Home पुणे क्रांतिकरांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे

क्रांतिकरांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे

239

स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल क्रांतिकारक तसेच क्रांतिकारकांरांचे गुरू वस्ताद लहुजी साळवे यांचा स्मृतिदिन. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी लाखो ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले त्यात वस्ताद लहुजी साळवे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. वस्ताद लहुजी साळवे यांनी भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे महान कार्य केले त्या कार्याची नोंद भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सुवर्ण अक्षरांनी घ्यायला हवी होती मात्र दुर्दैवाने त्यांच्या कार्याची दखल इतिहासकरांनी घेतली नाही म्हणूनच त्यांच्या कार्याविषयी देशातील खूपच कमी लोकांना माहिती आहे. वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे ( राऊत ) तर आईचे नाव विठाबाई असे होते.

लहुजी साळवे यांचा जन्म शूरवीरांच्या घरात झाला. त्यांचे खापर पणजोबांवर शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी दिली होती. त्यांचे वडील राघोजी साळवे हे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात शिकारखाना व शस्त्रगाराचे प्रमुख होते. लहुजींचे घराणे शूरवीर, लढवय्ये असल्याने लहुजीने देखील शूर बनावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती म्हणूनच त्यांनी लहुजींना लहानपणापासूनच शस्त्रांची आणि युद्ध कलेची तालीम दिली. त्यामुळे लहुजी घोडेस्वारी करणे, दांडपट्टा फिरवणे, भालाफेक करणे, बंदूक चालवणे, तोफगोळे फेकणे, गनिमीकावा करणे, शत्रूंची गुप्त माहिती गोळा करणे या युद्ध कलांत पारंगत झाले. ५ नोव्हेंबर १८९७ रोजी पेशव्यांचे इंग्रजांसोबत घनघोर युद्ध सुरू झाले.

या युद्धात राघोजींसोबत तरुण लहुजीही सहभागी झाले. या युद्धात राघोजी लहुजी या बापलेकांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र या युद्धात राघोजींना वीरमरण आले. या युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. वडिलांना वीरगती प्राप्त झाल्यावर लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्य प्राप्तीची ज्वाला भडकली. भारतमातेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी राघोजी साळवे शाहिद झाले त्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करतना मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी अशी शपथ घेतली. इंग्रजांशी लढायचे असेल तर त्यासाठी जहालच व्हावे लागेल हे ओळखून त्यांनी तरुणांना जागृत केले.

लहुजी साळवे यांनी पुण्यातील मुलांना युद्ध कलेचे शिक्षण देण्यासाठी पुण्यतिल रास्ता पेठेत देशातील पहिले तालीम युद्ध कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्व समाजातील तरुण सहभागी झाले. १८३९ साली इंग्रजांनी सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांना गादीवरून हटवले. छत्रपती प्रतापसिंह यांना पदच्युत केल्याने तरुणांमध्ये इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण झाली. याचा वचपा काढण्यासाठी तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांनी महाराष्ट्रात तर उत्तरेत रंगोबापू यांनी लहुजींच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. १२ जून १८५७ ही बंडाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र बंडाची कुणकुण इंग्रजांना लागली व त्यांनी लहुजींसह अनेक क्रांतिकारकांना पकडले मात्र त्यामुळे इतर क्रांतिकारक चिडले व त्यांनी पुरंदरच्या मामलेदारांना ठार मारले. मामलेदारांच्या हत्येला जबाबदार ठरवून इंग्रजांनी कनय्या मांग व धर्मा मांग यांना तोफेच्या तोंडी दिले हे दोघेही लहुजीचे शिष्य होते.

याच हत्येला जबाबदार ठरवून आणखी काही क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या क्रांतीकारकांना लहुजी साळवे यांनीच प्रशिक्षण दिले असा संशय असल्याने इंग्रजांनी लहुजी साळवे यांना अटक करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लावला. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी लहुजी साळवे हे वेषांतर करून भ्रमंती करू लागले या काळात त्यांनी सातारा, पन्हाळा या ठिकाणच्या दुर्गम भागात प्रशिक्षण केंद्र उभारली. या प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी अनेक क्रांतिकारक तयार केले.

१७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्यातील संगमपूरच्या परिसरात एका झोपडीवजा घरात लहुजींची प्राणज्योत मालवली आणि एका महान क्रांतीपर्वाचा शेवट झाला. भारत मातेला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी वस्ताद लहुजी साळवे शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि आपल्या सारखेच हजारो जहाल क्रांतिकारक निर्माण केले म्हणूनच त्यांना क्रांतिकरांचे गुरू असे म्हणतात. आज त्यांचा स्मृतिदिन मात्र आजही त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला नाही हे आपले दुर्दैव. अर्थात याला आपले इतिहासकार देखील तितकेच जबाबदार आहेत त्यांनी वस्ताद लहुजी साळवे यांचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहचवले नाही. वस्ताद लहुजी साळवे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here