबोभाटपणे देवांचा राजा म्हणूनच वावरत होते, मिरवत होते. त्यांना काही फरक पडला नाही. बाकी त्यांच्या बुडाला भगं पडली म्हणे. पुराणात अशी अख्यायिका सांगितली आहे. यातून एकच सांगायचे आहे की समाजाची मानसिकता आजही यापेक्षा वेगळी नाही. अशा प्रत्येक प्रकरणात फक्त स्त्रीलाच जबाबदार धरले जाते. तिच्यावरच सगळे बिल फाडले जाते. इंद्राच्या प्रवृत्तीची पुरूष जमात मोकाट सोडली जाते. त्यांना काही बोलले जात नाही. त्यांनी काही करावे, कसेही वागावे ते क्षम्य असते.

त्यांचे काहीच वाकडे होत नाही. पण स्त्रीला मात्र लगेच धारेवर धरले जाते, तिला नितिमत्तेच्या, संस्कृतीच्या फुटपट्ट्या लावल्या जातात. तिला दुषण दिली जातात. तिची मापं काढली जातात. हा दुटप्पीपणा इथल्या तथाकथित संस्कृती व धर्मातूनच झिरपत खाली आला आहे. इथली अनेक पुराण तपासली, चाळली तर हे सगळे प्रकार समोर येतील. काळ बदलला तरी पुरूषी प्रवृत्ती बदलली नाही. ते आजही संस्कृतीच्या नावाखाली स्त्री चे स्वातंत्र्य, स्त्री चाच आवाज दाबताना दिसतात. तिच्यावरच सामाजिक अपेक्षांचे ओझे टाकताना दिसतात. गौतमी पाटीलला ज्या अजित पवारांनी दम दिला त्याच अजित पवारांनी त्यांचा लाडका नेता धनंजय मुंडेंना का पाठीशी घातले ? धनंजय मुंडे त्यांना चालतात ? त्यांना त्यांची करूणा येते त्यांची शौर्यगाथा चालते ? मग गौतमी पाटीलच्या नृत्यांनेच तुमची संस्कृती बिघडते का ? संस्कृतीच्या गप्पा मारणा-या अजित पवारांचा पक्ष गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवतोच कसा ? याचे उत्तर देतील का अजितराव ?

भाजपाच्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला विरोध करत कानफाडी मारण्याची भाषा केली तेव्हा अजित पवारांचा बराच गोतावळा उर्फी जावेदला पाठबळ देताना दिसत होता. तिला पाठींबा देताना ते पुरोगामीत्व होते का ? मग आता गौतमीला विरोध करताना प्रतिगामी झालात काय ? त्यावेळी अजित पवारांनी चित्रा वाघ यांना पाठींबा का दिला नाही ? अजितरावांची व्यक्तीपरत्वे भूमिका बदलते की काय ? अजितरावांना संस्कृती रक्षणाचा प्रश्न पडला असेल तर त्याच संस्कृतीला फाट्यावर मारणारं मटेरियल सिनेमा सृष्टीत रोज चित्रीत होतं. इथल्या प्रस्थापित नायिका व नायक सगळ दाखवतात. सिनेमात दाखवायच काहीच बाकी राहिलेल नाही. टिव्हीवरील कंडोमच्या जाहिरातीत काय दाखवायचं बाकी राहिलय ? कुटूंबातले सगळे लोक त्या जाहिराती सहजपणे बघतात. ते कसलीही तक्रार करताना दिसत नाहीत. आजवर यावर कुणी बोललेल नाही. कुठले संस्कृतीरक्षक ओरडलेले नाहीत, बंदीची मागणी केलेली नाही. अनेक सिरियल्सनीही हे टप्पे पार केलेत.

मग या बाबत आवाज बंद का ? अनेक प्रस्थापित नट्या ज्या पध्दतीने पेहराव करतात, भूमिका करतात त्यावर अजितराव का कधी बोलले नाहीत ? २००९ साली अजितरावांच्या सरकार मधील एका मंत्र्याने एका अधिकारी महिलेचा हात पकडल्याची चर्चा होती. सदर मंत्री अजितरावांच्या मांडीला मांडी लावून बसत होता. त्यावेळी त्याचा राजिनामा मागण्याची हिम्मत अजित पवारांनी का दाखवली नाही ? एका अधिकारी महिलेवर अतिप्रसंग करणारा माणूस तुम्ही तुमच्या मंत्रीमंडळात सहन कसा केला ? अजितराव हा प्रकार बसतो का महाराष्ट्राच्या परंपरेत ? २००९ चे कशाला नुकत्याच पायउतार झालेल्या महाआघाडी सरकारमध्ये भानगडवाला संजय राठोड अजित रावांना कसा काय चालला ? तो आता भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाच्या सरकारमध्येही मंत्री आहे. तो किंवा धनंजय मुंडे मंत्री असण्याने अजित रावांची संस्कृती अडचणीत येत नाही काय ? गौतमी नाचली तरच संस्कृती धोक्यात येते की काय ? धनंजय मुंडे, संजय राठोड यांना अजित पवारांनी संस्कृतीचे व्याख्यान का झोडले नाही ? त्यांना मंत्रीमंडळात घ्यायला का विरोध केला नाही ?

अजित पवारही चित्रा वाघ यांच्यासारखे दुटप्पी वागू लागले की काय ? पक्षातल्या लोकांना एक न्याय आणि बाहेरच्या लोकांना दुसरा न्याय अशी चित्रा वाघ यांच्यासारखी भूमिका अजित पवारही घेवू लागलेत का ? अजित पवार चित्रा वाघांचा राष्ट्रवादी अवतार वाटू लागलेत. हा न्यायाचा दुजाभाव का ? एक न्याय गौतमी पाटीलला व दुसरा न्याय इतरांना का ? लोकशाही देशात न्यायातला दुजाभाव लोकशाही माणणा-या पक्षाच्या नेत्यांनी करावा हे विशेष आहे ? हे प्रश्न चिकित्सक मनाला पडल्याशिवाय रहात नाही.

अजितराव, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी करणारे लोक गौतमीच्या घरचे नसतात. या गुडघ्यावर येणा-या झुंडीला काय सांगतील अजित पवार ? त्यांचा काही दोष नाही काय ? ते चुकीचे नाहीत का ? की एकटी गौतमी पाटीलच अश्लिल आहे ? तिला पहायला गर्दी करणारे, शिट्ट्या वाजवणारे, वेडे होवून नाचणारे श्लिल व सभ्य आहेत काय ? गौतमी सॉप्ट टार्गेट आहे म्हणून तिला तंबी देणार आणि भानगडी करणारे, महिलांचा हात पकडणारे मंत्री सरकारात घेणार ? व्वा रे व्वा अजितराव. नृत्य करताना गौतमीने मर्यादा ठेवायला हव्यात, भान ठेवायला हवे हे मान्य. पण भान सोडून तेच पहायला येणा-या लोकांचे काय ? त्यांच्यासाठी अजितराव अधिवेशनात मुद्दा मांडणार का ? या राज्यातील लाखो माता-भगिणींचे संसार ज्या दारूने बरबाद झाले ती दारू संपुर्ण बंद करण्यासाठी अजितराव अधिवेशानात बोलणार का ? महाराष्ट्राच्या संत परंपरेने दारूलाही नाकारलेले व निषिध्द मानले आहे. मग ती दारू बंद करण्यासाठी अजितराव पुढाकार घेणार का ? अजितरावांना संस्कृतीचे पडले असेल तर त्यांनी यावरही विचार करावा. नसेल तर धर्म व संस्कृती रक्षणासाठी चित्रा ताईंच्या सोबतीने सनातन समुह जॉईन करावा ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here